“समर्पण”
श्री.अरुण पुराणिक यांचे “समर्पण” हे आर्या पब्लिकेशन आणि डिस्ट्रीब्युटर्स यांनी नुकतेच प्रकाशित केलेले पुस्तक मी वाचले आणि अक्षरशः मन गहिवरलं.
“समर्पण” ही, अरुण पुराणिक यांच्या स्वतःच्या सहजीवनाची कहाणी आहे. ती वाचत असताना, पती-पत्नीचं नातं कसं असावं, याचा पावलोपावली बोध होतो.
या कहाणीची सुरुवातच, “आज जो काही मी आहे तो तिच्यामुळे” या वाक्याने पुराणिक करतात. पत्नीने आयुष्यातल्या चढउतारात, सुखात, दुःखात, अडचणीत, अत्यंत प्रेमाने केलेल्या सोबती विषयी व्यक्त केलेली कृतज्ञता त्यांच्या या पहिल्या वाक्यातच वाचकाला जाणवते. एका सुंदर नात्याचीच ही कहाणी आहे. ही कहाणी परस्परावरील प्रेमाची, विश्वासाची, आधाराची, आहे.
“समर्पण” हे पुस्तक वाचताना, वाचक या कथेत मनोमनी गुंतून जातो. लेखकाबरोबरच तोही भावनिक होतो, हळहळतो. हे सारं, यांच्याच बाबतीत का घडावं ? असं सतत वाटत राहतं. दोघांच्याही हिम्मतीला आणि गाढ प्रेमाला, भरभरून दाद द्याविशी वाटते.
शिक्षकी पेशापासून, आयुष्याची सुरुवात झालेल्या एका युवकाची ही कथा. तसं पाहिलं तर सर्वसाधारणपणे, मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याची ही एक साधी कहाणी. नोकरी, लग्न, संसार, मुलंबाळं, जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी, बेरजा वजाबाक्या, प्रियजनांचे मृत्यू, घटित – अघटित या साऱ्यांचा एक कडू गोड जीवनपट. तरीही हे पुस्तक वाचत रहावसं वाटतं. ते रटाळ , कंटाळवाणं वाटत नाही कारण अत्यंत प्रामाणिकपणे, सहज, सोप्या, ओघवत्या आणि भावभऱ्या शब्दातून, व्यक्त झालेलं हे लेखन असून त्यातून झिरपणारं, दवबिंदू सारखं निर्मळ, मनाला भिडत जात असलेलं प्रेम ,प्रेम भाव विश्वासाचं देणं आहे.
अत्यंत क्लेषदायक परिस्थितीतही पतीचा वाढदिवस प्रेमाने साजरी करणारी पत्नी असो, किंवा पत्नीच्या अगतिक अवस्थेत तिला स्नानासाठी वात्सल्याने मदत करणारा पती असो, हे प्रसंग वाचताना अंग शहारतं. मी वात्सल्य हा शब्द वापरला कारण, प्रीत, प्रेम, माया हे समानार्थी शब्द असले तरी वात्सल्य या शब्दातला ओलावा या द्वयीत मला जाणवला. शारिरिक प्रेमाच्या पलीकडे गेलेला हा अनुभव होता.
“समर्पण” ही एक विविध रंगी प्रेमकथा आहे असंच मी म्हणेन. संसारात पती-पत्नीचं एकमेकांशी असलेलं घट्ट नातं काट्याकुट्याची वाट ही आनंदाने पार पाडू शकतं, याचाच वस्तुपाठ आहे.
एकाच माणसाच्या आयुष्यात इतके वेदनादायक वियोग का असावेत ? आणि त्यांनी ते कसे सहन केले ? याचेही धक्के वाचकाला बसतात. पण जेव्हा लेखक म्हणतो की, “आज जो काही मी आहे तो तिच्यामुळेच…” यातली सकारात्मकता ही खूप महत्त्वाची आहे. ही कथा निराशावादी नाही.यात दु:खाला कुरवाळून बसणं नाही. रडगाणं नाही. कसलीही तक्रार नाही. आहे ती फक्त स्वीकृती. हेच नक्षत्राचे देणे, असे समजून केलेला स्वीकार आणि हाच या कथेचा खरा आत्मा आहे. गीता वाचणे आणि प्रत्यक्ष गीता जगणे यात खूप फरक आहे. “समर्पण” मध्ये गीतेतलं जगणं जाणवतं.
मी एवढंच म्हणेन की ही एक जिद्दी, चिवट, संस्कारित, चारित्र्यशील, स्थिर मानसिकतेची, सुंदर कथा असून जरुर वाचावी अशीच आहे.
श्री.अरुण पुराणिक यांच्या साहित्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !! आणि त्यांचे उर्वरित आयुष्य, सुखा समाधानाचे व निरामय आरोग्याचे जावो !! हीच प्रभु चरणी प्रार्थना !!
— परीक्षण : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800