Wednesday, December 18, 2024
Homeलेखपुरुषांच्या वाढत्या आत्महत्या : एक गंभीर समस्या

पुरुषांच्या वाढत्या आत्महत्या : एक गंभीर समस्या

अतुल सुभाष या तरुणाची आत्महत्या जितकी चिंताजनक, त्याही पेक्षा त्याने मृत्यू पूर्वी केलेला व्हिडिओ गंभीर अन् विचार करण्यालायक आहे.

महिलांवरील अत्याचाराची सर्व क्षेत्राकडून ताबडतोब दखल घेतली जाते. त्याकडे विशेष सहानुभूतीने पाहिले जाते आणि ते साहजिकही आहे. पण गेल्या काही वर्षात महिलांकडून पुरुषावर होणाऱ्या अत्याचाराची, सूड भावनेची, बदला घेण्याची प्रकरणे वाढली आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

महिलांना पोलिसांकडून म्हणा किंवा कायद्याने न्यायालयाकडून म्हणा विशेष महत्व मिळत असल्याने, त्यांच्याकडे सहानुभूतीने बघण्याची समाजाची भूमिका असते. त्यामुळे अनेक केसेस मध्ये पुरुषावर अप्रत्यक्षपणे नाहक अन्याय मात्र होतो. अतुल सुभाष या केस मध्ये तर त्याची बायको, सासू एव्हढेच नव्हे तर ज्या कोर्टात त्याची केस चालू होती त्या कोर्टातील महिला न्यायाधीश यांचाही छळ केलेल्या महिला वर्गात समावेश आहे.

आजच्या युगात शिक्षण घेतलेल्या तरुणी सक्षम झाल्या आहेत. त्यांच्या आशा अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांनाही त्यांची स्वतंत्र स्पेस हवी आहे. त्यांच्या स्वातंत्र्याच्या वेगळ्या व्याख्या आहेत. पूर्वी सारख्या त्या शरणागत नाहीत.पुरुषावर अवलंबून नाहीत. आजकालच्या मुलींच्या लग्न संबंधाविषयीची, अपेक्षांची यादी बघितली तरी त्यांच्या बदललेल्या दृष्टी कोनाची सहज कल्पना येते. भावना, नाती जपणे याला महत्व राहिले नाही.व्यवहारात कोरडेपणा आला आहे. स्वार्थ बोकाळला आहे. मटेरियलिजम वाढला आहे.
बाहेरून येणाऱ्या मुलीला नवऱ्याकडची नाती जपणे, सासर देखील आपलेच समजणे हा भाव राहिलेला नाही.लग्न झाले तरी सासरी विर्घळण्या ऐवजी मुली माहेरचीच नाती गोंजारताना दिसतात.माहेरची लेकीच्या संसारातील लुडबुड काही केल्या थांबत नाही. त्यातूनच संघर्षाच्या ठिणग्या पडतात. नवऱ्याच्या भावना जपण्या पेक्षा मुलीला लग्न झाल्यावरही आईबाप जास्त महत्वाचे वाटतात. नाळ काही केल्या तुटत नाही म्हणतात ती अशी !

लग्न होऊन इंग्लंड अमेरिकेत गेलेल्या मुलीचे हिशेब देखील असेच व्यवहारी स्वरूपाचे असतात.सगळे काही मोठमोठ्या पॅकेज साठी..अन् तिकडच्या ऐशआरामी जिंदगी साठी! नवऱ्याला पूर्ण लुबाडून काडीमोड देणाऱ्या, अन् न्यायालयाच्या माध्यमातून वर पोटगी, हिस्सा बळकावणाऱ्या लुटारू वृत्तीत बरीच वाढ झाली आहे. इथे मुलीला सावरण्याऐवजी, तिला खडे बोल सुणावण्या ऐवजी तिचे आई वडील देखील तिलाच साथ देतात. यामुळे एकूणच सांसारिक, सामाजिक वातावरण पार गढुळले आहे. सोशल फॅब्रिक कमजोर झाले आहे.

अतुल सुभाष ची केस अत्यंत केविलवाणी, हृदय द्रावक आहे. त्याला आर्थिक दृष्ट्या तर लुबाडले गेलेच. पण त्याचा क्रूर मानसिक छळ देखिल झाला. त्यात महिला न्यायधिष देखिल सामील असावी याचे अजून नवल वाटते. स्त्रियांकडून अनेकदा पुरुषाचे इमोशनल ब्लॅकमेलिंग देखील होते. रडून,आरडा ओरडा करून स्वतःचे खरे करून दाखवण्याचा नाटकी प्रयोग त्यांना चांगला जमतो. यू ट्यूब वर अशाच स्त्रियांकडून केवळ पुरुषाच्या होणाऱ्या छळाच्या केसेस घेणाऱ्या वकील महिलेचा इंटरव्ह्यू उपलब्ध आहे. त्यावरून स्त्रिया कशा प्रकारे पुरुषांना गंडवतात, त्यांचा भयानक मानसिक छळ करतात याची कल्पना येते.

