काल, ७ नोव्हेंबर रोजी आठवा राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन झाला. भारतात २०२० साली कर्करोगाने १० लाख ३९ हजार लोक तर जगभरात एक कोटी लोक मरण पावले. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात, राज्यातील नागरिकांमध्ये कर्क रोगाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. लोकांच्या मृत्यूचे कर्करोग हे एक प्रमुख कारण झाले आहे, या वरून या रोगाची व्याप्ती, भयावहता स्पष्ट होते.
या सर्व पार्श्वभूमीवर नुकतेच डॉ सुलोचना गवांदे यांनी लिहिलेले, “कर्करोग” माहिती आणि अनुभव हे पुस्तक माझ्या वाचनात आले.
ते अक्षरशः एका बैठकीत वाचून काढले.
कर्करोग म्हणजे काय ? कर्करोगाचे प्रकार (कर्करोगाचे जवळपास १०० प्रकार असल्याचे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे!), कर्करोग टाळता येतो का ? त्या साठी काय आहार विहार असावा, आपण काय दक्षता घ्यावी, अशी सर्व इत्यंभूत माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
पुस्तकाच्या लेखिका डॉ सुलोचना गवांदे यांनी मुंबई येथील टाटा हॉस्पिटलच्या कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मधून एम् एस्सी केल्यानंतर त्याच संस्थेतून पी एचडी केले. त्यानंतर त्या याच क्षेत्रात गेली ३५/३६ वर्षे अमेरिकेत कार्यरत आहेत. असा अभ्यास, संशोधन,
शास्त्रीय दृष्टिकोन हे त्यांच्यातील गुण पुस्तकात ठायी ठायी प्रकट होत असतात. त्यामुळेच या क्षेत्रात किती संधोधन झाले आहे, होत आहे. ही माहिती सर्व संबधित व्यक्ती, वर्ष, संख्यात्मक तुलना यासह देत असतानाच त्या वैद्यकीय क्षेत्राच्या अजूनही काय मर्यादा आहेत, हे निःसंकोचपणे सांगत असतानाच या क्षेत्रात अथकपणे सुरू असलेल्या संशोधनामुळे मानव जातीला नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही देतात.

दूर अमेरिकेत व्यस्त असूनही लेखिका आपली माती, आपली माणसं विसरल्या नाहीत, हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणुनच आपल्या ज्ञानाचा, संशोधनाचा, अनुभवाचा लाभ आपल्या बंधू भगिनींना व्हावा या तळमळीने त्यांनी हे पुस्तक मराठी भाषेत लिहिले आहे. खरं म्हणजे, अनेक शब्द, परिभाषा यासाठी त्या इंग्रजी शब्द जसेच्या तसे वापरू शकल्या असत्या. पण असा शॉर्टकट न स्वीकारता त्यांनी सबंधित इंग्रजी शब्दांना पर्यायी असणारे मराठी शब्द योजल्याने त्यांचे मातृ भाषेवरील प्रेम आपल्यावर सहजपणे ठसते.
कर्करोग हा मुळातच अतिशय भयावह, क्लिष्ट आणि शास्त्रीय परिभाषेत सांगितला जावा असा रोग आहे. पण लेखिकेने आपला वाचक हा सर्व सामान्य माणूस आहे, हे डोळ्यासमोर ठेवून पुस्तकातील भाषा साधी, सरळ, सहज समजेल अशी ठेवली असल्यामुळे एक कठीण विषय वाचकाला समजण्यास मोठीच मदत झाली आहे.
पुस्तकाच्या शेवटी कर्करोगावरील उपचार महाराष्ट्रात कुठे उपलब्ध आहेत, त्या विषयीचे समुपदेशन कुठून मिळू शकेल अशी व्यावहारिक माहिती सर्व संबधित रुग्णालये, संस्था यांच्या नावासह, पत्त्यासह, फोन नंबर सह दिल्यामुळे केवळ वाचकच नव्हे तर प्रत्येक वाचनालय, शाळा, कॉलेज आणि सर्व साधारण नागरिक अशा सर्वांनी हे पुस्तक स्वतःच्या संग्रही ठेवले पाहिजे. इतके ते महत्वपूर्ण आहे. सर्व सामान्य वाचकाच्या आवाक्यात ते असावे म्हणून पुस्तकाची किंमत अवघी १००/- रुपये इतकी ठेवली आहे.
खरोखरच कर्करोगाविषयी जागृती दूर करण्याच्या कामी हे पुस्तक अतिशय महत्वाचे आहे. असे हे सर्वांगिण परिपूर्ण पुस्तक प्रकाशित केल्या बद्दल पॉप्युलर प्रकाशन निश्चितच अभिनंदनास पात्र आहे.
अशा या उपयुक्त पुस्तकाबद्दल सर्व मराठी जन लेखिकेचे नेहमीच ऋणी राहतील.
लेखिका डॉ सुलोचना गवांदे यांच्या आगामी लेखनासाठी, संशोधन कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800