Monday, February 16, 2026
Homeसाहित्यपुत्र व्हावा ऐसा....

पुत्र व्हावा ऐसा….

एकीकडे आपल्या आईवडील किंवा त्यांच्या पैकी जो कुणी हयात असेल त्यांची काळजी न घेता, त्यांना प्रेम न देता वृद्धाश्रमाची वाट दाखविणारे करंटे मुलंमुली समाजात दिसून येतात. तर दुसरीकडे हयात नसलेल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देणारे नांदेड येथील डॉ अच्युत बन आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे कार्य खरोखर दिलासा देणारे आहे.

डॉ अच्युत बन यांच्या, त्यांच्या आई वडिलां विषयीच्या भावना, त्यांच्याच शब्दात पुढे देत आहे…

“आमच्या जीवनातील आजचा दिन विशेष आहे.
आज बाबांची 45 वी पुण्यतिथी.
बाबांचे स्मरण सदासर्वदा होते.
आमचे संपूर्ण जीवन घडवणाऱ्या आईबाबांचे ऋण अपार आहे. त्यांच्या ऋणाची परतफेड अनेक मार्गाने करण्याचा आम्ही दोघेही यथाशक्ती प्रयत्न करीत असतो.

आमच्या रुग्णसेवेला पुज्यनीय आईबाबांच्या स्मरणाची जोड असते.
बोलीभाषा मराठी आणि त्या भाषेतून सातत्याने होणारे साहित्यसृजन मानवी जीवनाला संस्कारीत करीत असते.
मराठी भाषा संवर्धन कार्याला हातभार लावण्याचा इवलासा प्रयत्न आमचे वैद्यकीय प्रतिष्ठान करीत आले आहे.
या निमित्ताने आमच्या आईवडिलांचे पुण्यस्मरण घडते.
“प्रसाद बन वाड.मय पुरस्कार”, पद्मिनीबाई बन साधना सन्मान” व इतर अनेक साहित्य पुरस्कार प्रदान करताना एक प्रकारे समाज व भाषेविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा शुद्ध हेतू आमच्या मनात असतो.
यावर्षीचे साहित्य पुरस्कार परवा जाहीर करण्यात आले आहेत.
योग्य साहित्याची निवड करण्याचे अवघड काम.

आमची “प्रसाद बन वाड.मय पुरस्कार समिती” अत्यंत पारदर्शी पद्धतीने करत आलेली आहे.
साहित्य पुरस्कार योजनेचे हे 22 वे वर्ष आहे. यावर्षीपासून “राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार” नव्याने सुरू करण्यात आला आहे. यावर्षी आठ साहित्यिकांना वेगवेगळे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
सर्व मानकर्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

पुरस्कार समितीचे निमंत्रक जेष्ठ साहित्यिक डाॅ सुरेश सावंत, सौ मथुताई सावंत यांचे सहकार्य नेहमीच लाभते म्हणून ही योजना अव्याहतपणे चालू आहे.
पुरस्कार समितीचे अध्यक्ष गुरूवर्य भु.द.वाडीकर सरांची नीरक्षीरविवेक पद्धतीची साहित्य निवड आमच्या योजनेचा कणा आहे.

सौभाग्यवती डाॅ वर्षा बन, डाॅ अमित आणि डाॅ अनुज या कुटुंबियांच्या सहकार्याने ही साहित्य योजना अव्याहतपणे चालू ठेवण्याचा प्रण आम्ही करत आहोत.

बन परिवार

बाबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
मातृपितृ भक्त पुत्र व्हावा ऐसा….डॉ अच्युत बन आणि त्यांचे कुटुंबीय करीत असलेल्या थोर कार्याबद्दल ‘न्यूज स्टोरी टुडे’ परिवारातर्फे या सर्वांना मन:पूर्वक अभिवादन.

पुढे या वर्षी जाहीर करण्यात आलेले पुरस्कार विजेते यांची माहिती देत आहे. :-

१) साहित्यक्षेत्रात अतुलनीय योगदान देणार्‍या एका ज्येष्ठ साहित्यिकाला दरवर्षी “मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान” पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाच्या साधना सन्मानासाठी पुणे येथील लेखक, संपादक व विचारवंत “डॉ. कुमार सप्तर्षी” यांची निवड करण्यात आली आहे. रु. 11,000 रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

२) सर्वोत्कृष्ट पुस्तकाकरिता देण्यात येणार्‍या “प्रसाद बन वाङ्मय” पुरस्कारासाठी पुणे येथील “लेखक
पोपट श्रीराम काळे” यांच्या मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ’काजवा’ ह्या आत्मकथनाची निवड करण्यात आली आहे. रु.11,000 रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

३) “प्रसाद बन ग्रंथगौरव” राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नागपूर येथील अरुणा सबाने यांच्या मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ’सूर्य गिळणारी मी’ ह्या आत्मकथनाची तसेच वसई येथील जॉन गोन्सालवीस यांच्या ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या ’ज्याच्या हाती पुस्तक’ ह्या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी रु. 5000 रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

४) “प्रसाद बन राज्यस्तरीय बालसाहित्य” पुरस्कारासाठी उस्मानाबाद येथील “समाधान शिकेतोड” यांच्या राजहंसने प्रकाशित केलेल्या ’जादूई जंगल’ ह्या किशोर कादंबरीची निवड करण्यात आली आहे. रु. 5000 रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

५) स्थानिक ग्रंथगौरव पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील दोन साहित्यिकांना देण्यात येणार आहे. महेश मोरे यांनी लिहिलेल्या आणि लोकवाङ्मयगृह प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ’बोर्‍याची गाठ’ ह्या कादंबरीची, तसेच डॉ. भगवान अंजनीकर यांच्या निर्मल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ’सावली शोधाची अर्धवट गोष्ट’ ह्या कादंबरीची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी रु. 2500 रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

६) राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कारासाठी नांदेड येथील दै. ’उद्याचा मराठवाडा’च्या ’मुक्तपर्व’ दिवाळी अंकाची निवड करण्यात आली आहे. राम शेवडीकर हे ह्या दैनिकाचे संपादक असून प्रवीण बर्दापूरकर हे ’मुक्तपर्व’ दिवाळी अंकाचे अतिथी संपादक आहेत. रु. 5000 रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रा. भु. द. वाडीकर आणि प्रा. डॉ. मथु सावंत यांच्या परीक्षण समितीने ह्या पुरस्कारांची निवड केली.

दरवर्षी अतिशय दिमाखदार समारंभात ह्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते, पण यंदा काही अपरिहार्य कारणास्तव हे पुरस्कार विजेत्यांना घरपोच पाठविण्यात येणार आहेत.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आईवडीलांविषयी कृतज्ञता आणि साहित्यविषयक व सामाजिक बांधिलकीची उत्कृष्ट संकल्पना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11