नर्मदायन (अर्थात नर्मदा परिक्रमा)
सध्या नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नर्मदा नदीचे पात्र उजव्या हाताला ठेऊन उगमापासून संगमापर्यंत आणि संगमापासून उगमापर्यंत चालणे याला “पदक्रमा” तर वाहनातून असे करणे याला “परिक्रमा” असे म्हणतात.
भारतातील सर्वात प्रमुख अशा सात नद्यांमध्ये नर्मदा ही एकमेव नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. म्हणजे पश्चिम वाहिनी आहे. हिंदू संस्कृतीमध्ये या नदीला अनन्यसाधारण महत्व आहे. हिला शंकराची कन्या मानले जाते.
भारतातील सात नद्यांचे प्रत्येकीचे असे एक वैशिष्ट्य, अधिष्ठान आहे. गंगा ही ज्ञानाचे प्रतीक, यमुना ही भक्तीचे, ब्रम्हपुत्रा ही तेजाचे, गोदावरी ही ऐश्वर्याचे, कृष्णा ही मनोकामनाचे, सरस्वती ही विवेकाचे तर नर्मदा ही वैराग्याचे अधिष्ठान समजली जाते. समस्त हिंदू हे नर्मदेच्या निर्मलता आणि मांगल्याचे पूजक आहेत. अशा पूजनीय नर्मदामैयेची पद्क्रमा करणाऱ्यास मोक्षप्राप्ती होते, अशी श्रध्दा आहे.
अमरकंटक ते रेवासागर हा सुमारे दोन्ही तीरांवरुन नर्मदा परिक्रमेचा एकूण मार्ग तीन हजार किमीचा आहे. मार्कंडेय ऋषी यांनी मॉं नर्मदा व तिच्या उपनद्या कोणालाही न ओलांडता केलेली व आजपर्यंत कोणीही न करू शकलेली अशी एकमेव नर्मदा पदक्रमा आहे. यासाठी त्यांना पंचेचाळीस वर्ष लागली.
लेखक उदय नागनाथ यांनी ३२०० किमी परिक्रमा केल्यानंतरचे अनुभव या पुस्तकात दिले आहेत. लेखकानं प्रारंभी दिलेली धार्मिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि शेवटी दिलेल्या उपयुक्त सूचना यामुळे या पुस्तकाची उपयुक्तता वाढली आहे. हे पुस्तक नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही. ज्यांनी यापुर्वी परिक्रमा केली आहे त्यांच्या आठवणींना उजाळा मिळेल.
हे पुस्तक वाचल्यानंतर नर्मदा परिक्रमा हिंदू भाविकांच्या मर्मबंधातली ठेव कां झाली आहे ? याचे उत्तर मिळते. प्रत्येकाने हे पुस्तक नुसतं वाचू नये तर संग्रही ठेवावे ही अपेक्षा. लेखक श्री उदय नागनाथ यांचे अभिनंदन आणि पुढील उपक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा.

– परीक्षण : दिलीप प्रभाकर गडकरी. कर्जत – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800