आपल्या साहित्यात, पुराणात, इतिहासात स्त्रियांची जी शालीन, मायाळू, प्रेमळ, दयाळू प्रतिमा रंगवली गेली आहे, तिला छेद देणाऱ्या घटनाची संख्या आजच्या समाजात दिसून येते.

पूर्वी नाटक चित्रपटात खलनायक असायचेच. ते अत्त्याचार करताना दाखवले जायचे. नायिकेचा शील भंग करताना दिसायचे. आता हे प्राण, प्रेम चोप्रा,vसदाशिव अमरापूरकर टाईप क्यारेक्टर गायब झाले आहेत. टी वी वरील मालिकात तर यांची जागा स्त्रियांनी घेतली आहे. प्रत्येक मालिकेत एक दोन स्त्री पात्रे खल वृत्तीच्या भूमिका बजावताना दिसतातच. त्या मानाने पुरुष खलनायक आजकाल फार कमी प्रमाणात दिसतात. आश्चर्य म्हणजे हे स्त्री खल पात्र रंगविणाऱ्या लेखिका, दिग्दर्शिका, संवाद लेखिका देखील स्त्रियाच असतात. बदललेल्या सामाजिक मानसिकतेचे, कुप्रवृत्तीचे हे जिवंत उदाहरण आहे !

वाढता चंगळवाद, त्यातून घरातील प्रत्येक घटकाला मिळालेले मुक्त स्वातंत्र्य, अन् या स्वातंत्र्याचा दुरुपयोग या सर्वाला कारणीभूत आहे. पूर्वी आपल्याकडेच नव्हे तर जागतिक पातळीवर स्त्रियांची गळचेपी व्हायची. त्यांना समाजात नेहमीच दुय्यम स्थान दिले जायचे. शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवले जायचे. विधवांची अवहेलना व्हायची. हे सगळे निश्चितच निषेधार्ह होते यात दुमत नाही. अनेक कादंबऱ्यातून, नाटकातून, सामाजिक चळवळीतून स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली गेलेली आपण पाहतो. परिणाम स्वरूप गेल्या सात आठ दशकात एकूणच जागतिक पातळीवर परिस्थिती आरपार बदलली. स्त्रियांसाठी खास कायदे, सोयी सवलती झाल्या. प्रत्येक क्षेत्र त्यांच्या साठी खुले झाले. आता तर असे कोणतेही क्षेत्र राहिले नाही जिथे स्त्रियांना प्रवेश नाही. त्यामुळे त्यांचे बौध्दीक, शारीरिक सामर्थ्य दाखविण्याची संधी त्यांना मिळाली हेही तितकेच खरे.
मिळालेले स्वातंत्र्य आपण किती जबाबदारीने सांभाळतो, उपयोगात आणतो यावर बरेच काही अवलंबून असते. संसारात नवरा बायको दोघांनीही परस्परांना सन्मानाने वागविले, समजून घेतले तर अर्धे अधिक प्रश्न सुटतील. प्रश्न अहंकाराचा (इगो) असतो. माझेच बरोबर या अट्टाहासाचा असतो. दुसऱ्या पार्टनर ला कमी लेखण्याचा असतो.

मुख्य म्हणजे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात संवाद कमी झाला आहे. दोघांनी एकत्र बसून, प्रसंगी वाडवडीलांचा सल्ला घेऊन अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. पण आपण आपला हेका पुढे रेटत नेण्याचेच धोरण ठेवले तर मात्र संघर्षाच्या ठिणग्या उडून आग लागते. त्यात दोघांच्याही आयुष्याची राख होते.

अतुल सुभाष च्या बाबतीत तेच घडले. पत्नीच्या अन् तिला साथ देणाऱ्या स्त्रियांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आता तरी अशा केसेस कडे बघण्याचा समाजाचा अन् न्यायालयाचा दृष्टिकोन बदलेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तशीही न्याय देवतेच्या डोळ्या वरील पट्टी आता उघडली आहे ! न्यायालयाच्या खंडपीठात सर्व न्यायधिषाचे अधिकार समान असतात. सर्वांचा अधिकार समान असतो. संसाराच्या बाबतीत देखील नवरा बायको समान पातळीवर जगले, वागले तर बरेच प्रश्न सहज सुटतील. घरातील सर्वांचे जगणे अधिक सुसह्य, सुंदर होईल. अशा घटनांपासून आपण सर्वांनीच धडा घेतला पाहिजे.

या विषयी तुम्हाला काय वाटते ? तुमच्या प्रतिक्रिया, विचार अवश्य कळवा.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. “एका पुरुषाची आत्महत्या” इतक्या महत्त्वाच्या विषयावर कोणालाही टिप्पणी देण्यातही स्वारस्य वाटू नये, इतकाच ह्या विषयाचा आवाका आहे का? प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, मग इथे पुरुषाचे नाणे वाजले नाही, म्हणून त्याने ते फेकून देऊन आत्महत्या केली, असेही म्हणता येईल? न्यायदेवतेनी डोळ्यावरची पट्टी काढली असली, तरी ती तेच बघतेय, जे तिला दाखवले जातेय! वर्षानुवर्षे पुरुषांनी स्त्रियांवर अत्याचार केले, कोणाला जाउदे, कोणाला मारले; “घाशीराम कोतवाल ” मध्ये तर गौरीला भिंतीत चिणले! उठवला कोणी आवाज त्याविरुद्ध? तो सर्व जुना काळ होता हो! इतिहासजमा झाला तो आता! मग मागच्या २५ -३० वर्षे आधी मुलींचा हुंडाबळी जात होता, तो काळ कोणता? जाऊ देत, अगदी मरणच नको, पण काळी मुलगी अमावास्या आणि तिला नाकारून गोरी पौर्णिमा घरात आणणारे तरी त्यांच्या बायकांना सुखात नांदवत होते काय? “शिकलेलीच बायको” पाहिजे म्हणून मुलींना घराबाहेर पडून शिक्षण घ्यायला लावणारे, आणि “नोकरी करणारीच हवी” म्हणून चांगल्या सुस्वरूप, सुसंस्कृत, सुगरण वगैरे कॅटेगरीमध्ये बसणाऱ्या मुलींना नाकारणारे, किंवा लग्न झाल्यानंतरही तुच्छ लेखणारे, “तू काय नुसती गृहिणी आहेस, ती आमच्या ऑफिसमधली अमकी तमकी बघ, कशी राहाते!” वगैरे मुक्ताफळे उधळून बायकोला, सुनेला जगणे नकोसे करणारे ; ते सर्व पुरुष नव्हते काय? चार भिंतींमध्ये संसाराचे सुख उपभोगणारी बायको जेव्हा नवऱ्याच्या खांद्याला खांदा भिडवून बाहेरच्या जगात अर्थार्जन करायला लागते, तेव्हा तिच्यावर काही नोकरीची बंधने, काही सामाजिक बंधने पण येऊ शकतात, ह्याची जाणीव आजच्या सर्वच पुरुषांना झालेली आहे का? नवऱ्याच्या मागून कामावरून दमून भागून आली, तरी स्वयंपाक गरम करून, मुलांना, नवऱ्याला खाऊ घालण्याची जबाबदारी बायकोचीच असते, असे का? क्वचित एखाद्या घरात सासूबाई सुनेला मुलाच्या बरोबर चहा आणून देत असतील, किंवा डबा भरून देत असतील; तिथे त्या सुनेनी आपल्या सासूच्या चांगुलपणाची जाण ठेवलीच पाहिजे! पण असे प्रत्यक्षात किती घरांत घडते? ९० % कुटुंबांमध्ये अजूनही स्त्रीला समान वागणूक मिळत नाही; मग ती शहरातील सुशिक्षित स्त्री असो की खेडेगावातील काबाडकष्ट करणारी महिला असो! शहरातील अशा गरीब, अर्धशिक्षित महिलांचे हाल तर कुत्राही खाणार नाही. दारुड्या नवऱ्याला बायकोने मोलमजुरी करून कमावलेला पैसा हवा असतो, पण तिला त्या संसारात आपले मत मांडायचाही अधिकार नसतो. हां, मुद्दा आहे, उच्चशिक्षित, भरपूर कमावत्या, अहंकरी आणि पतीचा व सासरच्या मंडळींचा छळवाद करणाऱ्या गर्विष्ठ तरूणींचा; तर त्यांनी अतिरेकाने उचललेले कोणतेही पाऊल चुकीचेच ठरेल; पण त्यांना इतके अतिरेकी, सासरच्या माणसांविरुद्ध टोकाची भूमिका घ्यायला लावणारी समाज परिस्थितीच ह्याला कारणीभूत आहे. ह्या मुली वर्षानुवर्षे महिलांवर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची मानसिकता बाळगून संसारात पदार्पण करतात, मग कधी त्या निरागस, निष्पाप पुरुषांनाही आपले लक्ष्य (टार्गेट) बनवतात; तर कधी त्यांचा निशाणा योग्यच असतो, पण त्या विरोधात समाजामध्ये होणारा आक्रोश अधिक मोठा असतो… कारण? शिकारीच शिकार झाला, हे पचवण्याची मानसिकता अजून आपल्या समिजामध्ये यायची आहे.

    माझा ह्या तरुणींना इतकाच सल्ला, की चुकीच्या मार्गाने जाऊन आपले ध्येय प्राप्त करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर समाज तुमचा खरा हक्क डावलून अन्याय करणाऱ्याच्या पदरात झुकते माप घालेल आणि पुन्हा तुम्ही परंपरागत दाव्याला जखडलेल्या गरीब गायी बनून राहाल! तसे होऊ देऊ नका; योग्य वेळेस योग्य ठिकाणीच, आपली सर्व शक्ती एकवटून हल्ला करा; आणि आपले बहुत प्रयासाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित राखा. “एका पुरुषाची आत्महत्या” इतकी महत्त्वाची नाही, जितका स्त्री वर्गावर युगानुयुगे झालेला अत्याचार महत्त्वपूर्ण आहे, ही जाणीव समाजाला करून द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on निसर्गोपचार : ३
सौ.मृदुलाराजे on “माहिती”तील आठवणी” : ३१