Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

सुभेदारी’
                                     
सातारा जिल्ह्यातील महिमानगड नावाच्या छोट्याशा खेड्यात जन्मलेले आणि स्वकर्तृत्वाने आय.ए.एस. म्हणून निवृत्त झालेले अधिकारी अविनाश सुभेदार यांनी अलिकडेच आपले जीवनचरित्र ‘सुभेदारी’ या नावाने प्रसिद्ध केले आहे.

हे पुस्तक म्हणजे सुभेदार यांच्या कारकिर्दीतील घटनांची केवळ जंत्री नाही, तर एका निरपेक्ष, निस्पृह, व्रतस्थ, पारदर्शक आणि ध्येयनिष्ठ अधिकाऱ्याच्या जीवनप्रवासाचा गंगेच्या पाण्यासारखा पवित्र आणि खळाळता प्रवाह आहे. त्यात डुबकी मारल्याशिवाय तो अनुभवता येणार नाही.
 
आमच्या गोव्याचे कविवर्य बा. भ. बोरकर उर्फ बाकिबाब यांची एक कविता आहे.
‘नाही पुण्याची मोजणी,
नाही पापाची टोचणी,
जिणे गंगौघाचे पाणी….’
पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी आपल्या आवाजात ती अजरामर केली आहे. या कवितेच्या पहिल्या कडव्यातील ‘जिणे गंगौघाचे पाणी’ हा वाक्यांश निवृत्त सनदी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या एकंदर जीवनप्रवासाला अगदी समर्पक आहे.

गंगौघ म्हणजे गंगेचा प्रवाह. गंगेचे पाणी शुद्ध असते. अशुद्धी तिला स्पर्श करु शकत नाही. एवढेच काय पण गंगा आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची अशुद्धी घालवून त्याला आपल्यासारखीच निर्मळ बनवते, अशी भाविकांची श्रद्धा असते. सुभेदार यांचे अगदी असेच आहे. सरकारी सेवेत अगदी उच्च पदांवर काम करुन त्यांची कारकिर्द लख्ख राहिली आणि त्यांच्या संपर्कात जे जे आले, त्यांच्यावर सुभेदारांच्या या निर्मळपणाचा परिणाम झालाच. मलाही त्यांचा सहवास बराच काळ मिळाला. त्यांची एकंदर कार्यपद्धती, सरकारी नोकरी ही परमेश्वराने दिलेली लोकसेवेची संधी असे मानण्याची भूमिका आणि संपूर्ण सेवेत ‘सर्वसामान्य माणूस’ हा केंद्रबिंदू मानून त्यांनी केलेला व्रतस्थ जीवनप्रवास हा आजच्या काळात अगदी दुर्मिळ आणि आदर्श म्हणायला हवा.
           
सुरुवातीलाच हे सांगण्याचे कारण म्हणजे अलिकडेच प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘सुभेदारी’ हे आत्मकथनात्मक पुस्तक. अरविंद पाटकरांच्या मनोविकास प्रकाशनाने हे तिनशे पृष्ठांचे अप्रतिम पुस्तक प्रकाशित केले आहे. सरकारी नोकर आणि त्यातही सनदी अधिकारी म्हटले की एक विशिष्ट प्रतिमा डोळ्यासमोर उभी रहाते. गलेलठ्ठ पगार, गाडी, बंगला, नोकरचाकर आदि सुविधा आणि मलई ओरपण्याच्या अनंत संधी, असे हे साधारण चित्र असते. अनेक अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या त्यात भर घालतात. पण अशा अनेक संधी असूनही सुभेदारांनी आपली ३४ वर्षांची कारकिर्द संपूर्ण भ्रष्टाचारमुक्त आणि सरळ मार्गाने व्यतीत केली. सर्वसामान्य माणुस सरकारी खुर्चीतल्या माणसाला आपला तारणहार, मायबाप मानत असतो. तुमच्याकडे आशेने पाहणाऱ्या अशा माणसाला तुम्ही न्याय देऊ शकता. हा उपदेश नाही, स्वानुभव आहे, असे सुभेदार आपल्या मनोगतात सांगतात. त्यांच्या जीवनप्रवासाचे गमकच त्यांनी या वाक्यातून सांगितले आहे.

श्री. सुभेदार यांनी हे पुस्तक आपली आई शशिकला, वडील जगन्नाथराव यांना आणि ते सावंतवाडीत कार्यरत असताना त्यांना भेटलेले आध्यात्मिक गुरुवर्य भाऊ मसुरकर यांना अर्पण केले आहे. मनोगतात त्यांनी हे चरित्रात्मक पुस्तक लिहिण्यामागची आपली भुमिका स्पष्ट केली आहे. लेखकाच्या भुमिकेत शिरलेले सनदी अधिकारी काही साहित्यविश्वात अमर होण्यासाठी पुस्तक लिहित नाहीत. तर सेवा बजावताना त्यांना आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात, राबवलेल्या योजना, अधिकारपदाच्या माध्यमातून केलेली जनसेवा यांचे अनुभवकथन हा त्यामागचा उद्देश असतो. अधिकाऱ्यांच्या आठवणी या त्यांच्या वैयक्तिक असल्या तरी हे अनुभवकथन करताना त्यात ‘मी’ पणा न आणता शासकीय सेवेत येणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करणे, सेवेतील आव्हाने पेलण्याची स्फुर्ती देणे, या उद्देशाने आपण या लेखनप्रवासाला उद्युक्त झालो, असे ते सांगतात. त्यांनी विविध पदांवर असताना जे उपक्रम अतिशय परिणामकारकपणे राबवले, त्यांची वर्णने वाचल्यावर त्यांचा हा उद्देश नक्कीच सफल होईल, यात शंका नाही.

लोकसेवा आयोगाची उपजिल्हाधिकारी संवर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर श्री. सुभेदार यांनी रायगड जिल्ह्यात रोहा, अलिबाग वगैरे ठिकाणी तहसिलदार आणि प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना आपल्या कामाची चुणुक दाखवली. जांभुळपाडा येथे आलेल्या पुरानंतर त्यांनी केलेल्या पुनर्वसनाच्या कामाची आठवण तिथे ३५-४० वर्षांनंतर आजही काढली जाते. पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याचे रहिवासी असलेल्‌या सुभेदारांनी आपली कारकिर्द कोकणात सुरु केली आणि आपले तीन वर्षांचे प्रशिक्षण रायगड जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे पुर्ण केले. त्यांनी १९९० मध्ये त्यांची पहिली नियमित नियुक्ती सावंतवाडीचे ‘प्रांत’ किंवा उपविभागीय अधिकारी (महसुल) या पदावर झाली. १२ सप्टेंबर १९९० रोजी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. सावंतवाडीत त्यांनी इतके धडाकेबाज, न्यायबुद्धीचे आणि लोकोपयोगी काम केले की त्यांची तीन वर्षांची कारकिर्द संपल्यानंतर खास लोकाग्रहास्त्व त्यांना शासनाने त्याच पदावर एक वर्ष मुदतवाढ दिली. त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या केवळ सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला तालुक्यातच नव्हे, तर संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही सुभेदारांची आठवण अत्यंत शांत, संयमी, मितभाषी पण तितकेच कार्यक्षम, निरपेक्ष, समन्यायी आणि निर्भिड अधिकारी म्हणून आवर्जून काढली जाते.

सावंतवाडीच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी खुप महत्वाची कामे केली. मात्र वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या तलाठ्यांच्या एकगठ्ठा बदल्या, रेडी येथील निमको आणि गोगटे मिनरल्स या उद्दाम आणि बड्या खाण कंपन्यांवर ‘न भूतो’ अशी कारवाई करुन त्यांनी बसविलेली जरब, उद्योजक नाना कशाळीकर यांच्या भर वस्तीतील खडी क्रशरवर केलेली कारवाई आणि कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवार बंधुंवर केलेली तडीपारीची कारवाई ही त्यांची कामे जिल्ह्याच्या इतिहासात कायमस्वरुपी नोंद झाली आहेत.

सावंतवाडी प्रांताच्या अखत्यारीत असलेल्या तीन तालुक्यांत एकुण १५० तलाठी कार्यरत होते. सर्वसामान्य माणुस, शेतकरी आणि सर्वांसाठीच तलाठी हे पद खुप महत्वाचे असते. मात्र आढावा घेतल्यावर सुभेदारांच्या असे लक्षात आले की अनेक तलाठी वर्षांनुवर्षे शहरी भागात एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत तर बाकीचे डोंगराळ भागात ‍खितपत पडले आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन अत्यंत नियोजनबद्ध रितीने, गोपनीयपणे आणि आपले वरिष्ठ असलेले जिल्हाधिकारी यांना विश्वासात घेऊन त्यांनी दिडशेपैकी १२५ तलाठ्यांच्या बदल्या करुन आणि त्याची कडक अमलबजावणी करुन त्यांनी एकच खळबळ माजवुन दिली. त्यांचा हा पहिलाच निर्णय खुपच लोकहिताचा ठरला.

रेडी येथील लोहखनिजाच्या खाणींकडून होणारे प्रदूषण आणि कायद्यांची पायमल्ली हा जुना विषय. या खाणी चालविणाऱ्या निमको आणि गोगटे या बड्या कंपन्या. त्यामुळे त्यांच्या वाटेला जायला कोणीही अधिकारी धजावत नव्हता. या खाणींना जमिनीखाली विशिष्ट मर्यादेपर्यंत सुरुंगस्फोटाची परवानगी असे. पण या कंपन्या प्रचंड क्षमतेचे स्फोट करीत. परिणामी परिसरातील घरांना तडे जात. नुकसान भरपाई मागितली तरी कोणी दखल घेत नसे. सुभेदार यांनी कंपन्यांना भरपाईची नोटिस दिली. त्यांनी तिला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. शेवटी सुभेदारांनी खाणीवरची लक्षावधी रुपयांची जड यंत्रसामग्री जप्त करुन तिथून हलवून बंदोबस्तात ठेवली. कंपन्यांचा इगो दुखावला. जप्तीविरुद्ध त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. कारण प्रांताना जप्तीचा अधिकार नव्हता. एका अर्थाने ही कारवाई बेकायदेशीर होती.

न्यायमुर्ती माधव पेंडसे या कडक न्यायमूर्तींसमोर सुनावणी सुरु झाली. विरोधी पक्षाच्या वकिलांनी ‘बेकायदेशीर’ कारवाई यावरच जोर दिला. शासनाच्यावतीने ही कारवाई बेकायदेशीर असली तरी खाणमालकांचे उद्दाम वर्तन, नागरिकांचे नुकसान यासाठी जप्तीचा निर्णय ‘व्यापक जनहिता’साठी घेतल्याची भूमिका मांडली. विशेष म्हणजे कायद्याच्या उल्लंघनाबाबत अत्यंत कठोर असलेले न्या. पेंडसे यांनी सुभेदारांच्या बाजूने निर्णय देत त्यांची अधिकार नसताना ‘जनहिता’साठी केलेली कृती योग्य ठरवली. यथावकाश नागरिकांना भरपाई मिळाली. या खाणी उत्खनन करताना खराब माती समुद्रकिनाऱ्यावर टाकत. हवा, पाणी, किनारे यांचे प्रदूषण करीत. बरीचशी माती रेडीला पाणीपुरवठा करणाऱ्या कनयाळ तलावात जात असे. यामुळे पाणी प्रदुषित झाले होते. याविरुद्धही सुभेदार यांनी कारवाई करुन खाणमालकांना वठणीवर आणले. एवढेच काय पण या टाकलेल्या मातीचे सपाटीकरण करुन तब्बल ४८ हेक्टर जमिन निर्माण करुन सामाजिक वनीकरण विभागामार्फत तिथे वृक्षलागवड करुन उद्यान निर्माण केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कर्दनकाळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवार बंधुवर सुभेदार यांनी जीवावर उदार होऊन केलेली सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमधुन तडीपारीची कारवाई हा सुभेदार यांच्या कारकिर्दीतील अत्यंत जोखमीचा आणि धोकादायक निर्णय होता. पोलिसही वचकून असलेल्या आणि बलदंड अशा सातही पवार बंधुंवर केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील एक ब्याद कायमची नाहीशी झाली. सुभेदार यांचे हे जिल्ह्यावरचे मोठेच उपकार आहेत. सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते आणि मोठे उद्योजक श्री. कशाळीकर यांचे सुभेदारांशी स्नेहाचे संबंध होते. कशाळीकरांचा एक खडीचा क्रशर भर वस्तीत होता. त्याविरुद्ध तक्रार आली. सुभेदार लिहितात, त्यांना मी हा क्रशर हलविण्याची सुचना केली. ते हसण्यावारी नेत. तक्रारींचा ओघ वाढू लागला. क्रशरच्या भयानक प्रदुषणामुळे लोकांना जगणे असह्य झाले होते, ही वस्तुस्थिती होती. शेवटी मी ‘अविनाश सुभेदारा’चा वेश उतरवून ‘प्रांत अधिकारी सुभेदार साहेबां’चा वेश धारण केला आणि कायदेशीर प्रक्रिया करुन क्रशर बंद करण्याचा आदेश कशाळीकरांना दिला. ते स्थगितीसाठी सत्र न्यायालयात गेले. सुभेदार यांची लोककल्याणाची भुमिका माहिती असलेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. मंत्री यांनी स्थगिती नाकारली. शेवटी कशाळीकरांनीही सुभेदार यांच्या आदेशाचा मान राखत भर वस्तीतील आपला क्रशर बंद केला. मात्र यानंतरही माझे आणि कशाळीकरांचे संबंध चांगले राहिले.

तलाठ्यांच्या बदल्या करुन त्यांना घडवलेली अद्दल, रेडीतील खाणींवरील कारवाई, पवार बंधुवरील कारवाई, नानांच्या क्रशरवरील कारवाई ही सगळी प्रकरणेच काय, तर पूर्ण पुस्तकच मुळातून वाचण्यासारखे आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत म्हणजे आय.ए.एस मध्ये निवड झाल्यावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नंतर जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी राबविलेल्या विविध लोकोपयोगी यांजनाही जाणून घेण्यासारख्या आहेत. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे खासगी सचिव म्हणुन त्यांनी बजावलेली कामगिरी फार मोठी आहे. या पदावरील त्यांचे अनुभव त्यावेळचे नेते, राजकीय परिस्थिती याची कल्पना देतात. विस्तारभयास्तव येथे जास्त मासले देता येत नाहीत.

निवृत्त पत्रकार श्री. दिलीप चावरे

‘टाइम्स ऑफ इंडिया’चे निवृत्त पत्रकार श्री. दिलीप चावरे यांनी अतिशय नेमक्या शब्दात या पुस्तकाबाबत आपला अभिप्राय दिला आहे. तो पुस्तकाच्या मलपृष्ठावर छापला आहे. श्री. चावरे म्हणतात, “अविनाश सुभेदार यांचे ‘सुभेदारी’ हे आत्मकथन म्हणजे लोकसेवेचे असिधारा व्रत स्वीकारून संपूर्ण सेवाकाल त्याच निष्ठेने व्यतीत करणाऱ्या एका ध्येयवेड्या ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याचा, प्रसंगी अविश्वसनीय वाटू शकणारा जीवनप्रवास आहे. या मनमोकळ्या निवेदनाचा विशेष म्हणजे, त्याचा केंद्रबिंदु सर्वसामान्य माणूस हा आहे. साधारणपणे निवृत्त अधिकारी आपल्या आठवणी शब्दबद्ध करतात, तेव्हा प्रकाशझोत स्वतःवर ठेवतात. मात्र, सुभेदारांनी कटाक्षाने हा मोह टाळला आहे. ‘सुभेदारी’मधून लेखकाने लोकहितास केंद्रस्थानी ठेवल्याचे पानोपानी जाणवते.”

दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद सोडता कोठेही नकारात्मकता या लिखाणात जाणवत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे खासगी सचिव म्हणून काम करताना या विलक्षण नेत्याचा सहवास त्यांना सलग चार वर्षांपेक्षा अधिक काळ लाभला. त्याबाबतच्या आठवणी अत्यंत वाचनीय आहेत. त्यात आजपर्यंत काळाच्या उदरात लपलेल्या अनेक प्रसंगांचा हृद्य परामर्श वाचकांच्या मनातील राजकारण्यांविषयीची प्रतिकूल प्रतिमा काही अंशी बदलू शकेल एवढा प्रभावी आहे. शासकीय सेवा पार पाडताना नोकरशाहीतील अनेक आव्हाने झेलावी लागतात, कौटुंबिक जीवनाचा प्राधान्यक्रमही कित्येक प्रसंगी दूर ठेवावा लागतो. ही बाजूही सुभेदार यांनी संयत शब्दांत मांडली आहे.

व्यक्तिगत स्तरावर विविध मान्यवरांबरोबर सुभेदार यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. तथापि, त्यांनी कधीही अशा नात्यागोत्याचा प्रभाव आपल्या कारकिर्दीवर पडू दिला नाही. ही उपलब्धी आजच्या काळात दुर्मिळ म्हणावी लागेल. ग्रामीण भागातून आलेला एक जिद्दी तरुण परिश्रम आणि सचोटी यांच्या जोरावर सार्वजनिक जीवनात उच्च पदावर कसा पोहोचू शकतो, समाजोपयोगी भरीव योगदान कसे देऊ शकतो, याचा वस्तुपाठ म्हणजे ‘सुभेदारी’ हे प्रांजळ आत्मकथन म्हणता येईल.

श्री. सुभेदार हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे आहेत. गीतेत सांगितलेल्या कर्मयोगावर त्यांची श्रद्धा आहे. आपण फलनिरपेक्ष भावनेने कर्तव्य करीत गेलो. दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आलेल्या अडचणींवर कल्पकतेने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. हे सर्व अनुभव सांगताना स्वत:चा उदोउदो करणे, हा त्यांचा उद्देश नव्हता. तर शासकीय सेवेत प्रामाणिकपणाची कदर होते, हे वाचकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न होता, असे ते मनोगतात म्हणतात.
हे पुस्तक म्हणजे सुभेदार यांच्या कारकिर्दीतील घटनांची केवळ जंत्री नाही, तर एका निरपेक्ष, निस्पृह, व्रतस्थ, पारदर्शक आणि ध्येयनिष्ठ अधिकाऱ्याच्या जीवनप्रवासाचा गंगेच्या पाण्यासारखा पवित्र आणि खळाळता प्रवाह आहे. त्यात डुबकी मारल्याशिवाय तो अनुभवता येणार नाही.
 
‘सुभेदारी’ चे शब्दांकन नितीन साळुंखे यांनी केले असून मनोविकास प्रकाशनने हे आत्मकथन प्रकाशित केले आहे.

शासकीय सेवेत असलेल्यांनी आणि येऊ घातलेल्या युवकांनी वाचलेच पाहिजे, असे हे पुस्तक आहे.

सतीश लळीत

— परीक्षण : सतीश लळीत.
निवृत माहिती उपसंचालक, सिंधुदुर्ग
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ.☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments