Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

“गझल प्रज्ञा”

आज इराण- इस्त्रालय, अमेरीका युद्धाने संपूर्ण जग वेठीस धरले आहे, वर्चस्ववादाच्या लढ्यात सामान्यांची चुल बंद पडली आहे. दळणवळण ठप्प झाले आहे, अघोषित लाॅकडाऊन‌ उंबरठ्यावर दस्तक‌ देतोय.

“वादळाचा केंद्रबिंदू”, डोळ्यातला इशारा”, “सांज हसते”, माथा झुकला नाही”, “शब्दांचा गजरा”, “ती-नावाची शक्ति” ह्या गझलकार यशवंत पगारे यांच्या “गझल प्रज्ञा” या गझल संग्रहातील रचना आवर्जून वाचायला हव्या, अशा अर्थवाही आहेत.

हा गझल संग्रह पलपबने २०२५ मध्ये प्रकाशित केला आहे. ‘समाजमनातील गझलकार’ पुरस्कार वितरण समारंभात पलपबने यशवंत पगारे यांचा आगामी संग्रह प्रकाशित करण्याची घोषणा केली. एखाद्या प्रकाशन संस्थेने एखादी साहित्यकृती स्वखर्चाने प्रकाशित करणे ही आजच्या व्यावसायिक दुनियेतील दखलपात्र उपलब्धी आहे. सन्मित्र पगारे यांनी अल्पावधीतच गझल लेखनात नजर अंदाज न करता येणारे आपले स्थान निर्माण करून मराठी गझल प्रांतात एक आगळीवेगळी मोहोर उमटवली आहे. या अनुषंगाने ते गौरवास प्रात्र ठरतात. मी त्यांच्या ‘हृद्यातील सुंदर जखमा’ चे समीक्षण केले तेव्हाच यशवंत पगारे हे आपल्या क्षेत्रात लवकरच नावलौकिक प्राप्त करतील याची खात्री पटली होती या संग्रहाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांना आजवर १८ पुरस्कार मिळालेत.

गझलकार यशवंत पगारे

पोलिस खात्यातील बोटावर मोजता येतील इतकेच अधिकारी व्यस्ततेतही लेखन करतात. पण निवृत्तीनंतर पगारे यांनी ‘गजल प्रावीण्य’ त प्रवेश घेतला व अल्पावधीतच समाजमान्य गझलकार होण्याचा मान मिळवला.

गझल हा तंत्रशुद्ध काव्य प्रकार आहे. वृत्त, मात्रा, काटेकोरपणे सांभाळून गझल लेखन अवघड आहे. मुक्तछंदाला अजिबात थारा नाही. गझलप्रज्ञेतील आकृती बंध, व्याकरणीय शुद्ध लेखन नजरेत भरते. गझल .. हा मराठीतील ओवी, अभंग, दोहे, भावगीता सारखा स्वतंत्र धाटणीचा अग्रणी रसिक मान्य प्रकार‌ आहे

पगारेंनी साहित्य समूह, मुशायरे, संमेलने अशा मंचावर गझल सादर करून लेखन प्रवाही ठेवले आहे. ‘गझलप्रज्ञेत ५० गझलांचा समावेश आहे.
प्रेम- विरह, व्यथा- वेदना, अन्याय -अत्याचार, जातीभेद- विषमता, शेतकरी दैन्यावस्था, सामान्य माणसांच्या समस्या अशा विविध विषयांवरील रचना वाचकांस अंतर्मुख करतात. सामाजिक भान राखत मानवतावाद पेरणारा  हा कवी आहे.

“अस्सल मनाची व्यथा” त
“बघ क्रूर माणसांचा धावत जमाव‌ आला
नक्कीच आज येथे होणार घात आहे”
 
समाजमन झुंडशाही गुन्हेगारीमुळे अस्वस्थ व भयभीत झाले आहे.जाहिर व सांघिक अत्याचारावर कुठलाच अंकुश राहिलेला नाही. केव्हाही, कुठेही रानटी जथ्था गोरगरीब जनतेचा घात करतो ही वस्तुस्थिती पहिल्याच गझलेत आली आहे. मात्र कवी आशावाद निर्माण करण्यासाठी आवाहन करतो,

“विझू लागल्या कां नव्या रोज आशा
चला पेटवू धग उरातील थोडी” (पृ१७)

मानवतेची पेरणी हे लेखन प्रयोजन “चकोर‌‌” मधील शेर‌ व्यक्त करतो,

“माणुसकीचे जग वाढावे इतकी इच्छा
कुणी नसावे मूजोर आणि काय पाहिजे”

धर्म भेद, सामाजिक विषमता कवी नाकारतो, सर्वधर्मीय मूलतत्वं माणूसकी, त्यासाठी कवी आग्रही भूमिका मांडताना” ह्या कोणत्या प्रजाती” असा थेट सवाल उपस्थित करतात,

“अंधारल्या क्षणांना देशील काय वाती
माझ्या घरात ये तू विसरून धर्म जाती”

“चंद्रास आज सुद्धा धर्मांत वाटणार्या होते
आहेत कोण वेडे, ह्या कोणत्या प्रजाती”

मानवनिर्मित ही विषमता नष्ट होणारच आहे.

“येईल सुर्य माझा”त ही 
दुर्दम्य आस व्यक्त होताना दिसते,

“येईल सूर्य माझा का धीर आज सोडू
ठेवुनी आस ओली  समजावतो मनाला” (पृ२३)

कवी सामान्य शेतकरी, कष्टकरी व सामाजिक बहिष्कृत समाजातून आल्याने त्यांची अनुभवाची विशाल दाहक व्याप्ती गझल प्रज्ञेत‌ परखडतेने‌ दिसून येते, शेतकरी जगाचा पोशिंदा फक्त नाममात्र ! वास्तव जीवनात येणारी भीषणता मन पिळवटून टाकणारी आहे मी शेतकरी कवितेत,
“पाऊस फार पडतो किंवा कधीच नाही
शेतास घाम देतो फुटलो उरी तरीही”
अशा प्रत्ययकारी शब्दात जळजळीत वास्तव मांडण्याचं कसब पगारे च्या लेखनात आहे, हे गझल संग्रहाचे बलस्थान म्हणणे उचित ठरेल. काळजाचा कोट‌ करणारे‌ लेखन सामर्थ्य कसे असावे याची‌ प्रचीती देणारा शेर,

“लेकीस काय सांगू, खिशात नाही दिडकी
उजवू कशी तिला मी दिसते परी तरीही”
शेतकरी मुलगी केवळ पैसा नाही म्हणून अविवाहिता, बाप-लेक आतल्या आत जळत असतात, वणव्यात होरपळणाऱ्या झाडासारखी. गझल म्हटली तर नाठाळ सुंदरी नजरेत उभी राहते. पण हा गझलकार सामाजिक भान ठेवून, परिवर्तन घडवून आणण्यासाठी श्रमाची, घामाची, रक्ताची आणि माणसांवर प्रेम करणारी गझल लिहितो या अर्थी “गझल प्रज्ञा” हे संग्रहाचे शीर्षक समर्पक आहे. वास्तववेधी गझलकार सुरेश भट यांची परंपरा जपणारी ही गझल आहे असं मला वाटते.

“पेटणारे अश्रू” ही प्रगल्भ रचना,”
“झालीत वादळे बघ डोळ्यांतील अश्रू
होते कधीतरी जे भारी सुशील अश्रू”

क्रांती जीवंत निजली कां बरं लेखणी पणं
होईल शक्य जेव्हा तर पेटतील अश्रू” (पृ२८)

गझलेतील शब्द प्रतिक्रांतीची मशाल घेऊन अवतरतात.
विज्ञाननिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, शिक्षण, लोकशाही व परिवर्तनावर अढळ निष्ठा ठेवणारी गझल संग्रहात भेटते या पुष्ट्यर्थ काही शेर उद्धृत करतो….

“हातावरील रेषा पुसल्यात शिक्षणाने
उंची खरेच माझी दावीन‌ या जगाला”यू

“न्यायालयात सुद्धा अंधार फार झाला
हक्काला जाग आणत धरतो मशाल आता”

“अधिकार माणसांचे खातात धुळ येथे
जाणून‌ प्रश्न त्यांचे, लावा निकाल आता” (पृ३३)

“अंगार पेरणारी लिहितो गझल सदा मी
बदलायची मला ही येथील रितं सडकी”

“विज्ञानाचे तत्त्व सांगतो सदासर्वदा
गंडा दोरा चालत नाही मठात माझ्या”

“जादू इतकी पेरत असतो शब्दांमध्ये
नागीन सुद्धा गझल वाचते बनात माझ्या (पृ६८)

व्यक्ती, जात, वर्ग, धर्म यांच्या अतीता पलीकडे डोकावून पाहण्याची दृष्टी पगारेंना लाभलीय.

माणूसकीचा मळा पिकविणारा ‘बुद्धिइज्म्’ कवीला आपला वाटतो, बुद्ध तत्त्वज्ञानाची नितांत गरज आहे हे कवी निक्षून सांगतो.”बुद्धास मानतो मी” “युद्ध नको बुद्ध हवा” या गझलांत कवी शांततेचे संचलन‌ करू इच्छितो,
“सारी शस्त्रे चला वितळवू नकोत युद्धे
बुद्धाची मग शांती देऊ जगाला”

या संग्रहाला सिराज करीम शिकलगार यांची अर्थवाही प्रस्तावना आहे. आदित्य पगारे या उमद्या तरुणाचे बोलके मुखपृष्ठ शीर्षकाच्या विषयाची पुष्टी करते. माणूसकीचे विराट पंख भक्कम करणारी मानवतावादी गझल बंधुप्रिय यशवंत पगारे यांनी यापुढेही लिहावी यासाठी शुभेच्छा देतो !!!

— समीक्षण : साहेबराव मोरे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments