साकव्य पुणे विभागीय मेळावा नुकताच संपन्न झाला. यासाठी वारजे हायवे जेष्ठ नागरिक संघाने आयोजनाची जबाबदारी घेतली आणि ती उत्तम रीतीने पार पाडली.
हा मेळावा दोन सत्रात पार पडला. पहिल्या सत्रात प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, प्रायोजक प्रतिनिधी यांची भाषणे आणि काव्य स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद साकव्य मंचचे अध्यक्ष श्री. पांडुरंग कुलकर्णी यांनी भूषविले. तर सदस्य श्री. श्रीनिवास गडकरी हे प्रमुख पाहुणे होते.
सुरवातीला सरस्वती आणि ग्रंथ पूजन करून सत्राची सुरुवात झाली. भाग्यश्री कुलकर्णी यांनी सदस्य कै. अरविंद ढवळीकर
यांनी लिहिलेले साकव्य गीत सुरेल आवाजात सादर केले. त्यानंतर श्री. बोधाई यांनी प्रास्ताविक करून सर्वश्री पांडुरंग कुलकर्णी, श्रीनिवास गडकरी, उदय दाईंगडे या तिघांचा सत्कार केला. ज्योत्स्ना तानवडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
या वेळी बोलताना श्री. गडकरी यांनी काव्य लेखनाची वैशिष्ट्ये, शुध्दलेखन, कविता सादरीकरण, वक्तृत्वकला, दुसऱ्या भाषा शिकण्याची गरज अशा अनेक गोष्टींवर भाष्य केले.
श्री. उदय दाईंगडे सरांनी मेटलाईफ संबंधी माहिती दिली.
श्री पांडुरंग कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी साकव्यच्या विविध उपक्रमांच माहिती देऊन यापुढे पूर्ण दिवसभराचे संमेलन घेण्याचा मनोदय व्यक्त केला.
ज्योत्स्ना तानवडे यांनी सर्वांना उत्सुकता असणारा काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर केला. सुरवातीला या मेळाव्याच्या निमित्ताने घेतलेल्या स्पर्धेचे परिक्षक श्री. हेमंत कुलकर्णी यांचे मनोगत त्यांनी वाचून दाखवले. त्यात त्यांनी कविता लेखनात झालेल्या चूका दाखवून देत उत्तम काव्यलेखना साठी खूप छान मार्गदर्शन केले. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.
प्रथम क्रमांक – उमा व्यास
द्वितीय क्रमांक – राधिका भांडारकर
तृतीय क्रमांक – हेमांगी बोंडे
उत्तेजनार्थ : १)नंदकिशोर बोधाई. २) -ज्योत्स्ना तानवडे.
सर्व यशस्वी कवीजनांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी काही कविता, किस्से सांगत रंजक पद्धतीने खूप केले.
कवी संमेलनात प्रा. अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. बक्षीस प्राप्त कवींनी आपल्या कविता सादर केल्या. त्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जोडीला प्रा. शिंदेचे खुमासदार निवेदन होते.
यानंतर अल्पोपहार, चहा झाला. मंडळी ताजीतवानी होऊन दुसऱ्या सत्रातील काव्य संमेलन ऐकायला उत्सुक होती. या काव्य संमेलनाची सुरुवात अरूणाताई मुल्हेरकर यांनी कविता गायनाने केली. दोनच दिवसांपूर्वी त्या अमेरिकेहून पुण्याला आल्या होत्या. या काव्य संमेलनात २५ कवी- कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. वृत्तबद्ध कविता, गझल, भावगीत, हास्य कविता, बालगीत अशा एकापेक्षा एक बहारदार कविता सादर झाल्या. त्याला सर्व रसिकांनी भरभरून दाद दिली. जोडीला प्रा.अशोक शिंदे यांचे उत्स्फूर्त निवेदन, चारोळ्या, कविता यांनी रंगत आणली. सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
शेवटी श्री. सुहास सांबरें यांनी आभार मानले. कार्यक्रम आटोपशीर पण खूप छान रंगतदार झाला आणि खूप आवडला अशा प्रतिक्रिया बहुतेक सर्वांनीच दिल्या. नियोजनाची जबाबदारी नंदकिशोर बोधाई, सुहास सांबरे, चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्योत्स्ना तानवडे यांनी उत्तम रीतीने पार पाडली.
या संमेलनासाठी अध्यक्ष श्री पांडुरंग कुलकर्णी आवर्जून नाशिकहून आलेले होते. सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. आता पुढील मोठे संमेलन कसे, कुठे, कधी करायचे याचे बेत सुरू झाले असल्याचे ज्योत्स्ना तानवडे यांनी सांगितले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800