चरित्रात्मक कादंबरीचे यशस्वी लेखक म्हणून भा.द.खेर या साहित्यिक, पत्रकारांचा साहित्य विश्वात उत्तम लौकिक आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘यज्ञ’, ‘क्रांतिफुले’, ‘सौदामिनी’, ‘हसरे दुःख’, ‘आनंद भवन’ या चरित्र नायकांच्या कादंबरीचे वाचन प्रारंभीच्या काळात झाले असल्याने, ‘चाणक्य‘ या त्यांच्या कादंबरीबद्दल काहीसे कुतूहल होते.
१९९२ साली प्रकाशित झालेली आणि २०१२ पर्यंत ९ आवृत्या निघालेली ही उत्कंठावर्धक ३५० पृष्ठांची कादंबरी माझ्या हातात १० वर्षांनी आली आणि मी ती दीड दोन दिवसात वाचून हातावेगळी केली.
सुमारे २४०० वर्षापूर्वी घडलेली एका युगप्रवर्तक महापुरुषाची ‘चाणिक्य‘ ची ही चित्त थरारक सत्यकथा आहे. महापंडित, महामुत्सद्दी आणि महान अर्थशास्त्रज्ञ अशी ‘चाणक्य‘ यांची कीर्ती सर्वदूर झालेली होती आणि आजही ती प्रचलित आहे. ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ हा विश्वविख्यात ग्रंथ सोडला तर या युगपुरूषाचे संपूर्ण विश्वसनीय चरित्र उपलब्ध नाही. ग्रीक, बौध्द, संस्कृत वाड्ःमयात त्यांच्या विषयी जे थोडेफार आले आहे त्यावरून आणि चाणक्यांचे विषयी चर्चेला जाणाऱ्या दंतकथातून ‘केसरीचे उपसंपादक आणि ‘सह्याद्री’ मासिकाचे संपादक ‘भा.द.खेर’ यांनी ही कादंबरी साकार केली हे तेवढेच सत्य आहे.
त्याकाळी भारतात शेकडो राज्ये नांदत होती, परंतु त्यांच्यात एकमेळ नव्हता. सतत संघर्ष होत असे. या अंधाधुंद परिस्थितीचा लाभ उठवून ग्रीक सेनानी सिकंदर याने भारतावर आक्रमण केले. जगज्जेता होण्याच्या दुर्दम्य महत्वाकांक्षेने पछाडून सिकंदर भारतात आला आणि भारत विजेताही न होता त्याला परतावे लागले. या पार्श्वभूमीवर या कादंबरीची रचना झाली असून विष्णू शर्मा या अत्यंत कुशल बुध्दिमान मुलाची बालपणीची करुण कथा प्रारंभात कथन केलेली आहे.
पुढे उच्च शिक्षणासाठी ‘तक्षशिला’ या सुप्रसिद्ध विद्यापीठात अधिक ज्ञान संपादन करण्यासाठी गेलेल्या विष्णूने आपल्या ‘चणक’ गांवाच्या नावावरून ‘चाणक्य’ नाव धारण केले. राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, तत्वज्ञान, वैदिक, वास्तु, वैद्यक, वाड्मय, युध्दशास्त्र इत्यादी जवळपास सर्वच शास्त्राचा सुमारे सोळा वर्षे अभ्यास केला आणि तेथेच आचार्य म्हणून नियुक्त झाला.
अतिशय उत्तम प्रकारे शिकविण्याची चाणक्यांची विद्यार्थ्यांत ख्याती होती. शतखंड भारताला एकसंघ करून, परकीय शत्रूची आपल्या राष्ट्रातून हकालपट्टी करण्यासाठी चंद्रगुप्ताला पूर्णपणे प्रशिक्षित करून त्याला सम्राट करून राजसिंहासनावर बसविले आणि चंद्रगुप्तासह एकसंघ, बलसंपन्न आणि अखंड भारताची निर्मिती केली.
अशा या न्रुपनिर्मात्या युगंधर, क्रांतिकारी महापुरुषाच्या जीवनावरील खेरांनी लिहिलेली ललित रम्य कादंबरी वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे.
चाणक्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि प्रवर्तित केलेले ज्ञान हे आजच्याही काळात अत्यंत उपयुक्त ठरणारं आहे यास्तव “चाणक्य” ही कादंबरी संपूर्ण वाचण्यानेच चाणक्यांचे कार्य आपल्या लक्षात येईल.

– लेखन : सुधाकर तोरणे. निवृत्त संचालक,
माहिती व जनसंपर्क. नासिक.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
भा द. खेर यांची चाणक्य ही कादंबरी अतिशय वाचनीय आणि वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे.
श्री. सुधाकर तोरणे यांनी या कादंबरीचे नेमके परिक्षण केले आहे,