८ मार्च हा जागतिक महिला दिन जितका प्रसिद्ध आहे आणि अतिशय जोशात साजरा करण्यात येतो तितका १९ नोव्हेंबर हा जागतिक पुरुषदिन काही प्रसिद्ध वा लोकप्रिय नाही. पण या दिनाची सुरुवात १९९२ पासून त्रिनिदाद आणि टोबॅगो येथून झाली. त्यानंतर १९९९ पासून त्याला जागतिक स्वरूप येऊ लागले. तर भारतात तो २००७ सालापासून साजरा होऊ लागला. अशा या जागतिक पुरुष दिनाची या वर्षाची संकल्पना आहे “सकारात्मक पुरुष रोल मॉडेल्स”. या पुरुष दिनाच्या निमित्ताने श्री विलास गोहणे यांनी लिहिलेला लेख वाचू या.
अल्प परिचय : यवतमाळ जिल्ह्यातील खोरद या गावचे असलेले श्री विलास गोहणे यांनी राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पत्रकारिता पदविका आणि पदवी ही प्राप्त केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात १३ जून २०१४ रोजी सरळ सेवेने लिपिक नि टंकलेखक म्हणून भरती झाले असून सध्या ते वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना लिखाणाची आवड आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात श्री गोहणे यांचे स्वागत आहे.
भारतीय कुटुंब व्यवस्थेत, विशेषतः संयुक्त कुटुंब पद्धतीत, पुरुषाला नेहमीच कर्ता किंवा मुख्य व्यक्ती मानले गेले आहे. ही धारणा ऐतिहासीक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांमुळे तयार झाली आहे. धर्मग्रंथांतूनही पुरुषाला ‘कर्ता’ किंवा ‘मुख्य जबाबदार’ मानले गेले आहे. पुरुषांना सांस्कृतीक दृष्ट्या अर्थार्जनाची जबाबदारी दिली जात असल्याने कुटुंबाचे निर्णय सर्वस्वी पुरुषांवर अवलंबून असत. लग्नाच्या वेळीही पुरुषाला कुटुंब सांभाळण्याचे वचन दिले जाते, जे कर्तेपणाचे प्रतीक मानले जाते.
आधुनिक काळात विभक्त कुटुंब पद्धत प्रचलीत झाली आहे. शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणामुळे पुरुष कर्तेपणाची पारंपरीक भूमिका बदलत आहे. आता कुटुंब चालवणे ही जबाबदारी स्त्री-पुरुष दोघांवर येत आहे. जिथे पती-पत्नी दोघे आर्थिक आणि सामाजिक निर्णय घेतात.
आजच्या पुरुषांनी केवळ कर्तेपणाचाच विचार न करता, भावनिक आधार आणि सहकार्य देणाऱ्या भूमीकेत प्रवेश करणे सुरू केले आहे. कुटुंब व्यवस्थेत स्त्रियांची वाढती भूमिका ही केवळ पुरुषांचे कर्तेपण कमी करणे नाही तर एक नवा समतोल समाज निर्माण करणे आहे. निर्णय घेण्यात स्त्रिया सहभागी होत असल्यामुळे कुटुंबाचे आरोग्य आणि विकास वाढतो आहे.
आजच्या काळात कर्तेपण म्हणजे केवळ अर्थार्जन नाही तर कुटुंबाला मानसिक, सामाजिक आणि भावनिक आधार देणेही महत्त्वाचे आहे. पारंपरीक विचारांपासून पुढे जात, कुटुंब व्यवस्थेत समानतेचा विचार प्रबळ होत आहे. आजचा पुरुष हा पारंपरिक भूमिकांपेक्षा अधिक समकालीन आणि समतोल दृष्टिकोन स्वीकारणारा आहे. बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीमुळे पुरुषाच्या व्यक्तिमत्त्वात व जीवनशैलीत लक्षणीय बदल झाले आहेत.
आजचा पुरुष केवळ कुटुंबासाठी आर्थिक पाठबळ देणारा नाही, तर घरकामात, मुलांच्या संगोपनात आणि भावनिक आधार देण्यातही योगदान देतो. पती-पत्नीची जबाबदारी समान आहे, याची जाणीव असल्यामुळे घरगुती व आर्थिक निर्णय एकत्र घेतले जातात. तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रात पुरुष नवीन कौशल्य आत्मसात करत आहेत. नोकरीच्या संकल्पनेबरोबरच आजचा पुरुष स्टार्टअप, फ्रीलान्सिंग आणि क्रिएटिव्ह क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. पारंपरिक विचारांमध्ये पुरुषाने कठोर आणि भावना न व्यक्त करणारा असावे, असे मानले जायचे. परंतु, आजचा पुरुष भावनिकदृष्ट्या जाणीवसंपन्न झाला आहे आणि मानसिक आरोग्याला महत्त्व देतो आहे.
स्त्रियांना समान संधी मिळाव्यात, हे समजून पुरुष स्त्री सक्षमीकरणाचे समर्थक बनले आहेत. कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक पातळीवर महिला सहकाऱ्यांशी समन्वय साधण्याची क्षमता विकसित झाली आहे. पूर्वीच्या पिढ्यांप्रमाणे नात्यांमध्ये कठोर भूमिका न घेता आजचा पुरुष संवाद साधतो आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. वैयक्तिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन यामध्ये तो समतोल साधण्याचा प्रयत्न करतो.
