Monday, June 30, 2025
Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

मी शिल्पा…
‘चंद्रपूर ते केमॅन आयलॅंड’

सौ.शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांचे आत्मकथनपर पुस्तक,
मी शिल्पा….
-‘चंद्रपूर ते केमॅन आयलॅंड’ नुकतेच वाचून हातावेगळे केले. अतिशय सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेले अत्यंत सुबक बांधणीचे पुस्तक, श्री देवेंद्र भुजबळ व सौ.अलकाताई भुजबळ यांच्या न्यूज स्टोरी टुडे प्रकाशनाने सर्वांग सुंदरपणे प्रकाशित केले आहे.

सर्व प्रथम नवोदित लेखिका आणि केमॅन आयलॅंड’ या देशाची उत्सुकता वाढल्याने प्रथम ती माहिती देत आहे, ज्यामुळे पुस्तकाची पार्श्वभूमी वाचकांच्या सहजपणे लक्षात येईल.

लेखिका शिल्पा या महाराष्ट्रातील एका कोपऱ्यात असलेल्या आदिवासी बहुल चंद्रपूर जिल्ह्यातील मुलगी, जिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता सातासमुद्रापार जाण्याचा! आज ती पती संदीप व मुलगी समृध्दीसह ‘केमॅन आयलॅंड’ या जगातील सर्वात सुंदर, श्रीमंत देशात राहते आहे. नागपूर ते न्यूयॉर्क आणि तेथून हे बेट असलेलं केमॅन आयलंड असा ४७ तासांचा प्रवास आहे. केवळ ६० हजार लोकसंख्या असलेल्या या देशात १२० पेक्षाही जास्त देशातील लोक राहतात. त्यापैकी फक्त १५०० भारतीय आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून त्या येथे राहत आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि चोहीकडे समुद्र असलेल्या या नंदनवनात प्रारंभी कुणी ओळखीचे नसतांना त्यांनी सहा वर्षांच्या समृध्दी या एकुलत्या एक मुलींसह आनंदमय वातावरणात जीवन जगण्याचा निर्धार केला. ही बाब तशी सोपी नाही. पती कंपनीत कामावर गेल्यावर घरी बसून काय करायचे हा तसा त्यांच्यापुढे प्रश्न होता. परंतू या देशानेच आपल्या स्त्री जन्माला नवीन अर्थ दिला. स्री व पुरुष हे भिन्न नाही हे येथे त्यांना समजले. स्वप्नांना पंख देऊन शून्यातून विश्व करण्याचे मनोबल दिले. कलेला चकचकीत केले. सृष्टीतील सुंदरतेला कॅनव्हास वर उमटविण्याची कला दिली. आपल्या वैचारिक शक्तीला आणि इच्छाशक्तीला बळकट केले. त्यांच्या स्वप्नांना नवा व्यास, नवा अर्थ दिला. आत्मविश्वासाची एक नवी दिशा त्यांना मिळाली.

शिल्पाचे जीवन वैविध्यपूर्ण आहे. प्रतिकूल सामाजिक परिस्थिती आणि आदिवासी बहुल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक मुलगी पदवीधर होत वकील होण्याचा प्रयत्न करते आणि आपल्यातील कला गुण जोपासते ही एक अपूर्व आशादायी बाब आहे. लग्नाचे वय झाल्यावर सांगून येईल त्या मुलाशी लग्न न करता स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यास सहमती दर्शविणाऱ्या मुलाशीच विवाहबद्ध होते लग्नानंतर नागपूर, पुणे येथे नऊ वर्षे संसार झाल्यावर पतीच्या करियर साठी त्यांच्या समवेत कधीही नाव न ऐकलेल्या केमॅन आयलँड या देशात वयाच्या पस्तीशीत जाते आणि घराकडे मुलीच्या संगोपनाकडे लक्ष देता देता स्वतःला चित्रकार म्हणून घडवते असा हा रोमांचकारी प्रवास शिल्पा यांनी या आत्मकथनात अतिशय मनस्वीपणे रेखाटला आहे.

