‘ टाटायन ’
औद्योगिक जगतात अनेक भारतीय व्यावसायिकांनी आपल्या कर्तृत्वाने राष्ट्र उभारणीत, देशाच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली आहे.
आर.एम.लाला यांचे जमशेदजी टाटा यांच्या जीवनपटावरील एक पुस्तक यापूर्वीच वाचून झाले होते. त्यामुळे गिरीश कुबेर यांनीअनुवादित केलेले ‘टाटायन ‘ वाचून पूर्ण करणे व त्यातून टाटा परत एकदा नव्याने समजून घेण्याची संधी मिळाली.
Covid 19 चा pandemic मुळे अचानक सर्वांना मिळालेला फावला वेळ. त्यात अनेकविध गोष्टी करत असताना ह्या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले आणि अथपासून इतिपर्यंत टाटा उद्योगसमूहाचा प्रवास साकल्याने समजून घेता आला.
‘उच्च विचार, उच्च भाषा आणि उच्च वर्तन‘ या ब्रीद वाक्याने दीडशेहून अधिक वर्षांपासून टाटा उद्योग समूहाने भारतीय व आंतरराष्ट्रीय समाजाच्या गरजा ओळखून व्यावसायिक विस्तार केला आहे.
संस्थापक जमशेदजी टाटांपासून रतनटाटां पर्यंतच्या सहाही कार्यकुशल नेतृत्वानी टाटा समूहाचा प्रवास अत्यंत जबाबदारीने व तितकाच कुशलपणे हाताळला. प्रत्येकाने आपल्या सर्वोत्तम क्षमतांचा वापर करून देशाच्या औद्योगिक विकासाच्या गरजांचा अभ्यास करून आपापल्या कारकिर्दीत टाटा समूह वेगवेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. पण या सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक समान धागा होता तो म्हणजे ‘टाटा संस्कृती’.
“काय आहे ही टाटा संस्कृती..?” काही महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे सांगता येतील
* दूरदृष्टी : लोकांना काय हवे आहे हे त्यांच्या गरजेनुरूप ओळखून ते पुरविणे.
* साधेपणा : कसलंही मिरवणं नाही. * कर्मचाऱ्यांचे हित व सुरक्षितताः काळाच्या पुढे जाऊन ओळखणे; त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षिततेची भावना देणे.
* बाजारपेठ काबीज करण्याची मनोवृत्ती टाटा समूहातील कुणीही कधी मनी बाळगली नाही.
* लोकांना काही ना काही देण्याची वृत्ती
* संपत्तीनिर्मिती ही आनंदाइतकीच कर्तव्याची बाब म्हणून जोपासली.
* इतरांच्या हितात आपले हित बघणे.
* राज्यकर्ते यांना न जमणाऱ्या पण देशहितासाठी व समाजासाठी उपयुक्त अशा संस्था उभारण्याचा समजूतदारपणा उदाहरणार्थ. TIFR, TIS या सारख्या संस्थांची निर्मिती
* आंतरराष्ट्रीय दर्जाची भारतीय उत्पादने
अशा एक ना अनेक बाबी टाटांचे वेगळेपण अधोरेखित करतात.
यशात अनेकांना वाटेकरी करून घेतलं कि ती माणसं अपयशात देखील आपोआपच बरोबर राहतात हा विश्वास शिकावयास मिळाला. इतर उद्योगसमूहानी ही बाब अतिशय जबाबदारीने स्वीकारणे आवश्यक आहे. अवतीभोवती बघत असणाऱ्या व्यक्तिकेंद्री व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी ही बाब समजून घेणे मला महत्वाचे वाटते.
असे म्हटले जाते की कोणतीही बाब दोन वेळा जन्म घेते…
१. मनात
२. प्रत्यक्षात
नेतृत्वाच्या द्रष्टेपणाने बघितलेले एखादे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी अनेक लोक त्याची अंमलबजावणीसाठी काम करत असतात. मात्र एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते की कोणाच्याही हातून कोणतीही बाब घडवायच्या आधी मनाची मशागत करावी लागते आणि हीच बाब टाटा समूहाला इतरांपेक्षा वेगळी बनवते.
सहकार्यांवरील अतूट विश्वासातूनच टाटा समूह उभा राहिलेला दिसून येतो. सर्वोत्तम टॅलेंट निवडून त्यांना जबाबदारी व कामाचे स्वातंत्र्य दिल्यानंतर तब्बल 36 वर्षांनी Tata Consultancy services म्हणजेच TCS.
तब्बल रु 54000 कोटीचा नफा मिळवून आजही जगभरातील सर्वोत्तम आयटी कंपनी असल्याचे दिसून येते. म्हणूनच एस. रामादोराई यांची 1970 च्या दशकात केलेली निवड TCS च्या उभारणीत अनमोल योगदान देऊन जाते.
टाटा कडून मला माझे पुढील ३ ‘पर्सनल लर्निंग’ महत्त्वाचे वाटतात.
१ जमशेदजी टाटाः
यांनी राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचे असे भव्यदिव्य स्वप्न बघून ते प्रत्यक्षात उतरविले.
उदाहरणार्थ.. कृत्रिम तलावातील पाण्यावर वीज निर्मिती, पोलाद कारखाना इत्यादी
२. जेआरडी टाटाः
आपल्या सान्निध्यात आलेला प्रत्येक व्यक्ती प्रामाणिक आहेच असे समजून वागविणे. सहृदय, प्रेमळपणा अशा गुणवैशिष्ट्य सोबतच विमान कंपनी निर्मिती व अन्य अनेक उद्योगांतून भारतीय अर्थव्यवस्थेला नवे आयाम प्राप्त करून दिले.
३.रतन टाटाः
अत्यंत उच्च दर्जाचे व्यावसायिक कौशल्ये, पुनर्रचनाकार. काळाची पावले ओळखून टाटा उद्योग समूहाने भारत जागतिक उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असतानाची आव्हाने अत्यंत दूरदृष्टीने ओळखली. त्यानुसार नवनवीन बदल करून उद्योगसमूहाचा आलेख प्रगतीपथावर ठेवला. एवढे असूनही एक प्रकारचा राजस अलिप्तपणा त्यांनी कायम जपला.
‘ उतू नये ,मातू नये,घेतला वसा टाकू नये या उक्तीनुसार टाटा समूहाने आपल्या व्यावसायिक नीतीमूल्यांशी कुठलीही तडजोड न करता एक आगळे वेगळे औद्योगिक विश्व उभे केलेले आहे.
कोरोनाचा लाॕकडाऊन संपल्यानंतर उद्योग जगतात चीन वरील वाढलेला अविश्वास लक्षात घेता युरोपातील/ जगभरातील अनेक देश भारताकडे आशेने बघत आहेत. अनेक उद्योजकांनी त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यामध्ये सरकारचे उद्योगधंद्यांच्या उभारण्याचे धोरण अत्यंत उदार असणे गरजेचे आहे.जेणेकरून Post Corona भारतात अजून अनेक उद्योग समूह टाटा उद्योगसमूहा प्रमाणे उभे रहावेत याच अपेक्षेसह…..
— परीक्षण : डॉ वैशाली वीर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Indian Institute of science, बंगलोर ची स्थापना पण jamshedji टाटांनी krishraja vadiyar iv ह्यांच्या मदतीने 1909 मध्ये केली होती. IISc मधून पास आउट झालेले खूप सारे शास्त्रज्ञ, entrepreneurs आपल्या देशाला मिळाले. सुधा मूर्ती हे एक त्यातले नाव
टाटा उद्योग समुहाच्या यशस्वी प्रवासाविषयी ‘टाटायन’ या पुस्तकात अगदी थोडक्यात आणि नेमका परिचय या लेखातून दिला आहे. टाटा समूहाचे यशाचे सूत्रही यात अधोरेखित केले आहे. आज प्रत्येकानेच वाचावे आणि समजून घ्यावे असे हे पुस्तक एखाद्या दीपस्तंभासारखे आहे. डॉ वैशाली वीर, उपसंचालक यांचे या लेखाबद्दल तसेच मा. श्री भुजबळ साहेब यांचे या व्यासपीठाबद्दल मनापासून धन्यवाद!