“मनाच्या गंधकोषी” हे पुस्तक म्हणजे डाँ अंजुषा पाटील यांनी त्यांच्या पीएचडी साठी लिहिलेला प्रबंध आहे. शालेय विद्यार्थ्यांविषयी वाटणारा जिव्हाळा आणि प्रेम यामुळे डाँ अंजुषा पाटील यांनी हा प्रबंध लिहिला.
या प्रकल्पाविषयी त्या आपल्या मनोगतात म्हणतात कि “सृष्टीतल्या तमाम मुलांविषयी असलेला वात्सल्यभाव, त्यांच्या निरागस हालचालींचे निरीक्षण, त्यांच्याबरोबर अध्ययन, अध्यापन व संशोधन आणि अनेक प्रकारच्या आविष्कारातून निष्कर्षाप्रत येऊन केलेला सृजनात्मक प्रवास म्हणजे हे पुस्तक आहे”. लेखिका डाँ अंजुषा पाटील पुढे म्हणतात “एखाद्या गोष्टीचा सर्व अंगांनी घेतलेला शोध म्हणजे संशोधन. प्रत्येक मुलाचे मन हे फुलासारखे कोमल असते, त्या कोमल मनावर हळुवार फुंकर घालून त्यांना शिक्षण देणे हे पालक, शिक्षक व समाजातील सर्व घटकांचे कर्तव्य आहे.”
शाळेतर्फे विद्यार्थी वर्गाची सर्वांगीण प्रगती व्हावी या दृष्टीने अनेक उपक्रम राबवले जातात ज्यामुळे आपल्या पाल्याची शाळेतील प्रगती पालकांना समजते. शिक्षक, पालक आणि शाळा या तीनही स्तरांवर या उपक्रमांद्वारे संपर्क रहातो. शिक्षक आणि पालक यांना एकमेकांच्या भेटीतून एकमेकांच्या अडचणी, समस्या समजतात. या उपक्रमांचा आणखी एक फायदा म्हणजे आपल्या पालकांचं आपल्यावर लक्ष आहे ही जाणीव विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देण्यास उद्युक्त करते. आपल्या पाल्याची शाळा आणि त्या शाळेतील शिक्षक कशाप्रकारे मार्गदर्शन करतायत याचीही पालकांना माहिती मिळते.
या उपक्रमांचा आणि घरगुती वातावरणाचा मुलांच्या अभ्यासावर तर परिणाम होतोच पण सकारात्मक कौटुंबिक वातावरणाचा मुलांच्या अभ्यासावर जास्त यशस्वी परिणाम दिसून येतो. या संशोधनाचा विचार करताना निरनिराळ्या अभ्यासकांची मतंही डाँ अंजुषा पाटील यांनी विचारात घेतली आहेत.
स्वत:च्या विधानाला पुष्टी देण्यासाठी के. असिफ यांच्या विधानाचा दाखला देत लेखिकेने समाजाच्या गरजांना अनुसरून सामाजिक विकासाला सुसंगत असे शिक्षण शाळांमधून दिले जाणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले आहे. कारण एक चांगली शाळा सुशिक्षित आणि सुसंकृत समाज घडवण्यात मदत करते तर एक सुसंस्कृत समाज त्या समाजातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवतो. राष्ट्रीय आणि सामाजिक पुनर्रचनेत एकमेकांच्या सेवांच्या परस्पर संबंधांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर त्याचा इष्ट व निरोगी परिणाम होईल.
चाळीतील मुलं म्हणजे मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू म्हणजे फ्लॅट सिस्टीममधे रहाणा-या कुटुंबातील मुलांचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं ते म्हणजे जन्मजात बुध्दीमत्ता असूनही जगण्याची भ्रांत असल्यामुळे चाळीतील मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं तर गगनचुंबी इमारतीत खेळण्याच्या जागेचा अभाव, बंद दरवाजे यामुळे या मुलांच्या मानसिक वाढीला पुरेसे पोषक वातावरण मिळत नाही. अशा परिस्थितीत वैयक्तिक दृष्टीकोनातून स्वत:कडे पहाताना आत्मस्वीकृती, आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि पुढाकार समाविष्ट असतो. आजूबाजूच्या वातावरणाशी स्वत:ला जुळवून घेण्याची क्षमता हा ही एक महत्वाचा निकष आहे. स्वसंवाद साधत असताना अतिविचार टाळणे, दृष्टीकोन बदलणे, परिस्थिती बदलणे या गोष्टी अंगिकारल्या तर बरेच अडथळे दूर होतील. शारिरीक दृष्टया अपंगत्व लाभलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यांना येणा-या अडचणींचाही हा प्रबंध लिहिताना विचार केला आहे.
शाऴा आणि शाळेभोवतालचे भौतिक वातावरण यांचा घनिष्ठ परस्पर संबंध आहे. स्वत: शिक्षक आणि मुख्याध्यापिका असूनही मुलांना शिक्षा करणं हे त्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य आणि हानीकारक असल्याचं स्पष्ट मत डाँ अंजुषा पाटील यांनी मांडलं आहे. तसंच वाढत्या वयाच्या विद्यार्थ्यांमधे वयानुरूप होणारे शारिरीक आणि मानसिक बदल, त्यांचे बदलत जाणारे वर्तन आणि पौगंडावस्थेतील समस्या शिक्षकाने अवश्य समजून घेतल्या पाहिजेत असं प्रतिपादन लेखिकेने केलं आहे.
शिक्षकांनी अध्यापनाचं काम चोख बजावणं, शिस्तबध्द शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन, आनंददायी शालेय वातावरण आणि शैक्षणिक उपक्रमांवर भर ही य़शस्वी शाळेची वैशिष्टयं आहेत.
शैक्षणिक संशोधन पध्दतींमधे निष्कर्षांची वैधता आणि विश्वासार्हता तुम्ही अवलंबलेल्या संशोधन पध्दतीवर अवलंबून असते असं अंजुषा पाटील यांचं म्हणणं आहे. शैक्षणिक संशोधनात सांगितलेल्या स्टेप्सपैकी समस्या ओळखणे, गृहित धरणे, मूल्यांकन अभ्यास करणे या काही महत्वाच्या स्टेप्स आहेत.
संशोधनाचे ध्येय, स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील समस्या सोडवण्याची क्षमता आणि सृजनशील प्रक्रिया ही चांगल्या संशोधनाची वैशिष्टयं आहेत.
ठाणे जिल्हयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून मिळालेली सर्व माहिती एकत्र करून तपासली आणि आलेखासह त्याचा अभ्यास केला गेला. कौटुंबिक वातावरणाच्या सर्वेक्षणात असं दिसून आलं कि हे विद्यार्थी शाळेचे सर्व नियम आणि शिस्त पाळतात, महत्वाचं म्हणजे गृहपाठ व्यवस्थित करतात. हे विद्यार्थी चुकीच्या मार्गाने जाणारे मित्र टाळतात. मात्र घरातील कौटुंबिक परिस्थितीचा मुलांच्या अभ्यासावर निश्चितच परिणाम होतो. ज्या विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य चांगलं असतं तरी काही बाबतीत त्यांचा आत्मविश्वास कमी पडतो तर काही बाबतीत ते आपलं मत स्पष्ट व्यक्त करतात. ते कायम आनंदी असतात तसंच ते कोणत्याही विषयाची काळजी करत नाहीत. अभ्यासाचे उदि्दष्ट, गृहितक, अभ्यासाची परिभाषा अशा विविध संशोधनांनी हा प्रकल्प पूर्ण केला आहे.
पालकांच्या बाबतीत काढलेल्या काही निष्कर्षांपैकी बोलताना लेखिकेचं मत असं आहे कि मुलांच्या मनातील भावना आणि गरजांना पालक जबाबदार असतात. काही पालक मुलांनी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर त्यांना समजावून सागंण्याऐवजी ओरडतात किंवा प्रसंगी मारतात सुद्धा. काही बाबतीत मुलांना शिस्त लावणं अशा पालकांनाही कठीण जातं. काही पालक मात्र मुलांच्या मतांचा आदर करतात.
या प्रबंधावरून असा निष्कर्ष निघतो कि शिक्षणाचं माध्यम कोणतंही असलं तरी अनुकूल कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती लाभली तर कोणताही विद्यार्थी उल्लेखनीय यश मिळवू शकतो. तसेच योग्य अध्यापनाने, योग्य पध्दतीने मुलांचा उत्साह आणि नैतिक मूल्ये वाढवली जाऊ शकतात. पालकांची ताण पातळी व्यवस्थित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी शाळेकडून दोघांसाठीही सेमिनार आयोजित करणे गरजेचे आहे. या विषयातील संशोधनाच्या विविध अभ्यासाच्या पध्दती, अभ्यासक्रम विकास, सहकारी शिक्षण, आदर्श संशोधन प्रणालीची वैशिष्टये अशा वेगवेगळया कोनातून या विषयाचा सविस्तर उहापोह लेखिकेने केला आहे.
वाचन, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, मुलांवर संस्कार, प्रभावी पालकत्व, शिक्षण आणि मुलांचे आरोग्य, पालक आणि पाल्य यांच्यातील सुसंवाद, सुजाण पालकत्व, शिक्षण आणि विकास, पालकांच्या दृष्टीकोनातून सूचना, मुलांचा अभ्यास आणि पालकांचे कौशल्य, अशा प्रकारचे विद्यार्थी आणि पालकांशी संबंधित विषय घेऊन या प्रबंधावर आधारीत काही लेख लिहून डाँ अंजुषा पाटील यांनी विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले आहेत.
या पुस्तकाला आदरणीय प्रवीण दवणे सरांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. दवणे सर म्हणतात कि, “पालक-शिक्षक संवादाचे अतिशय व्यवहार्य असे उपक्रम संशोधक डाँ अंजुषा पाटील यांनी सुचवले आहेत हे या संशोधन ग्रंथाचे वैशिष्टय आहे.” आपलं बहुमोल मार्गदर्शन करताना पुढे ते म्हणतात “शाळा हि पोटार्थी शिक्षण देणारी कार्यशाळा नाही कि मुळाक्षरे, माहिती, तंत्रज्ञान देणारी संस्था नसून नवा, कसदार समाज निर्माण करणारी महत्वाची मातृसंस्था आहे त्याचबरोबर जीवनमूल्ये देणारी, उत्तम, समर्थ नागरिक घडवणारा तो एक संस्कारवर्ग आहे.” दवणे सरांच्या मते हा ग्रंथ म्हणजे नव्या पिढीच्या पालक व शिक्षकांना प्रेरणादायी ग्रंथ झाला आहे.
डाँ राणी खेडीकर यांनीही आपल्या अभिप्रायातून पालक आणि मुलांमधे समन्वय असणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं आहे. त्यांच्या मते पालक, पाल्य आणि समाज यामध्ये स्पर्धा हा सर्वात महत्वाचा घटक ठरतोय त्या दृष्टीने हे पुस्तक अनेक गुंतागुंतीच्या बाबी सोडवण्यास उपयुक्त ठरणार आहे.
अर्पण पत्रिकेत आपल्या प्रिय विद्यार्थ्यांनाच लेखिकेने हा ग्रंथ आर्पण केला असून यशाच्या शिखराकडे निघालेल्या विद्यार्थ्यांचे प्रेरक चित्र दर्शवणारं मुखपृष्टावरील सुबक चित्र प्रतीक कोठावळे यांनी तयार केलं असून कोठावळे प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पु्स्तक पालकांनी आणि शिक्षकांनी जरूर वाचावं ज्यामुळे त्यांच्या पाल्याला यशस्वितेकडे नेणारी वाट आणखी सुकर होईल.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
पुस्तकाचे नाव : मनाच्या गंधकोषी
लेखिका : डाँ अंजुषा पाटील.
पृष्ठे – ११९ मूल्य – रू. १५०/-
प्रकाशक – कोठावळे प्रकाशन
खूप छान रसग्रहण. रसग्रहणावरून हे पुस्तक खूपच उपयोगी आहे असे वाटते.
धन्यवाद विराग 🙏
मनाच्या गंधकोषी हे पुस्तक लिहून डॉक्टर अंजुषा पाटील यांनी एक वेगळा विषय हाताळला आहे. पालक व विद्यार्थी ह्यांना मार्गदर्शक असे हे पुस्तक असावे असे आपल्या परिक्षणावरुन लक्षात येते. पुस्तकाचे मुखपृष्ठ व आपण लिहिलेले परिक्षण दोन्ही उत्तम झाले आहे.
धन्यवाद विवेकजी 🙏
आजच्या जमान्यात खरेचं या ,,मनाच्या गंधकोशी ,,यासारख्या पुस्तकांची गरज आहे .पालक आणि मुलातील संवाद हरवत चाललाय .👍👍
सुंदर मुखपृष्ठ छान पुस्तक .
🙏🙏🙏धन्यवाद
धन्यवाद आशा मॅडम 🙏