जागतिकीकरण, तंत्रज्ञानातील क्रांती आणि आर्थिक स्थितीतील बदल यामुळे आजच्या पुरुषाला नवीन आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. पुरुष स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा, आवडी- निवडींचा आणि ध्येयांचा शोध घेत आहे, ज्यामुळे तो अधिक प्रगल्भ बनतो.
पुरुषाला कर्तेपणाची भूमिका स्वीकारायची आहे का, की समाज त्याला त्या भूमिकेसाठी समाज भाग पाडतो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे उत्तर काही प्रमाणात व्यक्तीगणिक वेगवेगळे असू शकते . पण समाजाच्या अपेक्षांमुळे पुरुषावर ‘कर्तेपणाचे ओझे’ येते, हे निर्विवाद आहे. बऱ्याच पुरुषांना वाटते की कर्तेपण स्वीकारल्याने ते कुटुंबासाठी उपयुक्त ठरतील आणि त्यांची समाजात प्रतिष्ठा वाढेल. पुरुषांमध्ये नैसर्गिक संरक्षणाची भावना असते.
त्यामुळे त्यांना कुटुंबासाठी कर्ता होण्याची नैतिकता आवडते. कर्तेपणामधून पुरुषाला स्वतःचा ठसा उमटवण्याची संधी मिळते, विशेषतः जर तो कुटुंबाला पुढे नेण्यात यशस्वी झाला तर पारंपरीक समाजात पुरुषाकडून कर्तेपण अपेक्षित असते. ‘पुरुष आहेस तर कमावणं तुझं कर्तव्य आहे’ अशा अपेक्षा त्याच्यावर टाकल्या जातात. पुरुषाच्या कर्तेपणावरून त्याचे व्यक्तिमत्त्व आणि कुटुंबाची स्थिती मोजली जाते. जर तो कर्तव्यात कमी पडला तर त्याला तिरस्कार किंवा अपमान सहन करावा लागू शकतो.
अनेकदा पुरुष स्वतःच्या भावनिक गरजा दुर्लक्षीत करून कुटुंबासाठी कष्ट करतो, कारण समाज त्याला ‘बलिदानी’ होण्यासाठी प्रेरीत करतो. मुलगा मोठा झाल्यावर घर सांभाळेल, ही अपेक्षा त्याच्यावर बालपणापासून बिंबवली जाते. खेळणी, शिक्षण आणि सामाजिक संवादातून त्याच्यावर कर्तेपणाची भूमिका ठसवली जाते. ‘खरा पुरुष तोच जो कुटुंब चालवतो’ किंवा ‘कमकुवत पुरुष अपयशी ठरतो’ अशा समजुतीमुळे कर्तेपणाची जबरदस्ती वाढते. कुटुंबासाठी आर्थिक योगदान न देणाऱ्या पुरुषाला अनेकदा ‘निकम्मा’ किंवा ‘आळशी’ मानले जाते.
जर पर्याय उपलब्ध झाला तर बरेच पुरुष कर्तेपणाचे पद सोडण्यास तयार असतील. हे पूर्णतः त्या पुरुषाची वैयक्तिक परिस्थिती, मनोवृत्ती आणि पर्यायाच्या स्वरूपावर अवलंबून आहे. सततची आर्थिक आणि मानसिक जबाबदारी पुरुषासाठी तणावदायक ठरते. जर कुटुंब चालवण्यासाठी इतर सदस्य सक्षम असतील तर तो पद सोडण्यास तयार होऊ शकतो. बरेच पुरुष आपल्यासाठी वेळ काढू शकत नाहीत कारण ते कर्तेपणाच्या ओझ्याखाली वाकलेले असतात. स्वतःच्या आवडीनिवडींवर लक्ष केंद्रित करू शकतात. कर्तेपणाच्या एकतर्फी अपेक्षांमुळे त्याला स्वतःच्या भावनिक गरजा आणि नाती दुर्लक्षित करावी लागतात. कर्तेपदातून मोकळीक मिळाली तर तो कुटुंबातील इतर भूमिकांमध्ये अधिक समतोल साधू शकेल.
समाज पुरुषाकडून कर्त्याची भूमिका निभावण्याची अपेक्षा करतो. कर्तेपण हे पुरुषाच्या आत्मसन्मानाशी जोडलेले असते. त्याला वाटते की हे पद सोडल्यास तो कुटुंबातील किंवा समाजातील स्थान गमावेल. काहीना कर्तेपद सोडणे म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या झटकून टाकणे असे वाटते. यामुळे पुरुषाच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. जर पत्नी किंवा जोडीदार आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, तर कर्तेपदाची जबाबदारी सामायिक करणे सोपे होते. समाजातील लैंगिक भूमिका बदलल्या आणि ‘पुरुषच कर्ता असायला हवा’ ही अपेक्षा कमी झाली, तर पुरुष हे पद सोडण्यास अधिक तयार होतील.
पण त्याने कर्तेपद सोडले तरी त्याला ‘कमजोर’ समजले जाऊ नये. कुटुंबातील इतर सदस्यांनीही कर्तेपण सामायीक करण्याची तयारी दाखवली तर त्याला पद सोडणे सुलभ होईल. त्याने हे समजून घेतले पाहिजे, की कर्तेपद सोडल्याने तो अपयशी ठरत नाही. तो फक्त जबाबदारी दुसऱ्यांसोबत वाटून घेत आहे, असे मला वाटते. या बाबतीत आपल्याला काय वाटते ?
— लेखन : विलास गोहणे. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ ☎️9869484800