Thursday, February 6, 2025
Homeसाहित्यपुस्तक परीक्षण : "मराठी सातासमुद्रापार"

पुस्तक परीक्षण : “मराठी सातासमुद्रापार”

ठाणे येथे नुकतेच एक पुस्तक प्रकाशित झालं. पुस्तकाचं नाव आहे “मराठी सातासमुद्रापार” पुस्तकाच्या लेखिका आहेत सौ. मेघना साने. प्रकाशक आहेत ग्रंथाली.

पुस्तकाच्या नावावरून पुस्तकाचा विषय सहज लक्षात येणार आहे. भारताबाहेर काही कारणास्तव गेलेल्या मराठी लोकांनी तिथे गेल्यावर मराठी भाषेची नाळ तोडलेली नाही. उलट मराठी भाषा आपल्या मुलांना समजावी, आपली संस्कृती, सणवार समजावेत म्हणून त्यांनी अपार कष्ट घेतलेले आहेत आणि घेत आहेत.अशाच काही सुहृदांच्या मेघना साने संपर्कात आल्या आणि त्यांनी या साऱ्यांच्या कार्याची दखल घेतली. स्वतः मेघना ताईंची परदेशवारीही झालेली असल्याने प्रत्यक्ष परदेशातून त्यांनी या साऱ्यांची धडपड जवळून पाहिली. अनेक माणसांशी रेडिओ विश्वासवर “आजचे पाहुणे” व “माझी कविता” या कार्यक्रमांमुळे त्यांचा संपर्क आला. त्यांच्या मुलाखती घेण्याच्या निमित्याने त्यांनी अनेकांचे कार्य समजून घेतले आणि त्यावर आधारित हे पुस्तक लिहिले.

या पुस्तकाला सुप्रसिद्ध लेखिका अनुराधा नेरुरकर यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकात एकूण 30 लेख आहेत. त्या लेखांमधून परदेशात मराठी भाषेवर प्रेम करणारी माणसं आपापली कार्यक्षेत्र, घर – दार, जबाबदाऱ्या सांभाळत मराठी भाषा आपल्या पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरित करण्यासाठी, आपल्या आवडीनिवडी, संस्कृती जपण्यासाठी किती मेहनत घेत आहेत ते वाचून आपण थक्क होतो.

आपल्या महाराष्ट्रात सध्या मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत. इथले पालक नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनियर केजी च्या गप्पा करण्यात धन्यता मानतात आणि साता समुद्रापार मात्र मराठी भाषेची बीजं रोवण्याचं काम जोमात सुरू आहे. याचे उदाहरण म्हणजे अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी. अमेरिकेत केवळ मराठी शाळा काढून त्या थांबल्या नाहीत तर अमेरिकेत लग्न करून आलेल्या, फसवल्या गेलेल्या, छळ होणाऱ्या मुलींना मदत करणे, कोणत्याही समस्यांसाठी स्त्रियांना मदत करणे, विद्यार्थ्यांना मदत करणे, त्यांना राहण्यासाठी घर शोधण्यापासून ते पुस्तक घेण्यापर्यंतच्या कामात सहाय्य करणे साठी त्यांनी “सहाय्य संस्था” काढली आहे. त्यांच्या कार्यावर या लेखातून प्रकाश टाकण्यात आलेला आहे.

शिकागो येथील श्रीमती सुलक्षणा कुलकर्णी यांनी कोरोनाच्या काळात ‘रेडिओ विश्वास’ साठी दिलेला लहानग्यांचा कार्यक्रम…. “राजाने टोपी घातली”.. आम्हीही ‘रेडिओ विश्वास’ वर ऐकलेला आहे. त्या लहानग्यांचे ते वेगळेच मराठी बोल खरंच खूप गोड होते. त्या निमित्ताने शिकागो, न्यू जर्सी येथील मराठी शाळा, अमेरिकेतील मराठी शाळांचे बालविश्व, जर्मनी येथील मराठी कट्टा, तेथील मराठी संमेलने, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, इस्रायल येथील शाळा, सणवार, उत्सव कसे साजरे होतात ते सांगणारे लेख वाचताना आपण भारावून जातो.

“इस्रायलमधील मायबोली” हा लेख तर उत्तमच झाला आहे. त्यांनी तर ५०० वर्षांचे पंचांग मराठीतून तयार केले असून त्यात हिब्रू महिने व मराठी महिने यांची जुळणी केली आहे हे वाचून नवलच वाटले. या लेखात आलेले मायबोली मासिकाचे संपादक _नोहा मस्सील_ यांचे एका परिषदेसाठी लिहिलेले स्वागतगीत इथे देण्याचा मोह मी टाळू शकत नाही. ते गीत आहे……

‘विखुरलेली लेकरे एक होऊन सांगती मायबोलीची इथे ज्योत आहे जागती’ या गाण्यातून समस्त परदेशवासीयांच्या मराठी भाषेवरील प्रेमाच्या भावनाच ऐकू येत आहेत असे वाटते.

१३० देशात पोहोचलेला इंटरनेट रेडिओ-ई प्रसारण, दुबई मधील मसाले उद्योग हे लेखही वेगळी छाप पाडणारे आहेत. यावरून विदेशातील लोक मराठी भाषेवरचे प्रेम जोपासण्यासाठी शाळा काढून थांबले नाहीत तर मराठी, हिंदी गीतांचा आस्वाद घेण्यासाठी त्यांनी ई प्रसारण रेडिओ सुरू केला, त्यातून मान्यवरांच्या मुलाखतीही घेतल्या जाऊ लागल्या हे समजते. इतकेच नाही तर दुबईतील महाराष्ट्रीयन महिलांनी लोणची, मसाले, कोकणातील पदार्थांचा व्यापारही सुरू केला व आपली मराठी खाद्य संस्कृतीही जपली आहे. त्याचबरोबर भारतीय सण – समारंभासाठी लागणारे पारंपारिक सामान, दाग दागिने, सिल्क साड्या, सजावटीच्या वस्तू, गणपतीच्या इको फ्रेंडली मूर्ती पुरवण्याचे कामही त्या करतात. सातासमुद्रापार संस्कृती जपणाऱ्या या व्यवसायाची माहिती थक्क करणारी आहे.

कीर्तने गुरुजी, डॉ. अंजली नांदेडकर व सुहास जोशी यांच्या परदेशातील सांगितिक योगदानाची माहिती देणारे लेखही सुंदर झालेले आहेत.

या परदेशीयांच्या योगदानासोबतच महाराष्ट्रातील रेश्मा सांबरे यांच्या “झेप” संस्थेच्या कामाबाबतचा लेख, संगीत नाटके ते वेब सिरीज पर्यंतचा अभिनय प्रवास घडलेले जेष्ठ श्रेष्ठ जयंत सावरकर, नाटककार अशोक समेळ, व्यंगचित्रकार, प्रकाशक विवेक मेहत्रे, लोकसाहित्याच्या तरुण संशोधक डॉक्टर मोनिका ठक्कर, लेखन तपस्विनी डॉक्टर अनुराधा कुलकर्णी अशा विविध मान्यवरांच्या मराठी भाषेसाठी केलेल्या योगदानांची माहिती देणाऱ्या लेखांमुळे या पुस्तकाला एक वेगळेच वजन प्राप्त झाले आहे.

पुस्तकामध्ये छोट्या छोट्या लेखांमुळे अनेक संस्थांची, अनेकांच्या कार्याची माहिती लेखिकेने करून दिलेली आहे. स्वतः मेघनाजींचे मराठी भाषेवरचे प्रेम यातून दिसून येते. या पुस्तकातील काही लेख रेडिओ विश्वास वरील कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ऐकलेले आहेत, तसेच काही लेख न्यूजस्टोरीटुडे, या वेबपोर्टल वर वाचलेले आहेत. त्यामुळे या लेखांचे एकत्रित पुस्तक पाहून समाधान वाटते.

पुस्तकाची भाषा साधी-सोपी असून माहिती वर्धक आहे. दि. १५/७/२२ रोजी हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याच दिवशी मी एका बैठकीत ते वाचून काढलं, इतकं ते प्रभावी झालं आहे. इतक्या कोऱ्या करकरीत पुस्तकाचा परिचय त्याचा वास जाण्याच्या आंत करून देण्याची मजाही काही औरच आहे. मराठी माणसांनी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.

अलका अग्निहोत्री

– लेखन : अलका अग्निहोत्री
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

पुस्तकाचे नाव :- मराठी सातासमुद्रापार.
लेखिका :- मेघना साने.
प्रकाशक :- ग्रंथाली, मुंबई.
मूल्य :- २००/-
पृष्ठ संख्या :- १४३.

RELATED ARTICLES

8 COMMENTS

  1. मराठी सातासमुद्रापार या मेघना साने यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा अत्यंत रोचक परिचय या परीक्षणातून वाचायला मिळाला आणि पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढली…. धन्यवाद 🙏

  2. सुंदर विवेचन आणि परीक्षण सौ अलका अग्नीहोतरी

    तुमच्या लिखाणात वाचकास उत्सुक करण्याची क्षमता आहे

    असेच लिखाण करीत जावे आणि नविन नविन माहिती उपलब्ध करुन देणे

  3. धन्यवाद सौ अलका
    अभ्यासपूर्वक विवेचन आणि परीक्षण
    तसेच सुंदर रसग्रहण
    मांडणी सुरेख त्या मुळे पुस्तक वाचायची उतसुकता वाढली

  4. मराठी सातासमुद्रापार हे मेघना साने लिखीत पुस्तकाचे सर्वांगसुंदर परिक्षण वाचायला या ब्लॉगवर मिळाले.अत्यंत प्रभावी. आता पुस्तक हातात केव्हा पडते याची उत्सुकता लागलीय!
    लेखिका साने प्रकाशक ग्रंथाली प्रकाशन व सौ. अलका अग्निहोत्री यांचे समीक्षणाबद्दल अभिनंदन तद्वतच वाचक उत्तम प्रतिसाद देतीलच या आदराने शुभेच्छांसह.

  5. अलका अग्निहोत्री खूपच छान मार्मिक परीक्षण केले हवं. उत्तम मांडणी.

  6. धन्यवाद अलका. अग्निहोत्री ! मराठी सातासमुद्रापार या पुस्तकावर मार्मिक परीक्षण लिहिल्याबद्दल!

    धन्यवाद देवेंद्रजी आणि अलकाताई पुस्तक प्रकाशित झाल्याबरोबर त्याच महिन्यात लगोलग परिक्षणही प्रसिद्ध केल्याबद्दल!
    सातासमुद्रापार मराठीसाठी काम करणारी विविध देशातील माणसे न्यूज स्टोरी today नेही जोडून दिली.
    त्या कार्यकर्त्यांचे काम मला सर्वांना सांगावेसे वाटले.

  7. मराठी सातासमुद्रापार :परिक्षण प्रभावी झाले आहे.

    लेखिका साने यांना तर विषेश धन्यवाद!

    वाचक म्हणून उत्सुकता निश्चितच वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी