मंगल – दीप
न्युज स्टोरी टुडे या पोर्टल मुळे आणि सोशल मीडिया च्या स्वरूपामुळे माझा देश विदेशातील व्यक्तींशी संपर्क येत असतो आणि निखळ आनंदाची देवाणघेवाण होत असते.
अशीच एक ओळख झाली, ती सौ मृदुला राजे यांच्याशी. त्यांनी त्यांचे वडील कामगार नेते, कामगारांचे वकील म्हणून ख्यातप्राप्त कॉम्रेड मदन फडणीस यांच्या जीवन कार्यावरील छान लेख पाठविला. तो पोर्टलवर प्रसिध्द ही झाला. त्यात सर्व काही कल्याण, मुंबईशी निगडित असल्यामुळे मला वाटले, मृदुलाताईही मुंबई, ठाणे इकडेच रहात असतील. पण एकदा चॅट करीत असताना कळाले, त्या चक्क जमशेदपूर येथे राहतात. मी सहज विचारले, ‘अरे बाप रे ! तुम्ही इतक्या दूर कुठे, कशा पोचलात ?’ तर त्या म्हणाल्या, ‘थांबा, मी तुम्हाला माझ्या आईचे चरित्र लिहिलेले पुस्तक पाठवते, ते वाचून तुम्हाला सर्व काही कळेल.’ सांगितल्या प्रमाणे खरोखरीच त्यांनी त्यांचा काव्य संग्रह आणि आई वर मराठी आणि इंग्रजीत लिहिलेले चरित्रपर पुस्तक पाठविले.
तशी खुप जणं अगत्याने पुस्तके पाठवित असतात. काही वेळा समक्ष भेट देतात. पण इच्छा असूनही सर्व वाचून होतातच असे नाही. पण इतक्या दुरून, हिंदी भाषिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तीने आवर्जून पाठविलेले पुस्तक आणि ५० वर्षांपूर्वी इतक्या दूर गेलेल्या मृदुला ताईंचा जीवन प्रवास कळण्यासाठी मी पुस्तक वाचायला घेतले आणि अक्षरशः ते एका बैठकीत वाचून संपविले.
मृदुलाताईंच्या आई, सौ मंगला मदन फडणीस यांचा जीवन काल हा १९२६ ते १९९३ असा आहे. कल्याणचे प्रसिध्द वकील अण्णासाहेब सुळे यांच्या वाड्यात, अतिशय संपन्न परिस्थितीत वाढलेल्या मंगलाताई आतेभाऊ च असलेल्या मदन फडणीस यांच्याशी विवाहबद्ध झाल्या नंतर माटुंगा येथील २ खोल्यांमध्ये कसा आनंदाने संसार फुलवते, दिर नणंदा, स्वतःच्या तीन मुली, यांचे संगोपन करते आणि इतकेच करून न थांबता, ज्या काळात बाल शिक्षणाचे कुणालाच महत्व कळलेले नसताना आपल्या मैत्रिणी गुलाबताई व प्रभाताई यांच्या मदतीने ठाणे येथे “बालविकास मंदिर संस्था” उभारते व ज्या जिद्दीने संस्था पुढे पुढे नेत राहते यावरून त्यांचे कर्तृत्व सिद्ध होते.
ठाणे आणि तेथील शाळा, संस्था हेच आईचे कार्यक्षेत्र राहिल्याने तिने ठाणे येथेच राहणे संयुक्तिक ठरले असते. पण बहुधा वडिलांच्या सोयीसाठी आयुष्यभर त्या आधी माटुंगा आणि पुढे मरोळ, अंधेरी येथून ठाणे येथे लोकल ने आणि पुढे रिक्षा ने जा ये करीत राहिल्या, यात त्यांची त्यागी वृत्ती दिसून येते. तसेच ज्या काळात स्त्रिया सहसा घराबाहेर पडत नव्हत्या आणि क्वचित कुणी बाहेर पडल्याच तर सुरक्षित नोकरी करत असायच्या अशा काळात त्यांनी कुठल्याही प्रकारचे पाठबळ नसताना सर्व महिला असलेली शिक्षण संस्था केवळ उभारलीच नाही तर ती सक्षमपणे वाढवत नेली हे त्यांचे कर्तृत्व फारच लक्षणीय आहे. त्यांचे पती कॉम्रेड मदन फडणीस यांनीही तथाकथित पुरुषी मानसिकता न ठेवता त्यांना सतत सहकार्य केले यावरून त्यांचे खरोखरीचे पुरोगामित्व दिसून येते.
