Monday, July 14, 2025
Homeसाहित्यपुस्तक परिक्षण : जबाब ओल्या मातीचे

पुस्तक परिक्षण : जबाब ओल्या मातीचे

समृद्धीचा संदर्भपदर निसर्गाला वेढून टाकतो, तेव्हा त्या पदरात लपेटलेला निसर्ग अनावर दानत घेऊन येतो. मराठवाड्यातील लातूरचे सेवानिवृत्त बॅन्क अधिकारी व दिवंगत कवी विजय भोयरेकर यांची कविता असे निसर्गाचे संदर्भ देत आपल्यातील सृजनशीलतेला गतिमान करते, तेव्हा ती कविता समृद्धीवरील कविता होते :
भटकताना रानाला
काही सवाल करावे…
मिळालेले हिरवे जबाब
ओल्या मातीत पेरावे…
— समृद्धीचा हा गगनात, वार्‍यात , झाडांवर व भरलेल्या घनांवर चालणारा सुंदर जलसा भोयरेकरांनी
‘जबाब ओल्या मातीचे’ या आपल्या कवितासंग्रहातून आपल्या स्वाधीन केला आहे. काळ्या मातीचा टिळा लावून त्यांची कविता विलक्षण तरल प्रतिमा लेवून येते. कुठंही बनवेगिरी नाही. उगाच चिंतकाचा आव नाही. काही मांडण्याचा अट्टाहास नाही, की कुंथून कुंथून मांडलेला वेदनांचा बाजार नाही. त्यांच्या कवितेची जातकुळी मातीशी नातं सांगणारी आहे.बीजाचं उर्ध्वगामी अंकुरणं त्यांना अधिक खुणावतं. शेतात डोलणार्‍या हिरव्या स्वप्नांशी ती अधिक जवळीक सांगते. त्यामुळेच या रानवाटा त्यांना भर्जरी शालू नेसल्यागत वाटतात.

दिवंगत कवी विजय भोयरेकर

कोसळता वरुनी धारा
अंकुरले अवघे रान…
आठवात व्याकुळलेले
फांदीवर पिकले पान…
— अशा आशयगर्भ कवितेतील ही सृजनोत्सुक मातीची कूस माणसाची अभंग जीवनेच्छा पांघरुनच येते. ताकदीच्या प्रतिमा घेऊन भोयरेकरांचे शब्द येतात, तेच मुळी सकारात्मक आश्वासकतेची पेरणी करीत !
नाटकी आवेशानं फोडलेला टाहो तीत नाही. रानाचं भणंगपण, शेतीतली उध्वस्तता, जीर्ण लक्तरं पांघरलेलं जिणं हा त्यांच्या लेखणीचा मुळात विषयच नाही. सरसरून पान वर यावं, तशी त्यांची कविता कातळ भेदून सरसरून वर येते नि आभाळभर व्यापून राहते.
पाट वाहतो..

एका हिरव्या
पात्याची मी..
वाट पाहतो…
— असे साय पांघरलेले त्यांचे शब्द डेरेदार झाडांचं समृद्धपणच सांगतात.
‘जबाब ओल्या मातीचे’ मधील अनेक प्रतिमा ऐसपैस आहेत. किंबहुना अशा प्रतिमा हीच भोयरेकरांची बलस्थाने आहेत. या प्रतिमा रंग, गंध, स्पर्श, नाद, दृक् , गती या संवेदनांनी सजीव अन् सजग झालेल्या आहेत. कधी कधी या प्रतिमा भोयरेकरांच्या वैयक्तिक अनुभवांची कक्षा व्यापक करतात.

एकीकडे खडकाळ वास्तवाची दाहकता अन् पल्याडची डोंगरमग्न संन्यस्त हिरवी तरुणाई…मधलं हिंदोळ्यावरचं जगणं म्हणजे जणू वैराण एकाकी आभाळात गोंदणच ! मुसळधारांच्या अनावरपणात दडलेली ही आषाढभिजली हिरवी हाक ऐकावी नि दुःखाच्या काट्यावर आनंद तोलावा. भोयरेकरांची कविता अशा जगण्याशी नातं सांगते .
आला चैताचा महिना
रानी फुलले पळस…
पाही रानीचं कवतिक
उंच डोंगरी कळस…
– असे पंखबळावर नवे मंगलमंत्र घेऊन खग आले, की घनतिमिराचे कवच भेदून नवा थवा उडू लागतो.असे नवे थवे मग नवक्षितिजावर केवळ उजेड मांडत येतात. जणू चैत्रजागरच सांडत येतात. धुळीवर उद्याच्या भव्य निर्मितीचे कोश असे दिसू लागतात. झाडांचा म्हणून एक वसा असतो. तो घ्यावा लागतो. एकदा तो घेतला, की माणसं उतत नाहीत. मातत नाहीत. आणि रस्ते बेईमान झाले, तरी हे हिरवेपण आयुष्याला अर्थ देत राहते. पदरात प्रसन्नता बांधून देणारा हा अनुभव भोयरेकर अशा शब्दांत मांडतात :

शिशिरामधल्या पानगळीचे
अश्रू नको सांडू…
वसंतातल्या हिरवाईचा
खेळ नवा मांडू …
माणसांच्या मनाचा हिरवेपणा गिळून टाकणारी जगरहाटी भवताली असताना , अशा विमनस्क अवस्थेत ही हिरवीकंच नवलाई आमचा ऐन श्वास बनणार आहे की नाही ? शाश्वत निसर्गाचं हे स्वगत भरभरुन ऐकणारी मनं तयार होणार आहेत की नाही ? तशी ती होणार नसतील, झाडांचं हे हिरवेपण आपल्या रक्तातून वाहणार नसेल, तर आपले इतर उत्सव भलेही उसन्या अवसानानं आपण साजरे करु, फुलांचे नि तरुवरांचे उत्सव मात्र साजरे करण्याचं भाग्य आपल्या वाट्याला येऊ शकणार नाही. सिमेंटच्या निष्प्राण जंगलात आमचे ते झाडांचे पार हरवले. निथळते रंगमेळ चिडीचूप झाले. पाना-फुलांनी झाकलेली ऊबदार घरं नजरेआड झाली. अशी दृष्टी झाकोळून टाकणारी भकास भगभग पुढच्या पिढ्यांच्या लल्लाटी बांधणं भोयरेकरांना मंजूरच नाही. हिरव्या पालवीची हरवत चाललेली शाश्वती देणारी कविता म्हणूनच भोयरेकरांच्या लेखणीचा विषय होऊन बसली आहे.फांद्यांना शब्द फुटताना झाडांचं झालेलं गाणं ते कान भरुन ऐकतात. हिरव्या अक्षरातलं हे गोंदण ओंजळीत जपतात. झाडांच्या आणा- शपथा कुरवाळतात. त्यामुळंच आयुष्याची संध्याकाळ जवळ आली, तरी ती त्यांना फारशी जाणवत नाही. भोयरेकरांचे शब्द असे पाना-पानांत उजळून निघाले आहेत :

चार सुकलेल्या बिया
रानवार्‍यानं उडाल्या…
थोडी पाहुनिया ओल
माझ्या मातीत बुडाल्या …
ओल्या मातीत काय नसतं ? ओली माती म्हणजे नवसृजनाची आस. ओली माती म्हणजे चैतन्याचा कोंभ. ओली माती म्हणजे हिरव्या स्वप्नांचा ध्यास. ओली माती म्हणजे भविष्य पाहण्याची दृष्टी. ओल्या मातीच्या दृष्टीत असते भविष्यातली सृष्टी. भोयरेकरांचं अनुभवविश्व बहुपेडी. ते शिक्षक होते. प्राध्यापक होते.बॅन्क अधिकारी होते.असा अफाट अनुभवांचा कॅन्व्हास पाठीशी असतानाही व्यक्तिसापेक्षता टाळून त्यांची कविता सबंध निसर्गालाच कवेत घेऊन पाहते. त्यामुळे त्यांच्या कवितांचा पोत सर्वेशाम सारखा वाटेलही. पण मला तो कवीचा दोष वाटत नाही. चारोळ्यांना हल्ली बरे दिवस आलेत. म्हणून भोयरेकरांनी हा लोकप्रिय फाॅर्म हाताळलाय् असं वाटत नाही. मुळात रुढार्थानं त्या चारोळ्याच नाहीत. मळलेल्या वाटेनं जाणं भोयरेकर नाकारतात. स्वच्छ व प्रांजळ मराठीत इतकी उत्कट कविता लिहिणारे कवी सहसा वाचनात येत नाहीत. भोयरेकरांची कविता गळ्यात हात न घालता थेट काळजात कधी शिरते, हेही कळत नाही.

आली रातकिड्या जाग
गाती धृपद-धमार…
ऐके अंधारी मैफल
कान देऊनी शिवार…
— असा त्यांच्या कवितेत एकाच वेळी सुकोमलता, विमुक्तपणा , संयम, मार्दव, गांभीर्य आणि नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते.अशा वेळी तिचा जोश, तिचा नाद, तिचं सामर्थ्य , तिची अवखळ झेप आपलं मन वेधून घेते. तर कधी लपत-छपत हिरवळीतून वाहणार्‍या एखाद्या झुळझुळ निर्झराप्रमाणे ती अंग चोरुन नाजुकपणानं अवतरते, तेव्हा तर ती चित्रमयीच बनते ! तरल संवेदना हे  ‘जबाब ओल्या मातीचे’ चे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल :
देहाने पडावे

तुझ्या मुळापाशी,
हिरवे हात माझे
भिडावे नभाशी…
माणसं ओळख विसरतात. आसवं विसरतात. दूध विसरतात. रक्तही विसरतात. दिठी विसरतात आणि अंधारात तेवत विझत चाललेल्या वातीही विसरतात. भोयरेकरांनी ही घुसमट, घालमेल दूर करीत, डेरेदार झाडांचं समृद्धपण माणसांचं जगणंही कसं आश्वासक करतं, हे इथं सांगून टाकलंय्.
रोजमर्रा जगण्याच्या गर्दीत हरवलेली उमर त्यांना अशी ओल्या मातीनं दिलेल्या जबाबांमध्ये सापडली आहे. म्हणूनच ओल्या मातीचे हे जबाबही झालेत…लाजवाब !!

विद्याभारती प्रकाशन,लातूर च्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वतः कवी विजय भोयरेकर यांनीच रेखाटले असून ते ही खूप आकर्षक झाले आहे.
एकंदरीत सर्व काव्य प्रेमींनी अनुभवावा असाच हा काव्य संग्रह आहे.

जयप्रकाश दगडे

– परीक्षण : जयप्रकाश दगडे. लातूर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments