Wednesday, September 10, 2025
Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

कोवळं ऊन”

पाच-सहा दिवस पडलेल्या भीज पावसानंतर एखाद्या दिवशी सकाळी सकाळी पडलेले आल्हाददायी ‘कोवळं ऊन’, तसेच थंडीच्या मोसमातील आरोग्यदायी ‘कोवळं ऊन’ मनाला समाधान देते. तशीच मानसिक शांती, आनंद देणारा ‘कोवळं ऊन’ हा सिंगापूर स्थित लेखिका नीला बर्वे यांचा कथासंग्रह सौ. अलका भुजबळ, न्यूज स्टोरी पब्लिकेशन यांनी प्रकाशित केला आहे!‌ पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका आशा बगे या दोघांचे अभिप्राय या पुस्तकात समाविष्ट आहेत. न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक तसेच सेवानिवृत्त माहिती संचालक महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र भुजबळ यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे.

शीर्षकस्थानी असलेली ‘कोवळं ऊन’ ही कथा वाचताना डोळे भरून येतात! शशांक आणि अश्विनी यांची महाविद्यालयात झालेली मैत्री त्यांना प्रेमाच्या मार्गाने घेऊन जाते नि लग्नबंधनात अडकवते. त्यांचे सुरुवातीचे वैवाहिक जीवन म्हणजे ‘फुलले रे क्षण माझे…’ असे ?

अचानक कथानकाला वेगळेच वळण मिळते. अश्विनीचा लागोपाठ दोन वेळा गर्भपात होतो. डॉक्टर पुन्हा गर्भवती न होण्याचा सल्ला देतात. शशांकला दुसऱ्या लग्नाचेही सुचविले जाते. परंतु शशांक ठामपणे नकार देऊन बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतो. एक गोंडस कन्या घरी येते. मधुरा तिचे नाव मिळते. मधुरा दहा वर्षांची होत असताना अनाथाश्रमातील एक नियम जणू वादळ बनून त्यांच्या जीवनात येतो. शशांक,‌ अश्विनी नि मधुराची मनःस्थिती कशी होते ? ह्या प्रश्नाचे उत्तर लेखिका नीला बर्वे यांच्या शब्दांत वाचायला हवे. संग्रहातील प्रत्येक कथेच्या शेवटी दिलेल्या क्यूआर कोडमुळे लेखिकेच्या आवाजात कथा ऐकायला मिळते.

‘अंतरीचे बंध’ कथाही अत्यंत भावस्पर्शी आहे. तात्या आणि माई सत्तरी पार झालेले परोपकारी जोडपे! गावातील एका कष्टाळू तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या परिवाराचा खर्च उचलताना मीरा नावाच्या मुलीला डॉक्टर बनवतात. पंचाहत्तरी पार माई आजारी पडते. कुणी तिला आजाराबद्दल काही सांगत नाहीत. माई त्या डॉक्टरांकडे जाऊन बोलताना स्वतःचं आयुष्य २/३ महिनेच राहिलंय हे वदवून घेतात. माईचा स्वभाव सहनशील, सकारात्मक आणि परिस्थितीचा सामना करणारा असूनही त्यांच्या वागण्यात थोडा हळवेपणा येतो. हा बदल पतीच्या लक्षात येतो. तेही त्याच डॉक्टरांकडे जातात नि परिस्थिती जाणून घेतात. पत्नीची साथ केवळ काही महिन्यांची आहे हे समजल्यावर पत्नीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बॅंकेची एफ.डी.‌ मोडून पैशाची व्यवस्था करतात.

तात्या-माई ‘केदारनाथ’ यात्रा करून परतल्यावर एका गुरुवारी माईच्या इच्छेनुसार तात्या माईला औदुंबराच्या दर्शनासाठी नावेतून घेऊन जातात. दर्शन घेऊन परतताना अघटित घडते. तात्या- माईच्या उत्कट प्रेमाची साक्ष पटविणारी घटना घडते. अवश्य वाचा नि ऐका… ‘अंतरीचे बंध’ ही हृदयाचा ठाव घेणारी कथा !

‘निर्णय’ ही कथा सकारात्मक आहे. मुलाला लहानपणी पाळणाघरात ठेवताना पती-पत्नीच्या मनाची झालेली घालमेल नि नंतर त्याच मुलाला सैनिकी शाळेत टाकताना होणारी हृदयाची पिळवणूक हे वर्णन वाचताना नकळत वाचकांच्या मनाचेही ठोके चुकतात.

‘नाते’ ही कथा सूरज-अरुंधती यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेमाची आहे. सूरज-अरुंधती यांचा विवाह ठरलेला असतो. दोघे दोन शहरात राहत असतात त्यामुळे सूरज अरुंधतीची वारंवार भेट घ्यायला कधी मोटारसायकल, कधी कार घेऊन येत असतो. एका अपघातात सूरज जखमी होतो, त्याचा एक पाय कापावा लागतो. सूरज, त्याचे nआईवडील अरुंधती आणि तिच्या आईवडिलांसमोर एक वेगळाच प्रस्ताव ठेवतात… ठरलेले लग्न मोडण्याचा. अरुंधती तिच्या आई- वडिलांसह सूरजच्या घरी जाऊन प्रेमाविषयी, साखरपुडा झालेला परंतु लग्न न झालेली पत्नी या हक्काने बोलते ते खरेच वाचनीय आहे. तिचे बोल ते ज्यांच्या मनात घटस्फोटाचे विचार घोळत आहेत त्यांनी अवश्य वाचण्यासारखे आहे.

‘मुक्त मी, स्वच्छंद मी…’ ही कथा वाचताना ‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा…’ हे गीत वाचकांच्या ओठी येते. ह्या कथेचा नायक एक गरुड आहे. नीला बर्वे यांनी या कथेत एका गरुडाला बोलते केले आहे. त्याच्या सुख-दुःखाच्या भावभावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

‘हल्लीचीच एक गोष्ट’ ही कथा दोन पिढ्यांच्या संघर्षातून टिपलेली आहे अर्थातच तरुणाईच्या प्रेमाची… परंतु एकतर्फी प्रेमाची! सिंगापूरमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील नातेसंबंधांची! ही कथी तशी ‘लिव ईन रिलेशनशिपची’ आहे. आभा आणि अल्विन एकत्र काम करणारे तरुण! आभाच्या मनात त्याच्याविषयी प्रेमविषयक भावना निर्माण झालेली परंतु अल्विन मात्र अशा भावनांपासून दूर असणारा. तेव्हा आभा एक धाडसी, क्रांतिकारी निर्णय घेते. ती चक्क अल्विनसोबत विवाह न करता एकत्र राहण्याचा निर्णय आई- वडिलांना सांगते… तेव्हा जणू त्या घरात त्सुनामी येते. तरीही आभा-अल्विन एकत्र राहतात. दोघे कामात मग्न असताना साऱ्या जगाचे व्यवहार ठप्प करणारा आजार येतो… कोरोना ! आधी अल्विनला नि नंतर आभाला कोरोना होतो. त्यावेळी तिची आई त्यांच्या मदतीला जाते. अल्विन- आभा यांच्या लग्नाला आभाचे बाबा परवानगी देतात का ? साऱ्या घटना नीला बर्वे यांनी अत्यंत बारकाईने लिहिल्या आहेत.

‘मनूचा आनंद’ ही कथाही वेगळ्या आशयाची ! मनस्विनी ही विदुलाची मैत्रीण ! विदुलाकडे तिच्या आनंद नावाच्या मावस भावाशी मनूची भेट होते. पहिल्याच भेटीत आनंदला मनू आवडते परंतु वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू असलेल्या मनूच्या मनात ती भावना शिरत नाही. दोघांच्या भेटी विदुलाच्या मध्यस्थीने होत राहतात परंतु मनूच्या मनात फक्त निर्व्याज मैत्र असते.

मनस्विनी उत्तम गुण मिळवून एम.बी.बी.एस. साठी, आनंदची एअरफोर्ससाठी निवड होते. मनूचे आईवडील तिच्या लग्नाचा विषय छेडतात तेव्हाही मनू आनंदचा विषय काढत नाही. विदुला ती बातमी आनंदला देते. तो आईवडिलांच्या परवानगीने मनूला मागणी घालण्यासाठी सविस्तर पत्र लिहितो. सैनिक असल्याने जीवन कसे अस्थिर असते त्याची कल्पना देतो. मनू ते पत्र आईबाबांना देते. तेव्हा आई सैनिक जावई नाकारते. तेव्हा मनूच्या बाबांचे बोल वाचकांच्याही मनाला भिडतात.

लेखिका नीला बर्वे

लेखिका बर्वे यांच्या काही कथांमध्ये एकत्र कुटुंबाचे, आजी- आजोबांचे महत्त्व नकळत जाणवते. ‘अपघात’ या कथेत एकत्र कुटुंबात राहणारे दोन भाऊ वादविवाद न करता सामोपचाराने विभक्त होतात. नात झाली म्हणून आजी एका मुलाकडे राहायला येते. छोट्या मयूरीला (नातीला) आजीचा खूप लळा लागतो. काही वर्षातच दुसऱ्या भावाला मूल होण्याची चिन्हं दिसतात. आजीला तिकडे जावे लागणार या विचाराने ते सारे कुटुंब खिन्न होते.

पाळणाघर हा मयूरीसाठी एकमेव पर्याय असताना शेजारचे आजोबा-आजी मयूरीचे आईबाबा कार्यालयात गेले की, दिवसभर तिला सांभाळण्याची जबाबदारी घेतात. एक प्रश्न मिटतो परंतु पुढचा प्रश्न, संकट सारं काही उद्ध्वस्त करून टाकतो. त्या कुटुंबात त्यांचा वैभव नावाचा पुतण्या राहायला येतो नि एकेदिवशी हा नराधम अजाण मयूरीला ‘निर्भया’ बनवतो.

धक्क्यातून सावरण्यासाठी मयूरीचे आईबाबा परराज्यात बदली करून घेतात. मयूरीचे शिक्षण पूर्ण होत असताना तिला परप्रांतीय हेमंत लग्नाची मागणी घालतो. मयूरीला आश्चर्याचा धक्का बसतो कारण हेमंतकडे ती एक मित्र म्हणून बघत असते. ती आईबाबांना त्या बाबत सांगते. तेव्हा त्या दोघांच्या मनात बालपणी झालेल्या कुप्रसंगाची आठवण येते. तिला आणि मकरंदला सांगावे की नाही या चर्चेत सांगायला हवे असं ठरते. इथे तिच्या आजीची भूमिका महत्त्वाची ठरते. हेमंत आणि त्याचे कुटुंबीय मयूरीचा इतिहास समजल्यानंतर स्वीकारतात काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर कथेच्या शेवटी समजते.

‘वंशाचा दिवा’ निश्चल नावाच्या तरुणाला आपल्या आजीला आईबाबांनी वृद्धाश्रमात ठेवलेले आवडत नाही. तो आपल्या जन्मदात्या मातापित्याची कानउघाडणी करतो ती वाचताना निश्चलबद्दलचा आदर दुणावून त्याच्या शिक्षकाने त्याच्या आजीला केलेली मदत ऐकून अभिमान वाटतो.

समीर, सुखदा यांची लग्नानंतरची पहिली दिवाळी ! समीरची आई मोठ्या उत्साहाने फराळ तयार करण्याचा विचार करते परंतु सुखदा एका वृत्तवाहिनीवर काम करीत असते. तिला सेलिब्रेटींच्या मुलाखती घेण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. तिला दिवाळीच्या दिवसातही काम करावे लागत असल्यामुळे सुखदा सासूबाईंना मदत करू शकत नाही हे समजताच आईही तिने सुट्टी घेऊन मदत करावी अशा हट्टाने पेटते. समीरलाही कंपनीच्या कामासाठी उज्जैनला जावे लागते तर सुखदा वाहिनीच्या कामासाठी हैद्राबादला जाते. आई फराळाचे सामान घेण्यासाठी बाजारात गेली असताना सायकलची तिला धडक लागते. आईला जास्त मार लागतो का ? मदतीला कोण धावून येते ? समीर-सुखदा केव्हा परत येतात ? सासू नि सूनबाई यांच्या भांडणात दिवाळीचा फराळ तयार होतो का ? नक्कीच वाचा नि ऐका… पहिली दिवाळी !

‘स्वप्न’! प्रत्येकाला पडणारे, प्रत्येक जण पाहणारे ! कुणाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरतात तर कुणाचा स्वप्नभंग होतो. बर्वे यांच्या कथेतील रमेशने इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहिले होते परंतु दुर्दैवाने तो पहिल्याच वर्षी रॅगिंगचा बळी पडला नि घरी निघून आला. त्याचा मुलगा आलोकही वैद्यकीय महाविद्यालयात असताना रॅगिंगचा बळी पडून घरी येतो. रमेश मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचे ठरवतो.‌ आलोकचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होते का ? जरुर वाचा… स्वप्न ही कथा !

आई नि पत्नी दोघींचाही त्याग करून, दोघींच्या अस्मितेला धक्का देऊन महेश नावाचा तरुण घर सोडतो तेही एका रुपवान महिलेशी लग्न करण्यासाठी ! त्याची पत्नी रुपा पतीच्या पाठीमागे सासूला छान सांभाळते, नणंदांचे माहेरपण करते. नोकरी करून मुलाला शिकवते. मुलगा तरुण होतो नि अचानक महेश परत येतो. त्यावेळी त्याची आई, पत्नी नि मुलाची काय अवस्था होते, त्याला ते घर स्वीकारते का ? लेखिका नीला बर्वे ‘अस्मिता’ कथा उत्कटतेने लिहिली आहे.

लेखिकेच्या ‘कांदाभजी’ या कथेचा आस्वाद घेताना समोर भज्यांची प्लेट असली तर सोने पे सुहागा ! बर्वे यांची ही कथा समीर, सुनिती नि त्या दोघांचा मुलगा अक्षय जेव्हा कोरोनाच्या जाळ्यात अडकतात. ही कथा मन हेलावून टाकणारी आहे. सुनितीला होणारा कोरोना, तो काळ आणि नंतर कांदाभजी हे समीकरण बर्वे यांनी खूप छान फुलवले आहे.

‘आव्हान’ नसलेलं जीवन जणू अळणी ! आव्हान कथेतील महाविद्यालयीन तरुणाला विविध आव्हाने पेलण्याचा छंद असतो. ट्यूबलाईटच्या, लाईटच्या काचा खाणे, धातूचे स्क्रू गिळणे, १०१ कप चहा पिणे, भन्नाट वेगाने बाईक चालवताना उडी मारून शेजारच्या बाईकवर बसणे अशी आव्हाने स्वीकारून ती यशस्वीपणे पेलणे हा त्याचा आवडता छंद. सारेजण त्याची स्तुती करत असताना राधा नावाच्या तरुणीला त्याचे असले अवघड आव्हान पूर्ण करणे मुळीच आवडत नव्हते. तो वारंवार राधाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती त्याला दाद देत नाही. श्याम नावाचा तरुण मागे हटत नाही. जणू श्यामने मनोमन राधाशी मैत्री करण्याचे आव्हान स्वीकारले होते. तो ते आव्हान पूर्ण करतो का ? राधा त्याची मैत्री नि पुढचे पाऊल स्वीकारते का हा सारा पट बर्वे यांनी तळमळीने मांडला आहे.

लेखिका बर्वे यांनी त्यांना भेटलेल्या ज्येष्ठांचे छंद ‘चिरतरुण’ या कथेत खेळ, घरोघरी, असाही एपिसोड या विभागांमध्ये शब्दांकित केले आहेत. हे सारे वाचून ज्येष्ठत्व जड झालेल्या, म्हातारपणाला कंटाळलेल्या आजोबा-आजींना निश्चितच प्रेरणा मिळेल.
‘चुकलं कोकरू’ ही कथा एका ज्वलंत समस्येचा भांडाफोड करणारी असून आजची बहुतेक तरूण मुलं स्वच्छंदी जीवन जगताना, आईबाबांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा कसा दुरुपयोग करतात नि कशाकशाच्या आहारी जातात ही तरुणांसह, पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कथा आहे.
‘कोवळं ऊन’ हा विविधांगी विषय असलेला, सकारात्मकता नि नवविचारांना चालना देणारा कथासंग्रह आहे.

नागेश शेवाळकर.

— परीक्षण : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
मितल सुहास वावेकर on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
श्री. समीर मारुती शिर्के on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !