“आरक्षणाचा इतिहास”
वैचारिक साहित्यातील एक प्रभावी व्यक्तीमत्व, वेगवेगळ्या विषयांवर रग्गड लेखन करीत असलेले, विषय सूचला की त्यावर लेख लिहिण्याची खास हातोटी असलेले लेखक पंजाबराव चव्हाण हे एखादा विषय हाती घेतल्यानंतर तो अर्धवट सोडत नाहीत.
पंजाबराव म्हणजे एक अष्टपैलू व्यक्ती. अलीकडेच याडीकार पंजाबराव चव्हाण यांनी एक सुंदर, एक गहन, महत्वपूर्ण विषयावर पुस्तक लिहीलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे “आरक्षणाचा इतिहास.”
इतिहास या शब्दाची फोड केल्यास “इति” म्हणजे ‘असे’ आणि ‘हास’ म्हणजे ‘झाले’. असे झाले पूर्वीच्या काळी म्हणजे इतिहास. आरक्षण घेण्यासाठी काय काय इतिहास घडला याचं वर्णन म्हणजे हे पुस्तक आहे.
पुस्तकाचं मुखपृष्ट अतिशय बोलकं व पुस्तकातील अंतरंगाला शोभेल असेच आहे.

मुखपृष्टावर ज्या महान विभूति दीन, दलीत भटके विमुक्त, इतर मागास वर्गीय, अदिवासी यांच्या भल्यासाठी दिवस रात्र झटल्या, रक्ताचं पाणी केलं अशा महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पद्मश्री रामसिंगजी भानावत, महाराष्ट्राचे दिर्घकाळ मुख्यमंत्री राहीलेले, हरितक्रांती, धवल क्रांती, रोजगार हमी योजनेचे शिल्पकार,गोर बंजारा समाजाची आन, बाण, शान असलेले, शेतकऱ्यांचे कैवारी, वसंतरावजी नाईक यांची करारी छायाचित्रे मुखपृष्टावर आहेत.या सर्वाच्या नजरेत करारी बाणा दिसून येतो. त्याचबरोबर गोरगरीबांविषयी आत्मीयता प्रेम दिसून येते. थोडक्यात सांगायचं म्हणजे मुखपृष्ठ पाहताच पुस्तकाच्या अंतररंगात काय दडलय ? हे कळण्यास वाचकास मदत होते.
पुस्तकाचं मुखपृष्ट जसं बोलकं आणि अर्थपूर्ण आहे तसेच मलपृष्टही बोलकं आहे. लेखक अतिशय चाणक्ष बुद्धीचे आहेत. वाचकाला पुस्तकाकडे कसे आकर्षित करावे हे त्यांना माहीत आहे. मलपृष्टावरचे छायाचित्र स्वतः लेखकाचे आहे.ते धुरंदर राजकारणी शरद पवार साहेबांसोबतचे आहे.या पुस्तकात मांडलेल्या विषयाबदलच ते त्यांच्याशी निश्चित चर्चा करत असावेत. मलपृष्टहे सामाजिक कार्यकर्ता श्री देवेंद्र भाऊ पवार यांच्या विचारांनी सजविलेले आहे.
वाचकांनो, आता विचार करा ज्या लेखकाने मुखपृष्ट व मलपृष्ठ येवढं बोलकं केलं असेल तर पुस्तकाचा विषय, गाभा किती महत्त्वपूर्ण, आशयपूर्ण असेल ? हे पुस्तक वाचल्याशिवाय वाचकाच्या लक्ष्यात कसं येईल बरं ?
म्हणून मी सर्व वाचकांना, वाचनाची आवड असणाऱ्या, वाचण्यासाठी सवड काढणाऱ्यांना विनंती करतो की एकदा तरी हे पुस्तक वाचून काढा. मग पुस्तकाची किंमत कळेल. लेखनाचा लेखकांचा उद्देशही कळेल.
या पुस्तकात लेखकाने अतिशय परिश्रम घेवून भारतातील एसी, एसटी, भटके, विमुक्त, ओबीसी आणि महिला यांच्या आरक्षणाचा इतिहास मांडलेला आहे. मी सुरवातीस उल्लेख केलेला आहे की लेखक हे अष्टपैलू आहेत. त्यांनी अतिशय चपखलपणे शंकर आडे पत्रकार व बंजारा कविंची अतिशय अर्थपूर्ण व मार्मिक कविता “भटक्याची भाकर” ने सूरवात केलेली आहे. या कवितेतून भारतीय मागास समाजाची स्थिती वर्णन करुन समाजाला आरक्षणाची गरज का आहे हे कवीच्या माध्यमातून पटवून द्यावयाचे आहे.”दगडात देव घडविणार आम्ही नैवद्याचे हक्कदार कधी झालोच नाही”. यातून भारतीय भटक्या समाजाची परिस्थिती कशी आहे हे दिसून येते. आतापर्यंत भारतीय मागास समाज झोपलेला होता. स्वतःचे हक्क, कर्तव्य यांची जाण त्यांना नव्हती. गोर बंजारा समाजाचे थोर भाष्यकार, लेखक, कवी, विचारवंत आदरणीय भिमणीपुत्र (काकाश्री) यांनी “चालतू छेडा”तून या पुस्तकाविषयी, आरक्षणाचे कैवारी याविषयी विचार मांडलेले आहेत.लेखक पंजाबराव चव्हाण यांनी स्वतःचे मनोगत मांडलेलं आहे. हे पुस्तक लिहिणारे लेखक यांचं हे “बावीसाव” पुस्तक आहे.त्यांच्या प्रगल्भ विचारातून या पुस्तकाचा जन्म झालेला आहे.
प्रस्तावना म्हणजे पुस्तकातील विषयाचा आरसा असतो असं माझं मत आहे. प्रस्तावानेतून पुस्तकाचे अंतरंग वाचकासमोर उभे राहते .या पुस्तकाची प्रस्तावाना गोरबंजारा समाजातीलप्रसिद्ध लेखक, विचारवंत प्राचार्य गबरुसिंग राठोड यांनी अतिशय विस्तृतपणे व रोखठोक लिहिलेली आहे. या प्रस्तावनेत त्यांनी लेखकाने लिहीलेल्या पुस्तकाच्या आधारे प्राचीन समाज कसा होता ? मध्ययुगात कसा होता ? व आजपर्यंत समाज कसा बदलत गेला याचा लेखाजोगा मांडलेला दिसून येते.
या पुस्तकात आरक्षणाचा इतिहास असून लहान मोठी ६५ प्रकरणे आहेत. लेखकाने पुस्तकात आरक्षणाची सुरवात कधी झाली ? कोणी केली ? याचा वेध घेत घेत अगदी झिरवाळ साहेबांनी आदिवासींच्या हक्कासाठी मंत्रालयाच्या जाळीत मारलेल्या उडीची दखल घेतलेली आहे. हरिभाऊ राठोड किंवा गोरसेना यांनी समाजासाठी करत असलेल्या चळवळीची व कार्याची दखलही घेतली आहे. हे पुस्तक समाजातील सर्वासाठी एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणुन उपयोगी पडणार आहे. पुस्तक लिहिताना लेखक केवळ आरक्षणाची ढोबळ माहिती पुरवत नाहीत तर त्याला इतिहासातील साक्षी पुरावे देत माहिती पुरवतात.
मागासवर्गीयाची आरक्षण कैफीयत मांडताना आरक्षणाची सुरवात भारतात प्रथम कोणत्या राज्यांनी केली व कधी केली हे लेखक पुरव्यासह लिहीले आहे. प्राचीन भारतातील राजकर्त्यापासून अधुनिक राजकर्त्यापर्यंत लेखकांनी दखल घेतलेली आहे. भारतात आरक्षणाचा प्रवास कसा झाला, इंग्रजाच्या काळातील भारताचा कायदेविषयक प्रवास लेखकाने अतिशय चपखल व प्रभावीपणे मांडलेला आहे. भारतातील गुन्हेगारी जातींचा कायदा झाल्यापासून त्यांना गुन्हामुक्त करेपर्यंतचा लेखाजोखा लेखकांनी मांडलेला आहे. प्रथम जनगणना १८७१ पासून २०११ पर्यंत झालेली आहे. याची ही माहिती लेखकांनी वाचकाला पुरवलेली आहे.
महात्मा फुले यांची हंटर कमीशन पुढील साक्ष असो की राजर्षी शाहू महाराज याचे ५०% चे आरक्षण धोरण, लेखकाने समाजासमोर मांडलेले आहे.सायमन कमिशन, आरक्षण देण्यासाठी विविध राज्यांनी स्थापन केलेल्या समित्या, इंग्रज काळापासून आजतागायत आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीचा आढावा लेखकांनी अतिशय सोप्या व सरळ भाषेत वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येते. गोलमेज परिषद व पुणेकरार त्यात डॉ आंबेडकर साहेबांनी केलेल्या मागण्याचा उल्लेख आलेला आहे.
पद्मश्री रामसिंगजी भानावत यांचे कार्य कदाचित आपणास माहिती असेल. त्या भानावत साहेबांनी वसंतरावजी नाईकांच्या सहवासाने व प्रेरणेने गोर बंजारा समाजासाठी काय कार्य केले याची ओळख लेखकाने करुन दिलेली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीना आरक्षण मिळालं नाही म्हणून मंत्रीपदाचा त्याग केला याचा उल्लेख पुस्तकात आलेला आहे. आरक्षणाकरीता भारत शासनाने नेमलेले वेगवेगळे आयोग, कमिट्या, आरक्षण आणि घटनादुरुस्ती, पहिला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे आयोग व कमिट्या याविषयी लेखकांनी सुंदर व माहितीपूर्ण विवेचन केलेले आहे.
महाराष्ट्रातील गोर बंजारा विमुक्त जाती, जमाती यांच्या आरक्षणाच्या इतिहासाची सांगोपाग चर्चा पुस्तकात केलेली आहे. भटक्या विमुक्त आरक्षणाचे जनक वसंतरावजी नाईक, धनगर समाजाचा आरक्षण लढा, मंडल आयोग, हरियानातील जाट आंदोलन, बंजारा वंजारा वाद , छप्पर बंद, राजपूत यांची आरक्षणात घुसखोरी, आंध्रातील कापू आंदोलन, महिला आरक्षण व राज्यस्थानातील गुजर आंदोलन या विषयी सविस्तर माहिती लेखकाने वाचकांना पुरवलेली आहे.
सरकारी नोकरीतील पदोन्नती हा भटक्या विमुक्तांचा हक्क आहे हे लेखकाने ठासून सांगितलेले आहे. स्वतःचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी विमुक्तांनी काय करावे या विषयी लेखकाने मोलाचा सल्ला दिलेला आहे. सध्या महाराष्ट्रात एक कळीचा मुद्दा (राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बनवलेला कळीचा मुद्दा) म्हणजे मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे. या विषयीही लेखकाने स्वतःचे मत मांडलेले आहे.
थोडक्यात सांगावयाचे म्हणजे सुधीर प्रकाशन, वर्धा यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक वाचकांसाठी ज्ञानाचे भांडार आहे. अभ्यासकांसाठी संदर्भ ग्रंथ आहे. विद्यार्थ्यांसाठी, वाचकांसाठी, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी, लेखक, विचारवंत यासाठी ज्ञानाची शिदोरी आहे. समाजात सर्वज्ञानी असा कोणीही नसतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या समाज बांधवांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. त्यातल्यात्यात जी तरुण पिढी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी ठरणार आहे. ज्ञानानी ओतपोत भरलेलं हे पुस्तक शाळा, महाविद्यालये, ग्रंथालयात असणे महत्वाचे आहे. प्रत्येक वाचक मित्रांनी हे पुस्तक वाचून आपल्या संग्रही ठेवावे असेच आहे .
प्रस्तुत पुस्तकाचे लेखक याडिकार पंजाबराव चव्हाण यांनी साहित्य क्षेत्रात एक बहुमूल्य साहित्य निर्मिती केल्याबदल त्यांचे हार्दिक आभार. त्यांच्या हातून असीच साहित्य सेवा घडत राहो ही सदिच्छा !
— परीक्षण : राठोड मोतीराम रुपसिंग. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800