“गगनभरारी” चा पुस्तक परिचय महत्त्वपूर्ण वाटतो. कारण त्यातून लोकांना प्रेरणा मिळेल. या व्यक्तिरेखा समाजासाठी दीपस्तंभ आहेत. लेखकाने वापरलेली शब्दरचना नेटकी आहे. वाचकांपर्यंत हे पुस्तक गेले पाहिजे. यासाठी हा परिचय ….
महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातून संचालक या पदावरून निवृत्त झालेल्या श्री.देवेंद्र भुजबळ यांनी “गगनभरारी” हे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी वर्णन केलेले अनेक क्षेत्रांतील महिलांचे कार्य पहाता, ते केवळ व्यक्तिचित्रणच आहे असे वाटत नाही तर समाजचित्रण आहे असे जाणवते.
पद्मश्री, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत या पुस्तकाचे महत्व अतिशय समर्पक शब्दांत केले आहे.
मराठीत अनेक व्यक्तिचित्रणे आहेत. तथापि अनेकांचे लेखन हे त्यातील व्यक्तींची थट्टा करणारे आहे तर काहींत केवळ शब्दांचे इमले लेखकाने बांधले आहेत. काही व्यक्तिचित्रणांतून त्या व्यक्तींवर स्तुतीसुमने उधळण्यात लेखकाने धन्यता मानली आहे. अशा बाबींना या पुस्तकात फाटा दिलेला आहे. समाजातील अनेक क्षेत्रांत कार्य करणा-या काही महिलांच्या जीवनाचे पारदर्शक वर्णन हा मोठा साहित्यिक सामाजिक ठेवा आहे.
जालना जिल्ह्य़ातील एका खेड्यातील कचरावेचक महिला सुशिलाबाई साबळे यांनी दारिद्र्याशी लढून स्वतःचे आणि आसपासच्या महिलांचे जीवन प्रकाशमान केले, त्याबद्दल त्यांचा देशात आणि परदेशांत सत्कारही झाला. आपल्या देशातील असंघटित कामगारांच्या जीवनाचा अनुभव त्यांच्या गाठीस आहे. अमानवी प्रवृत्तींशी त्या लढल्या. स्वत:बरोबर त्यांनी इतरांनाही मोठे आणि आनंदी केले.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2022/04/IMG-20220428-WA0026-300x245.jpg)
संगीताची पूजा करणा-या भाग्यश्री पांचाळे, चिपांझीसारख्या प्राण्यांवरही माणसाइतकेच प्रेम करणारी जेन, अनुवादासारख्या वरवर रूक्ष वाटणा-या कामाला ओलावा देणाऱ्या आणि त्या कार्याला पवित्र मानणा-या डाॅ.विद्या सहस्रबुद्धे, दूरदर्शनमधील सृजनशील निर्मात्या डाॅ.किरण चित्रे, एच्.आय्.व्ही. ग्रस्त मातांना वैद्यकीय मदतीबरोबर मायेचा हात देणा-या डाॅ.रेखा डावर, संवेदनशीलतेने साहित्याच्या अनेक क्षेत्रांत विचार करणा-या आणि जिद्दीच्या जोरावर मुंबईसारख्या शहरातही स्वतःचे निस्चित स्थान निर्माण करणा-या श्रीमती लता गुठे, एक धाडसी, कल्पक आणि उपक्रमशील बेबीताई गायकवाड आणि हॉटेलसारख्या अवघड क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवून अनेक क्षेत्रे पादाक्रांत करणा-या मानसी चेऊलकर, मूळच्या अमराठी असूनही मराठी भाषेचे वैभव पाहून त्याच्या प्रकाशात अवघ्या विश्वाला गवसणी घालणाऱ्या प्रीती कोटियन, स्वतःच्या अंधत्वावर मात करून आपल्या कर्तृत्वाने समाजाला उजेड दाखवणा-या सुजाता कोंडिकरे अशा अनेक प्रकाश ज्योतींना लेखकाने प्रस्तुत पुस्तकात रेखाटलेय.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2022/04/IMG-20220428-WA0013.jpg)
गगनभरारीत लिहिलेले डाॅ.किरण चित्रे यांच्याविषयीचे वर्णन वाचताना एक सुखद आठवण आली. त्यांनी डाॅ.भालचंद्र फडके सरांकडे पीएच.डी. केली आहे. मी विद्यापीठात प्रौढ, निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागात काम करत होतो तेव्हा आमच्या डिपार्टमेंटमचे विभागप्रमुख फडके सरच होते. मी सरांकडून खूप शिकलो. अनेकदा गप्पा मारताना, सर त्यांच्या पी.एच.डी. विद्यार्थ्यांविषयी तोंड भरून बोलत. अरूणा ढेरे, अरुण खोरे ,कल्याणी हार्डीकर, किरण चित्रे इ.चे ते खूप कौतुक करत आणि अभिमानाने बोलत. ते ऐकून मलाही वाटू लागलं की, आपणही फडके सरांकडं पी.एच.डी.करावं. पण विषय आड आला. सर मराठीचे गाईड होते, तर माझे पोस्ट ग्राजूएशन समाजकार्यातील. अर्थात पुढे मी समाजकार्यात पी.एच.डी.केले. आज सरांना गगनभरारी वाचायला मिळाले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.
खरं तर घर, जमीन खरेदी- विक्री या व्यवसायावर पुरूषांचा पगडा असतो. मात्र इस्टेट एजन्सी या व्यवसायात चिकाटी, कायदेशीर बाबींची पूर्तता करून सचोटीने व्यवसाय करून शीतल जोशी यांनी एक नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला.
लातूरच्या प्रा. स्मिता दगडे ह्या अशाच, ‘महिला
सक्षमीकरणातील दीपस्तंभ’ होत. सकारात्मक बदल घडविण्याचे सामर्थ्य स्मिताताईंनी ओळखून, शिक्षणाची कास धरून, त्या अनेक पारितोषिकांना आणि सन्मानांस पात्र झाल्या आहेत.
श्रीमती श्रध्दा सांगळे यांचीही यशाची कथा सर्वांना आदर्शवत आहे. शिक्षणाची, संगीताची अनेक शिखरे पार करून त्यांनी समाजापुढे एक आदर्श उभा केलाय.
समाजातील वाढते मानसिक आजार आणि त्यांतून अनेक व्याधींचे आणि विनाशाचे प्रमाण वाढते आहे.यावर प्रचार, प्रसार उपचार यांबरोबर योगासारख्या बाबींचे शिक्षण डाॅ.नीलम मुळे देतात.
मुंबईतील ओल्गा डिमेलो यांची अशीच एक यशोगाथा. सर्वांसाठी ती प्रेरणादायी आहे. पतिनिधनाच्या वियोगाने खचून न जाता त्यांनी दाखवलेली जिद्द आणि त्याला कवितेच्या रुपाने दिलेली अभिव्यक्ति निस्चितच प्रशंसेला पात्र आहे.
सामान्य कुटुंबातून आलेल्या शोभा जयपूरकर यांनी दाखवलेली चिकाटी आणि कष्ट हे प्रेरणादायी आणि आदराला पात्र आहेत. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
पत्रकार श्रीमती शीला उंबरें यांच्या लढ्याची कहाणीही अशीच सर्वांसाठी प्रेरणादायक आहे.
शहरी जीवनाचा त्याग करून रत्नागिरी जिल्ह्यात अंध मुलांमुलींसाठी शिक्षण प्रसाराचे पवित्र कार्य करणा-या आशाताई कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता या २ बहिणींच्या कार्याची प्रेरणा समाजात दिशादर्शक आहे.
खेड्यातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन वृत्तपत्र प्रकाशनाच्या क्षेत्रात आपल्या कार्याने वैशाली आहेर यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती
सा-यांसाठी दीपस्तंभ ठरते.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2022/04/IMG-20220428-WA0011.jpg)
पूर्णवेळ गायिका असलेल्या गीता माळी यांनी तर संगीताचा मळा फुलवला ; आणि त्यांच्या कार्याला अनेक बाजूंनी प्रशंसेची दादही मिळत गेली. पण दुर्दैवाने त्यांचे काही काळापूर्वी रस्ते अपघातात निधन झालं.
आकांक्षा हेलसकर यांनीही आवडी नुसार घेतलेले शिक्षण, निवडलेले क्षेत्र प्रतिकूल परिस्थितीतून केलेले कार्य आणि त्यांचा झालेला सन्मान हा समाजाचा मोठा ठेवा आहे; ऐवज आहे.
आजच्या जगातील वेगवान जीवनशैली, भंगलेली कुटुंबपद्धती यांमुळे आपण आपल्या आरोग्यासाठी वेळ देऊ शकत नाही. त्यासाठी संतुलित आहार आणि त्यासोबत फळे, भाज्या यांचा आहारात समावेश करण्याची गरज डाॅ.शारदा महांडुळे ह्या स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ व्यक्त करतात. आहार, आरोग्य यांबरोबर विविध बाजूंचा विचार करून त्याचे उद्बोधन त्या करतात. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी भूषविले आहे. ‘महिला सक्षमीकरण किंवा महिला सबलीकरण’ हे सा-या मानवजातीच्या कल्याणाचे साधन आहे; याबाबींचा विचार करून कार्य करणा-या या ‘प्रकाशरेखा’ आहेत ! आपल्या कार्याने त्यांनी सर्वांपुढे जो आदर्श निर्माण केला, तो निस्चितच प्रशंसनीय आहे.
त्यांच्या या कार्याला देवेंद्र भुजबळांनी शब्दबद्ध करून ‘गगनभरारी’ च्या रूपात समाजासमोर सादर केले आहे.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2022/04/IMG-20220401-WA0013-150x150.jpg)
– लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800