“एक झंझावात :कॉ. के. एन. थिगळे”
“एक झंझावात : कॉ. के. एन. थिगळे” या पुस्तकाचे छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच प्रकाशन झाले आणि हे पुस्तक हाती आले.
सांगली बँकेतून निवृत्त झालेल्या नरेंद्र थिगळे यांनी हे पुस्तक संपादित केले असूनस्नेह प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रकाशित केले आहे.
केवळ स्टेट बँक ऑफ हैदराबादमधीलच नव्हे तर एकूणच बँकिंग उद्योगातील कर्मचाऱ्यांचे लाडके नेते तसेच बँक कर्मचारी संघटनेच्या कार्याची धुरा समर्थपणे सांभाळणारे आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे, सर्वांशी आपुलकीने वागणारे कॉम्रेड के. एन. थिगळे यांच्याबद्दलच्या आपल्या भावना लेखांच्या आणि कवितांच्या माध्यमातून अनेक बँक कर्मचाऱ्यांन, अधिकाऱ्यांनी या पुस्तकात व्यक्त केलेल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर {त्यावेळचे औरंगाबाद} येथील सराफ्यामध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शाखेत १९६७ साली रुजू झाल्यापासून ते २००६ मध्ये निवृत्त होईपर्यंतचा कॉम्रेड थिगळे यांचा बँक कर्मचारी ते बँक कर्मचाऱ्यांचे नेते असा प्रवास या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो.एक बँक कर्मचारी म्हणून बँकेत रुजू झालेले कॉम्रेड थिगळे हे सुरुवातीला बँकेच्या औरंगाबाद शाखेतील सचिव झालेले असले तरी निवृत्त होतांना ते स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टाफ असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी होते. इतकेच नव्हे तर २००२ साली केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेचे वर्कमन डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती केली. २००५ साली त्यांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहा असोसिएट बँकांच्या स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉइज असोसिएशनच्या चेअरमनपदी निवड झाली. या सर्व पदांवर असतांना त्यांचे वास्तव्य जरी हैदराबाद येथे असले तरी बँकेच्या कानाकोपऱ्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे ते बारकाईने लक्ष ठेवून असत.
बँकिंग कर्मचारी संघटनेच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ज्येष्ठ कामगार नेत्यांमध्ये कॉ. के. एन. थिगळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे देश पातळीवरील नावाजलेले कामगार नेते कॉ. प्रभातकार, कॉ. एच. एल. परवाना, कॉ. तारकेश्वर चक्रवर्ती, कॉ. के.के. मुन्डुल, कॉ. डी. पी. चड्डा, कॉ. के. एन. संपत, कॉ. सुंदरेशन, कॉ. सुरेश धोपेश्वरकर, कॉ. देविदास तुळजापूरकर या आणि इतर नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून कॉ. थिगळे यांनी बँक कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी वेळोवेळी लढा दिला.
बँकेतील सेवानिवृत्तीनंतरसुद्धा श्री थिगळे यांचे समाजकार्य अविरत चालू आहे. श्री थिगळे यांच्या बँक कर्मचारी संघटनेतील नेतृत्त्वाविषयीचा तसेच ते अद्याप करीत असलेल्या इतर समाजकार्याविषयीचा संपूर्ण लेखाजोखा विविध लेखांद्वारे या पुस्तकात आपणास वाचायला मिळतो.
लढवय्ये, खंबीर आणि मितभाषी नेतृत्त्व तसेच सच्चा मित्र आणि अजातशत्रू नेता असे कॉ. के. एन. थिगळे यांचे वर्णन त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी या पुस्तकात लिहिलेल्या लेखांमध्ये केलेले आहे. म्हणूनच हे पुस्तक म्हणजे अजातशत्रू नेत्याचे यथार्थ वर्णन आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
कॉ. थिगळे यांना दीर्घायुरारोग्य चिंतितो आणि थांबतो.
— परीक्षण : उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
एक झंझावात पुस्तकाचा सुरेख परिचय आ. उध्दव भयवाळ सर
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.