आजच्या काळातही कुणी आपली मुलगी दूर कुठे द्यायला मागत नाही. पण पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात मुलगे चांगले आहेत म्हणून या दांपत्याने थोरली मुलगी, लेखिका सौ मृदुलाताई यांच्यासाठी जमशेदपूर येथील सतीश राजे यांचे स्थळ पसंत केले. तर दुसरी मुलगी मनोज हिच्यासाठी दिल्ली येथील दिलीप बावकर यांचे स्थळ पसंत केले.
पण ती निवड चुकल्याची खंत त्यांना पुढे सतावत राहते. मनोज चे पती यांना सेटल करण्यासाठी आई वडिलांनी केलेले प्रयत्न, नंतर त्यांच्या गायब होण्यामुळे केवळ मनोज च नाही तर सर्वांचे जीवन किती सैरभैर होते, याचे हृदयद्रावक चित्रण पुस्तकात केले आहे. मात्र तिसरी मुलगी शर्मिला वकील होऊन पुढे तिला सिनियर असलेले वकील लक्ष्मीकांत साटेलकर यांच्याशी विवाहबद्ध होऊन पुढे दोघेही आईवडिलांची शेवटपर्यंत काळजी घेतात याचा गौरवाने उल्लेख केला आहे. तसेच साटेलकर यांचा मुलगा एम डी डॉक्टर होतो या विषयी सार्थ अभिमान व्यक्त केला आहे.
आईच्या मृत्यूचा प्रसंग वाचताना मन हेलावून गेले. एकीकडे भाचीच्या लग्नासाठी आलेली पाहुणे मंडळी आणि त्याच क्षणी आईचा अचानक मृत्यू यामुळे “पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा” या उक्तीच्या प्रचितीची जाणिव आपल्याला होते.
तसेच आई गेल्या नंतर संस्थेत झालेले राजकारण आपल्याला अस्वस्थ करते.
खरं म्हणजे हे पुस्तक केवळ मृदुलाताईंच्या आईचे चरित्र न राहता कळत नकळत चार पिढ्या, चार पिढ्यांची माणसं यांचेही जीवन उलगडत जाते. पुस्तकाची शैली, भाषा अशी चित्रमय आहे की, असे वाटते, सर्व काही आपल्या समक्ष घडत आहे. चरित्रपर पुस्तक न वाचता आपण एखादी कादंबरी वाचत आहोत, असेच आपल्याला क्षणोक्षणी वाटत राहते, हे या पुस्तकाचे मोठेच यश होय.
पुस्तकातील विविध प्रसंगांचे सुंदर वर्णन केले असल्याने त्या काळातील जनजीवन, नाते संबंध यांचे ही हृददर्शन या पुस्तकातून होते. इतकी वर्षे लेखिका महाराष्ट्राबाहेर रहात असून ही पुस्तक वाचताना हा दुरावा अजिबात जाणवत नाही किंवा भाषेवर कुठेही हिंदी चा प्रभाव पडलेला नाही.
एक छान जीवन विषयक आपली दृष्टी प्रगल्भ करणारे पुस्तक वाचल्याचा आनंद हे पुस्तक आपल्याला नक्कीच देते. याबद्दल लेखिका सौ मृदुलाताई यांचे मनःपुर्वक अभिनंदन.
आणि हो, आजच्या काळात मुलं, मुली आई वडिलांच्या आवडीनिवडींकडे लक्ष देत नाही, त्यांना पुरेसा वेळ देत नाही, अशी सार्वत्रिक ओरड असताना त्यांच्या कन्येने, प्राची हिने केवळ मराठी पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मदत न करता त्याचे इंग्रजी भाषांतर करून पुस्तक इंग्रजीतही प्रकाशित केले याबद्दल तिचे करावे तितके कौतुक थोडेच ठरेल.
— परीक्षण : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800