शिल्पाने या पुस्तकात त्यांचे बालपण आणि शिक्षण याविषयीची माहिती सविस्तरपणे लिहिली आहे. त्याशिवाय त्यांचा विवाह, प्रेमस्वरूप आई, आजी, कर्मदाता असलेला जन्मदाता, निरामय प्रेम आणि सदैव पाठीशी असणारा बंधू, बहिण सुमधुर आवाजाची शर्मिला ताई यांच्या जीवनावर स्वतंत्र प्रकरण रेखाटले आहे. आपल्या प्रत्येक काळातील मग ते बालपण असो की, शालेय, काॅलेज शिक्षणातील अनमोल मैत्रिणीविषयी फारच उत्तमप्रकारे तितकीच अनमोल माहिती व केलेले सहकार्य विशद केले आहे ते मुळातच वाचले पाहिजे.

आपल्या माहेर व सासर बद्ल फारच चांगले शब्दांकन शिल्पा यांनी या पुस्तकात केले आहे. आपली मुलगी समृद्धीच्या पावलाने आलेली वृध्दी बरोबरच आपल्या यशस्वी कथेमागील दुदैवी व्यथांवर भाष्य केले आहे. आपल्या मनातील द्वंदाबरोबरच प्रेरणा स्तोत्र आणि आपल्या कला- चित्रकला विषयी मोकळ्या मनाने भरभरून लिहिले आहे.आपले स्वप्न साकार करण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा उत्तम शब्दात प्रभावीपणे सांगितली आहे.आपल्या आयुष्याची वाटचाल निर्विघ्नपणे पार पाडण्यास ज्यांनी मदत केली, मार्गदर्शन केले, आणि जीवनातील कठीण मार्ग पार करण्यास मदत केली ते म्हणजे आपले गुरु आहेत असे शिल्पा यांनी सांगून आपले आयुष्य घडविण्यासाठी ज्यांनी त्यांना सकारात्मक विचार करायला शिकवलं , त्यांच्या अध्ययनातल्या अडचणी आणि त्यावर उपाय शोधण्याची समर्थता त्यांना दिली, चालणे, बोलणे शिकवून त्यांना समर्थ करून खरा माणूस बनवले, यांच्या संस्कारामुळे आपल्याला पदोपदी यश मिळाले आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला जीवनाचा सार कळाला अशा सर्वोच्च परब्रम्ह, आप्त, कुटुंबीय यांच्या बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ही बाब मला तरी फार मोलाची वाटली. केमॅन मधील भारतीय आणि अभारतीय मित्र-मैत्रिणींनी शिल्पाजींच्या कलेला आणि इतर सर्व गुणांना वाव दिला, संधी दिली, आपल्या प्रत्येक गुणांचे कौतुक केले, त्यामुळे या नवीन देशातही त्या उत्तम पैकी अस्तित्व निर्माण करू शकल्या..

आपल्या सर्व कार्यात आणि कर्तृत्वात पती संदीप आणि मुलगी समृद्धी यांचा फार मोठा वाटा आहे. भारताबाहेर राहणारे लोक सुखी आणि यशस्वी असतात अशी सर्वांची धारणा झालेली असली तरी या सुखा आणि यशामागे फार मोठे दुःख, अफाट कष्ट आणि खूप मोठा त्याग लपलेला असतो, या सर्व गोष्टी सांगितल्याशिवाय कुणाला समजत नाही आणि सांगूनही पटत नाही किंवा विश्वास बसत नाही असे स्पष्टपणे सांगून शिल्पा यांनी आपले मन स्थितप्रज्ञ ठेवण्यासाठी एक प्रकारची आध्यात्मिक शांती निर्माण करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि त्यांचे गुरुदेव श्री श्री श्री रविशंकर आणि समस्त आर्ट ऑफ लिव्हिंगचा परिवार यांचेही ऋण त्यांनी मनस्वीपणे मान्य केलेले आहे विशेष म्हणजे कोविडच्या काळात आपली देवेंद्र भुजबळ सरांशी फेसबुकवर मैत्री झाली आणि त्यांच्या ‘न्यूज स्टोरी टूडे’ पोर्टलवर लिहिण्याची संधी देऊन आपल्या लेखन कलेला मोठे व्यासपीठ मिळवून दिले त्याबद्दल आणि हे आत्मकथन पुस्तक प्रकाशित केले त्याबद्दल त्यांचे व सौ अलका ताई भुजबळ यांचे ऋण मान्य केले ही देखील बाब मला तरी महत्वाची वाटली.कारण बरेच साहित्यधुरीण असे स्पष्टपणे मान्य करताना फारसे दिसत नाहीत.

