कथा एका आर्थिक घुसमटीची
मराठी साहित्याच्या क्षेत्रात आधुनिक लेखकांनी कथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारातून मानवी जीवनाचे आणि समाजातील स्थित्यंतराचे विविध पैलू रेखाटले आहेत. मात्र आजकाल कादंबरी हा प्रकार समाजजीवनावर खूप मोठा प्रभाव टाकणाऱ्या घटना चित्रित करताना दिसतो. असे असले तरी आधुनिक जीवनातील आर्थिक पैलू रेखाटणारे साहित्य फार कमी आढळते. आजचे लोकजीवन बँकिंग क्षेत्राने पूर्णपणे व्यापले गेले असले तरी मराठी साहित्यात त्याचे प्रतिबिंब अभावानेच दिसते.
या पार्श्वभूमीवर ‘अनघा प्रकाशन’ तर्फे नुकतीच प्रकाशित झालेली रामदास खरे यांची ‘ लॉस्ट बॅलन्स’ ही पहिलीच कादंबरी वाचकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. या कादंबरीची पाठराखण (ब्लर्ब) करताना डॉ. वंदना बोकिल – कुलकर्णी यांनी नमूद केल्यानुसार रामदास खरे यांच्या ‘लॉस्ट बॅलन्स’ या कादंबरीने बँकिंग क्षेत्राचे ताणेबाणे परिश्रमपूर्वक उलगडून दाखविले आहेत. लेखक खरे आपल्या मनोगतात म्हणतात की या कादंबरीचा विषय त्यांच्या मनात अनेक वर्षे घुमत होता. याशिवाय त्यांनी अनेक दिग्गज लेखकांच्या कादंबऱ्या वाचल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी ज्येष्ठ कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांचं ‘एक मुक्त संवाद : उद्याच्या कादंबरीकारांशी’ हे पुस्तक मिळवलं आणि वाचून काढलं. अर्थात पेंडसे यांच्या गाठीशी कादंबरी लेखनाचा जबरदस्त अनुभव असल्याने या पुस्तकातले ‘कादंबरी’ या विषयावर असलेले अभ्यासपूर्व विवेचन खरे यांना ‘लॉस्ट बॅलन्स’ ही कादंबरी लिहिताना मार्गदर्शक ठरलं.
या बाबतीत आणखी जमेची बाजू म्हणजे रामदास खरे यांचा ‘केमिस्ट्री’ हा गूढकथासंग्रह देखील यापूर्वी प्रकाशित झालेला आहे. त्यामुळे या कादंबरीतील बँकिंगसारख्या आर्थिक विषयावर आधारलेले कथानक उत्कंठावर्धक आणि रोचक बनविण्यात खरे यशस्वी झालेले दिसतात.
या कादंबरीत खरे यांनी आवश्यक तेथे लोकांच्या तोंडी असलेले बँकिंग विषयाचे इंग्रजी शब्द मराठी लिपीतून दिले असल्याने वाचकांना ही कादंबरी रोचक आणि प्रवाही वाटेल.
ही कादंबरी आजकालची वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून सतत प्रकाशात येणाऱ्या सहकारी बँकांतील आर्थिक घोटाळ्याच्या घटनेवर आधारित आहे. एकूण २० प्रकरणे आणि उपसंहार यातून कादंबरीचे संपूर्ण कथानक उलगडत जाते आणि वाचकांचे कुतूहल शेवटपर्यंत जागे ठेवते.
लेखक खरे यांनी कादंबरीच्या मध्यवर्ती कथानकात मुख्यतः ‘रत्नावली बँक’ आणि ‘आरएम बँक’ या सहकारी बँकांतील आर्थिक घडामोडी आणि प्रसंग अत्यंत कुशलतेने गुंफल्या आहेत. असे करताना त्यांनी या बँकांचे कर्मचारी, अधिकारी, रिझर्व बँक, सहकार खाते, प्रशासक आणि ग्राहक यांच्यावर होणारे परिणाम वास्तविक दृष्टिकोनातून टिपले आहेत. त्यामुळे ही कादंबरी वाचताना वाचक स्वतः तिथे स्वतः वावरत असल्याचा भास होतो आणि तो त्यात पूर्णपणे गुंतत जातो.
कादंबरीच्या पहिल्या १४ प्रकरणात रत्नावली बँकेबाबतच्या घटना आणि त्यातील पात्रे यांचा समावेश आहे तर पुढील सहा प्रकरणात आरएम बँकेतला घोटाळा तसेच तिचा रत्नावली बँकेत विलय होईपर्यंतचा घटनाक्रम आहे. कादंबरीच्या कथानकाचा असा विशाल आणि गुंतागुंतीचा पट खरे यांनी अतिशय विस्ताराने विणला आहे की वाचकांच्या मनात उठलेली कुतुहलची वावटळ कादंबरीच्या अखेरपर्यंत शांत होत नाही.
पहिल्याच प्रकरणात कादंबरीची सुरुवात एका धक्कादायक बातमीने होते. रत्नावली बँकेच्या टिळक रोड शाखेचे मॅनेजर सुभाष लेले यांना ईमेलवर आलेल्या संदेशात रिझर्व बँकेने रत्नावली बँकेवर लादलेल्या निर्बंधांचे उल्लेख असतात. थोड्याच वेळात ही बातमी बँकेत सगळीकडे पसरते आणि स्टाफमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. त्यानंतर लवकरच मीडियामध्ये ही बातमी प्रसारित होऊन ग्राहकामध्ये असंतोष उसळतो. कादंबरीची अशी सनसनाटी सुरुवात करून खरे यांनी गेल्या काही वर्षात बँकिंग क्षेत्रात झालेल्या अनागोंदी कारभाराचे वास्तव चित्र उभे केले आहे. या कादंबरीत तिसऱ्या प्रकरणात सिनेमात वापरतात तसे ‘फ्लॅशबॅक’ हे तंत्र वापरुन रत्नावली बँकेची स्थापना दादासाहेब पुराणिक यांनी किती कष्टाने केली आणि नंतर संचालक मंडळातील मनोहर शिंदे यांच्या गटबाजीमुळे निष्ठावान दादासाहेबाची बँकेवरील पकड कशी ढिली झाली याचे वर्णन आहे. मनोहर शिंदे प्रभावी होऊ लागले तेव्हा नानासाहेब सरपोतदार यांनी संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिंदे याना आव्हान देऊन आपले पॅनल निवडून आणले. परंतु नानासाहेब देखील राजकारण खेळू लागल्याने त्यांचे मनमानी वाढू लागली. बँकेच्या मॅनेजर्सना पुढे करून संचालक बोर्डात नानासाहेब कर्जे मंजूर करू लागले तेव्हा बँकेची कर्जे ‘एनपीए’ (बुडीत कर्ज खाते) होऊ लागली. याच काळात वयोपरत्वे दादासाहेबांचे निधन झाले आणि बँकेचा प्रगतीचा आलेख खाली जाऊ लागला.
यापुढील प्रकरणात रत्नावली बँकेत कोणते प्रसंग आणि घटना घडल्या हे कादंबरीकार खरे यांनी अतिशय नाट्यमयरित्या परंतु वास्तविक वाटावे अशा प्रकारे मांडले आहे. कादंबरीच्या उत्तरार्धात ‘आरएम’ बँकेचा विषय हाताळला गेला आहे. पूर्वी ‘राणोजी मल्हारराव सहकारी पतपेढी’ म्हणून सुरू केलेल्या पतपेढीचे रूपांतर आरएम बँकेत झाले. असे असले तरी त्यांचे दोन पुत्र सहदेव आणि महादेव यांच्यातील भाऊबंदकीमुळे या बँकेची देखील रत्नावली बँकेप्रमाणे कशी दुर्दशा झाली हे या कादंबरीत मुळातून वाचायला हवे.
संक्षेपात सांगायचे तर सामान्य वाचकांना मुळात रुक्ष वाटणारा बँकिंगसारखा किचकट विषय लेखक रामदास खरे यांनी या कादंबरीत वाचकांना रुचेल आणि समजेल अशा भाषेत मांडला आहे. अर्थात स्वतः लेखक खरे यांना बँकिंग क्षेत्रात काम करण्याचा दीर्घ अनुभव असल्याने आणि त्यांना लेखनकला अवगत असल्याने त्यांनी या कादंबरीतून बँकिंगसारख्या दुर्लक्षित परंतु महत्वाच्या विषयाचे इंद्रधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे.
कादंबरीचे निवेदक म्हणून लेखक खरे यांनी घटनाक्रम वेगवान ठेवला असल्याने वाचकांची अधिरता वाढत जाते. या कादंबरीतील घटनांची मांडणी देखील नाट्यमय आणि वास्तवतेवर आधारित आहे. या पार्श्वभूमीवर या कादंबरीतीलची वेधक कथनशैली आणि त्यातील धावता घटनाक्रम यामुळे कोणताही वाचक ही कादंबरी हातात घेतल्यावर ती पूर्ण वाचल्याशिवाय थांबणार नाही असे वाटते.
एकुणात ही कादंबरी आर्थिक विषयातील कादंबरीच्या क्षेत्रात महत्वपूर्ण ठरेल याची खात्री वाटते. त्याचप्रमाणे वेगळी वाट चोखाळणाऱ्या लेखकांच्या यादीत रामदास खरे यांचे नाव निश्चितच घेतले जाईल असे वाटते. या अनोख्या विषयावरील कादंबरीसाठी लेखक रामदास खरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी शुभेच्छा !
— परीक्षण : रमेश सावंत. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मनापासून आभार सर. न्युज स्टोरी टुडे या पोर्टल द्वारे साहित्य, कला, संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा आणि त्यांच्या कलाकृतीचा परिचय अवघ्या वाचक रसिकांसाठी होत आहे याचे समाधान अधिक आहे. धन्यवाद.
मनापासून आभार सर. न्युज स्टोरी टुडे या पोर्टल द्वारे साहित्य, कला, संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा आणि त्यांच्या कलाकृतीचा परिचय अवघ्या वाचक रसिकांसाठी होत आहे याचे समाधान अधिक आहे. धन्यवाद.