अशोक जाधव यांचे “भंगार” पुस्तक नुकतंच वाचलं. त्यांचा जन्म भटक्या गोसावी समाजात झाला. पत्रा, लोखंड, बाटल्या, प्लॅस्टिक असं लोकांनी उकिरड्यात टाकलेलं गोळा करून ते भंगारवाल्याला विकून हा समाज गुजराण करत असे.
या समाजातील लहान मुले व महिला खांद्याला मोठी झोळी अडकवून, भंगार गोळा करतात. उकिरड्यात टाकलेलं अन्न कुत्र्यांनी, डुकरांनी खाऊन शिल्लक असेल तर ते खायचे, त्याने पोट भरले नाही तर भिक मागून पोट भरायचे. त्यांचे पुरुष बायका मुलांनी जमा केलेले भंगार विकून त्या पैशांत स्वतःपुरते जेवण व दारू खरेदी करायचे. त्या पुरुषांना बायका मुलांबद्दल जराही दया माया नसायची. घरी यायला बायकांना उशीर झाला तर बायकांना शिवीगाळ करून मारहाण करायचे.
गोसावी समाज परंपरेनं घेरलेला होता. जातपंचायत या समाजाचं सर्वोच्च न्यायालय.तेथील पंच म्हणजे परमेश्वर ! त्यांच्या जिभेवर येणारा शब्द म्हणजे कायदा. या समाजात स्त्रीचे जीवन अतिशय लाजिरवाणं होतं. स्त्रियांवर समाजातील व समाजाबाहेरील व्यक्तींकडून अत्याचार केला जात होता परंतु स्त्रियांना कोणी वाली नसल्याने त्यांना अन्याय सहन करावा लागत होता.या समाजात शिक्षणाला सक्त विरोध होता.
गोसावी समाजाची स्वतःची अशी भाषा, बोली होती. ती कुठल्याच मान्य सूची व सर्वेक्षणात नोंदलेली नव्हती. ती हिंदी, मराठी, मारवाडी, राजस्थानी, गुजराती असा साऱ्यांचा मेळ घेत स्वतःचं स्वतंत्र रूप, शब्दकळाघेऊन बनली आहे. अशा समाजात लेखक अशोक जाधव यांचा जन्म झाला. त्यांनी अनेक अडचणींवर मात करत बी.ए., बी.एड्. पर्यंत शिक्षण घेतलं. शिक्षक झाले. बहिणीला शिकवले. ती डॉक्टर झाली.त्यांनी फक्त आपला स्वतःचा व कुटुंबाचा विकास केला नाही तर, त्यांनी गोसावी समाजाचं संघटन केलं. नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करून आपल्या समाजाचं अस्तित्व, महत्व राजकीय पटलावर नोंदवलं. समाजाची पतसंस्था काढली.
अशोक जाधव यांनी अल्पवयात जे कार्य केलं, लेखनात जी प्रगल्भता दाखवली त्याला तोड नाही.
अशोक जाधव फक्त कार्य करून थांबले नाहीत तर त्यांनी समाजातील समस्यांबाबत व्यथा पुस्तक रूपाने सर्वांसमोर मांडल्या. तसं बघायला गेलो तर हे पुस्तक म्हणजे अशोक जाधव यांचे आत्मचरित्र आहे. परंतु पुस्तक वाचल्या नंतर वाचकांच्या लक्षात येते की हे भटक्या गोसावी समाजाचं शब्दचित्र बनलं आहे.
भंगार पुस्तकाची पहिली आवृती ३१ ऑक्टोंबर २०१७ रोजी प्रकाशित झाली. अवघ्या तीन वर्षात त्याच्या पाच आवृत्या निघाल्या. यावरून हे पुस्तक किती लोकप्रिय झालं आहे हे लक्षात येते. तसं बघायला गेलो तर सर्व पुस्तक वाचल्यानंतर यावर चित्रपट निघू शकतो, हे प्रकर्षाने जाणवते. अशोक जाधव यांनी त्याबाबत जरूर प्रयत्न करावा.
लेखक अशोक जाधव यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

– परीक्षण : दिलीप प्रभाकर गडकरी. कर्जत – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800