आज आपल्या मुलीसाठी, समृद्धीसाठी जे स्वप्न त्यांनी पाहिले ते इंग्लंड मधील उत्कृष्ट विद्यापीठात डॉक्टर करण्यात साकार होत असल्याबद्दल अभिमानाने या पुस्तकातून सांगितले आहे ते एवढ्याचसाठी की समाजात मातेसह कुटुंबीय मंडळींनी केलेले अथक परिश्रम, आपले संस्कार,आपली सकारात्मकता आणि आपला स्वतः वरचा आत्मविश्वास कारणीभूत असतो.आणि याद्वारे मनात आलेले प्रत्येक स्वप्न, प्रत्येक इच्छा, प्रत्येक ध्येय आपण पूर्ण करू शकतो.असाध्य सुद्धा साध्य होऊ शकतो पण गरज असते ती मुळात आत्मशोधाची! असा एकूणच हितोपदेश देखील शिल्पाजींनी नमूद केला आहे तो देखील हे समग्र पुस्तक वाचताना मला तरी उचितपणे भावतो.

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिल्पाजींचे पती श्री संदीप तगलपल्लेवार यांनी अतिशय ओजस्वीपणे लिहिलेले ‘मला भावलेली शिल्पा’ हे एक स्वतंत्र प्रकरण!ते मुळातच वाचलेले अधिक चांगलं!

या पुस्तकाचे प्रकाशक आणि माध्यम क्षेत्रातील अर्धव्यू, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी या पुस्तकात सुमारे अडीच पानांची, फारच छान प्रस्तावना लिहिली आहे . त्यात त्यांनी कवियत्री असलेल्या शिल्पाने घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या उत्तमरीत्या सांभाळून चित्रकला आणि इतर कलांची आवड जोपासत राहिली, मुलीला आपण इंग्रजी भाषेत शिकविताना कमी पडतो हे ओळखून ती तिच्या मैत्रिणी सोबतच इंग्रजीचा क्लास लावते, आणि इंग्रजी शिकायला सुरुवात करते. पती आणि मुलीच्या सहकार्यामुळेच शिल्पा आत्मविश्वासाने इंग्रजी उत्तमपणे बोलायला लागली, कॉम्प्युटर चालवायला शिकली, चित्रकला मोकळ्यापणाने बहरू दिली, इतकेच नव्हे तर ड्रायव्हिंग देखील तरबेजपणे चालू लागली. चित्रकले बरोबरच ‘शिल्पास् ‘युनिक आर्ट’ हा चित्र व्यवसाय सुरू केला आणि स्वतःला एक यशस्वी उद्योजक म्हणून सिद्ध केले, तेव्हाच शिल्पाला आपल्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. शिल्पाच्या पन्नाशी निमित्त प्रसिद्ध होत असलेले हे आत्मकथन मराठी साहित्यात निश्चितच मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही श्री भुजबळ यांनी शेवटी व्यक्त केला आहे,तो हे समग्र पुस्तकातील लेखनातून तसेच विविध रंगीत छायाचित्रावरून आणि लेखिकेच्या कवितांमधून आणि मधून मधून बोधप्रद इंग्रजीतील सुभाषितांवरून सहजपणे लक्षात येतो यात तीळमात्र शंका नाही.

प्रत्येक गृहिणीने हे पुस्तक वाचून यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये ‘आत्मशोध’ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केल्यास ती अनाठायी ठरणार नाही.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. शिल्पा ताईंनी अशक्य काहीच नाही हे सिद्ध केले आहे.
    सुंदर, प्रेरणादायी प्रवास…

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील