“स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता”
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २८ मे २०१७ येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात देवेंद्र भुजबळ यांनी “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” या विषयावर व्याख्यान दिले.
या व्याख्यानावर आधारित मराठी व इंग्रजी असे दोन भाषिक पुस्तक “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रिकारिता” हा निश्चितच वाचनीय दस्तावेज आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक व न्युज स्टोरी टुडे या पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी अत्यंत परिश्रम घेऊन एका ज्वलंत विषयावर लिहिलेले, भरारी प्रकाशन, विलेपार्ले, मुंबई यांनी सुबकतेने प्रकाशित केलेले, पुस्तकाचा एकूण आशय स्पष्ट करणारे चितारलेले मुखपृष्ठ आणि त्रिमूर्ती आर्ट प्रिंटर्स यांनी मुद्रित केलेले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले.
पुस्तकाचे शीर्षक, मनोवेधक मुखपृष्ठ, उत्कृष्ट छपाई, आकर्षक कागद आणि पुस्तकाचे बाह्यस्वरुप पाहून वाचक पुस्तकाच्या प्रेमात पडतो. पुस्तकातील आशय आणि विषय स्पष्ट करण्यासाठी लेखकाने घेतलेले परिश्रम,दांडगा अभ्यास, कथानकाची मांडणी या बाबी लक्षात येतात . शिवाय चरित्राचा नायक ज्यावेळी प्रखर हिंदुत्ववादी असतो त्यावेळी वाचक चरित्र नायकाच्या आणि सोबतच लेखकाच्या प्रेमात पडतो.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कोणतेही चरित्र वाचताना वाचकाच्या अंगावर काटा येतो. अशीच काहीशी अवस्था सदरहू पुस्तक वाचताना वाचकाची होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्रकारिता हा विषय वाचताना वाचक अंतर्मुख होतो. काही प्रसंग वाचताना अंगावर शहारे येतात. ही कमाल लेखकाच्या चतुरस्त्र लेखनीची आहे, त्याच्या खोलवर अभ्यासाची आहे. पुस्तकाच्या शीर्षकात ‘जाज्वल्य’ हा शब्द आहे. जाज्वल्य या शब्दाचा शब्दशः अर्थ बघितला तर प्रखर, तेजस्वी असा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात वि. दा. सावरकरांची लेखणी कशी प्रखर आणि तेजस्वी होती याची कल्पना हे पुस्तक वाचून येते.
हे पुस्तक लिहिण्याची ऊर्मी म्हणा, स्फूर्ती म्हणा किंवा प्रेरणा कशी मिळाली हे स्पष्ट करताना लेखक मनोगतात म्हणतात, की लेखकाचा “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता” हा संशोधनपर लेख महाराष्ट्र शासनाच्या ‘लोकराज्य’ या मासिकात प्रकाशित झाला. या लेखाचा परिणाम असा झाला की, एक फार मोठी संधी लेखकाकडे चालून आली. जागतिक सांस्कृतिक सामाजिक परिषदेचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे होणाऱ्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात ‘सावरकरांची पत्रकारिता’ या विषयावर व्याख्यान देण्याचे निमंत्रण लेखक देवेंद्र भुजबळ यांना दिले.

एक प्रकारे हा देवेंद्र भुजबळ यांच्या लेखनीचा, व्यासंगी वृत्तीचा सन्मान होता. जो संधीला सामोरे जातो, आव्हान स्वीकारतो तोच यशस्वी होतो. कोणतेही चरित्र लिहिणे आणि त्यातही सावरकरांविषयी लिहिणे हे एक प्रकारे आव्हानच होते. परंतु उपजत अभ्यासू वृत्ती, ज्ञान लालसा असलेल्या देवेंद्र भुजबळ यांनी ते आव्हान लीलया पेलले. मोठमोठ्या जवळपास अकरा ग्रंथांचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी सावरकरांच्या पत्रकारिता जीवनातील असंख्य मोती शोधून काढले. हे सारे ऐवज त्यांनी एकत्र गुंफून थेट सिडनी येथे ‘सावरकरांची पत्रकारिता’ या विषयावर उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान दिले.
हे व्याख्यान अतिशय गाजले. सिडनी येथील व्याख्यानात अधिक भर घालून ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ पुस्तक रूपाने आपल्यासमोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या एकाच पुस्तकात मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेत सावरकरांची पत्रकारिता समाविष्ट केली आहे.
सावरकरांच्या पत्रकारितेचा श्री गणेशा तसा ते माध्यमिक शाळेत शिकत असताना होतो. “हिंदू संस्कृतीचा गौरव” हा सावरकरांचा पहिला लेख “नाशिक वैभव” या वृत्तपत्रात दोन भागात प्रकाशित झाला असल्याचे लेखक नमूद करतात.
त्यानंतर सावरकरांच्या पत्रकारितेचा प्रवास स्पष्ट करताना लेखक बारीक सारीक बाबींचा उल्लेख करतात. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना सावरकरांनी “आर्यन विकली” हे हस्तलिखित साप्ताहिक मित्रांच्या सहकार्याने सुरु केले. या साप्ताहिकातून सावरकरांनी देशभक्ती, साहित्य, इतिहास, विज्ञान या विषयांवर चौफेर आणि अभ्यासपूर्ण असे लेख लिहिले. या प्रकाशित लेखांपैकी काही लेख पुण्याच्या वृत्तपत्रांतून प्रकाशित झाले.
सावरकर यांच्या लेखनीतून प्रसवलेल्या लेखांना न्युयॉर्कच्या “गॅलिक अमेरिका” या वृत्तपत्राने प्रकाशित केले. सोबतच हे लेख जर्मन, फ्रेंच, इटालियन, रशियन, पोर्तुगीज या भाषांमध्ये अनुवादित होऊन त्या त्या देशात प्रकाशित झाले. अशाप्रकारे सावरकरांच्या लेखांना थेट परदेशातील वाचकांनी स्वीकारले, असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. एक प्रकारे हा वि. दा. सावरकर यांच्या विचारांचा, लेखनीचा गौरवच होता.
सावरकरांच्या अभिनव भारत या संघटनेचे ‘तलवार साप्ताहिक’ हे मुखपत्र होते. नावाप्रमाणे हातात असलेल्या लेखनरुपी तलवारीचा उपयोग त्या काळात कसा झाला असेल हे वाचकांनी ओळखलेच असेल.
सावरकरांच्या लेखनीतून साकारलेल्या अनेक ग्रंथापैकीं एक ग्रंथ म्हणजे ‘अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर’ हा ग्रंथ! या पुस्तकाची महती म्हणजे सावरकरांच्या या ग्रंथावर सरकारने प्रकाशनापूर्वीच बंदी घातली. परंतु सावरकर डगमगले नाहीत. त्यांनी ब्रिटिश, अमेरिकन, युरोपियन वृत्तपत्रांमधून सरकारवर प्रचंड टीका केली. सरकारच्या निर्णयामुळे सावरकरांनी तो ग्रंथ हॉलंडमध्ये छापला आणि त्याच्या प्रती फ्रान्स, अमेरिका, जपान, चीन या देशांसह हिंदूस्थानमध्येही पाठवल्या.
नेपाळचे नेते ठाकूर चंदनसिंग हे सावरकरांना फार मानत. त्यांनी सावरकरांचे लेख अनुवादित केले आणि ते लेख ‘तरुण गुरखा’, ‘हिमालयीन टाइम्स’ यामध्ये प्रकाशित केले. मुंबई येथून सावरकरांनी ‘श्रध्दानंद’ या नावाचे एक साप्ताहिक सुरु केले. या साप्ताहिकातून आणि ‘मराठा’ या इंग्रजी पत्रात पं. नेहरु यांच्यावर घणाघाती टीका केली होती.
सावरकरांचे लेख, ग्रंथ संपदा केवळ हिंदुस्थानात नव्हे तर परराष्ट्रातही गाजत होती. अशा या प्रखर हिंदुत्ववादी, तेजस्वी पत्रकाराने २३ दिवसांच्या आत्मार्पणानंतर स्वतःचा देह २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी म्हणजे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी मृत्यूच्या स्वाधीन केला.
लेखक देवेंद्र भुजबळ यांनी अत्यंत साध्या, सोप्या भाषेत वि. दा. सावरकर यांच्या प्रखर पत्रकारितेचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासायचे आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक एक अनमोल ठेवा असून, एक अत्यंत महत्त्वाची शिदोरी आहे. खुद्द भुजबळ आपल्या मनोगताचा शेवट करताना लिहितात की, “‘सावरकरांचे विचार, कार्य, प्रतिभा, पत्रकारिता हा फार मोठ्या ग्रंथाचा विषय आहे. पण निदान त्यांच्या पत्रकारितेची तोंड ओळख या प्रयत्नाने होईल, अशी आशा आहे.”
लेखक स्वतःच्या भूमिकेशी प्रामाणिक आहेत. त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन, सावरकरांविषयी बारीक सारीक माहिती जमा करून, अभ्यासून सावरकरांच्या पत्रकारितेची ओळख करून दिली आहे.
वास्तविक पाहता सावरकर हा एका लेखाचा, पुस्तकाचा विषय होऊ शकत नाही, तर तो एका महाकाव्याचा विषय आहे. कदाचित आगामी काळात लेखक देवेंद्र भुजबळ यांच्या लेखनीतून अशाच एका सावरकर विषयक महाग्रंथाची किंवा महाकाव्याची निर्मिती होऊ शकेल.
देवेंद्र भुजबळ यांच्या नावावर “भावलेली व्यक्तिमत्त्वं”,
“गगनभरारी”, “करिअरच्या नव्या दिशा” “प्रेरणेचे प्रवासी” “अभिमानाची लेणी” (ई साहित्य), “समाजभूषण” ही पुस्तके जमा आहेत.
देवेंद्र भुजबळ यांच्या आगामी लेखनास भरभरून शुभेच्छा !

– समीक्षण : नागेश सू. शेवाळकर
साहित्यिक, चरित्रलेखक पुणे. ☎️9869484800
सावरकरांच्या पत्रकारितेचा यथार्थ आढावा घेतला आहे.
देवेंद्र सर, अगदी सविस्तरपणे परीक्षण लिहिलं आहे… स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या वंदनीय क्रांतीसूर्यावर आपण पुस्तक लिहिलं याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन …. पुस्तक वाचायची उत्सुकता आहे.