“बालकादंबरी सावी”
लेखिका नसीम जमादार ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बालसाहित्यिका आहेत. त्या पन्हाळा येथील नेबापूर न्यू हायस्कुलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असून गेली तीस वर्षे आपल्या कर्तव्याचे यशस्वी पालन करीत आल्या आहेत. या कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत सतत संपर्क ठेवत त्यांना केवळ शिक्षणाचे धडेच दिले नाहीत, तर समाजात जबाबदार नागरिक म्हणून कसे वागावे याचे संस्कारही दिले आहेत.
खरा शिक्षक हा शिक्षण केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित ठेवीत नाही तर तो विद्यार्थ्यांना भारताचे भविष्य म्हणून घडवण्याचे महत्त्वाचे कार्य करीत असतो.जेव्हा शिक्षक आपल्या कर्तव्याच्या जोडीने लेखणी उचलून आपल्या अनुभवांचे लेखन करू लागतो, तेव्हा “सावी… एका संघर्षमय जीवनाची गाथा” यांसारखी संस्कारक्षम बाल कादंबरी आकार घेत असते.
लेखिका नसीमा जमादार यांनी “सावी” या बालकादंबरीतून स्वतःचा अनुभव मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यात एक विद्यार्थी शिक्षकाच्या छोट्या छोट्या प्रोत्साहनामुळे आत्मविश्वास पुन्हा मिळवत जातो आणि पुढे जाऊन एक जबाबदार व यशस्वी नागरिक म्हणून समाजात वावरतो. सोबतच तो समाजाच्या हितासाठी हातभार लावत राहतो.शिक्षकासाठी याहून मोठे समाधान काय असू शकते ?
लेखिका नसीम जमादार यांनी लिहिलेल्या “सावी” या कादंबरीचा सारांश असाच आहे. या कादंबरीत लेखिका सहाय्यक नायिकेच्या भूमिकेत दिसतात आणि मुख्य भूमिकेत सावी ही हाताश, आत्मविश्वास हरवलेली, मागच्या बाकावर बसणारी विद्यार्थिनी आहे. ही कथा सावीच्या जीवनप्रवासाची नसून तिच्या शालेय प्रवासाची आहे. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याचा आणि त्यानंतर तिच्या बदललेल्या स्वरूपाचा. लेखिकेने आपल्या ओघवत्या भाषाशैलीद्वारे विविध प्रसंगांचे प्रभावी चित्रण करत हा प्रवास वाचकांसमोर उलगडला आहे.
संस्कृती प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या या कादंबरीच्या मुखपृष्ठावर एक विद्यार्थिनी आपल्या शाळेसमोर हातात पुस्तकं घेऊन उभी आहे, असे चित्र यशवंत पेंटर यांनी रेखाटले आहे. तसेच, कादंबरीतील विविध प्रसंगांनुसार अजय ढवळे यांनी आतील चित्रे साकारली आहेत. या कादंबरीसाठी ज्येष्ठ साहित्यिक माधव राजगुरू यांनी सारगर्भ प्रस्तावना लिहिली असून, ज्ञानपीठ बालसाहित्य पुरस्कारप्राप्त साहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी कादंबरीला पाठराखण केली आहे.
“सावी” ही अशी विद्यार्थिनी आहे जी आठवीपर्यंत पोहोचली असली तरी घरच्या जबाबदारीमुळे तिचे अभ्यासाकडे आणि स्वतःकडे पुरेसे लक्ष देता आले नाही. त्यामुळे तिचे स्वतःचे नाव व्यवस्थित उच्चारणे आणि लिहिणे जमत नव्हते, तसेच कपडे आणि केस नीटनेटके ठेवणेही तिला कठीण वाटत होते. तिचे आई-वडील शेतीच्या कामात व्यस्त असल्याने घरची आणि भावाची संपूर्ण जबाबदारी सावीवरच होती. या जबाबदारीच्या ओझ्याखाली तिचा आत्मविश्वास हरवला होता. जेव्हा शिक्षिकेची सावीशी पहिली भेट होते, तेव्हा शिक्षिका सावीचा अवतार पाहून चकित होते. हे चित्र शिक्षिकेच्या मनातील मातृत्वाला साद घालते, आणि त्याच क्षणी सावी व शिक्षिकेचा एका नव्या प्रकाशाकडे प्रवास सुरू होतो. या कादंबरीतील प्रसंग सत्य घटनांवर आधारित आहेत, तसेच लेखिकेचा स्वतःचा अनुभवही त्यात प्रतिबिंबित होतो, हे लेखिका नसीमा जमादार यांच्या मनोगतामधून स्पष्ट होते. लेखिकेने प्रत्येक प्रसंग सहज आणि जिवंत चित्रणासह लिहिला आहे, त्यामुळे वाचक आणि विद्यार्थी दोघेही ही कादंबरी एका दमात वाचण्याचा मोह टाळू शकत नाहीत.
माधव राजगुरू यांनी प्रस्तावनेत असे नमूद केले आहे की, सावी तिच्या लग्नापर्यंत मुलांच्या आवडीची असेल, परंतु लग्नानंतर तिला शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या सामाजिक शिक्षणाच्या मदतीने स्वतःच्या स्वबळावर गरुडझेप घ्यायला मिळते. लेखिकेने कादंबरीत हे प्रभावीपणे चित्रित केले आहे. हेच मुलांना त्यांच्या स्वतःच्या बळावर उभे राहण्यासाठी आत्मविश्वास किती महत्त्वाचा असतो, याची जाणीव करून देईल. एक वाचक म्हणून हे माझे मत आहे.
होय, हीच या कादंबरीची खरी ताकद आहे! सावीच्या प्रवासात केवळ तिच्या शिक्षणाची वाढच होत नाही, तर तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकासही होतो. सुरुवातीला जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेली आणि आत्मविश्वास हरवलेली सावी जसा शिकत जाते, तसतसा तिच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलतो. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची तिची वृत्ती, शाळेविषयी तिचे वाढते प्रेम आणि स्वतःला स्वीकारण्याचा तिचा प्रवास—हे सारेच अत्यंत प्रेरणादायी आहे. हा बदल सहजपणे वाचकांच्या मनाला भिडतो आणि हरवलेल्या आत्मविश्वासाला पुनर्जिवीत करण्याची शक्ती शिक्षणात असते, हे अधोरेखित करतो.
“सावी… एका संघर्षमय जीवनाची गाथा” ही कादंबरी केवळ बालवाचकांसाठी प्रेरणादायी ठरणारी नाही, तर प्रौढ वाचकांनाही अंतर्मुख करणारी आहे. तिची रेखीव मांडणी, प्रसंगांचे प्रभावी वर्णन आणि परिस्थितीनुसार असलेली चित्रमय मांडणी कादंबरीला अधिक जिवंत बनवते. विशेषतः रंगीत पानांमुळे बालवाचकांना ही कादंबरी अधिक आकर्षित करते. कथानकातील प्रत्येक प्रसंग एक नवीन शिकवण आणि जीवनाचा बोध देतो.
लेखिका नसीम जमादार या संस्कारक्षम बालसाहित्यिक म्हणून नावारूपाला येत आहेत. त्यांच्या “नो मेन्स लँड”या बाल एकांकिका संग्रहाच्या यशस्वी कामगिरीनंतर “सावी” ही बालकादंबरीसुद्धा साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे.
आजच्या पिढीला वाचनाची गोडी निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या आहारी गेलेल्या मुलांना दर्जेदार बालसाहित्य वाचनाची प्रेरणा देण्यासाठी अशा पुस्तकांची नितांत गरज आहे. लेखिका नसीम जमादार अशाच उत्तम साहित्यनिर्मिती करत राहोत आणि वाचनसंस्कृतीला नवसंजीवनी मिळो, यासाठी त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा !
— परीक्षण : खाजाभाई बागवान. सोलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800