सप्टेंबर 1939 मध्ये दुसर्या जागतिक महायुध्दास सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारच्या सूचनेनुसार हिंदुस्थानच्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने हिन्दुस्थानची जर्मनी विरुद्ध युद्ध घोषणा केली.
दुसर्या महायुद्धाच्या काळातच 16 जानेवारी, 1940 रोजी श्री भा. गो. बापट यांनी ‘दैनिक काळ’ हे वृत्तपत्र सुरु केले. मुख्य संपादक म्हणून सुमारे 15 महिने त्यांनी त्यातून सैन्य भरतीचा प्रचार केला. त्यात सहभाग म्हणून ते ब्रिटिश – हिंदी लष्करात 4 एप्रिल 1941 रोजी पायदळात अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांना R. I. A. S. C. (राॅयल इंडियन आर्मी सप्लाय कोअर) म्हणजे पुरवठा खात्यात व्हाईसरॉय कमिशन देण्यात आले. 4 एप्रिल ते 24 एप्रिल 1941 या कालखंडात पुणे येथील कँपातील सप्लाय डेपोत त्यांनी प्राथमिक अनुभव व शिक्षण घेतले. नंतर ते 24 एप्रिल रोजी पंजाब प्रांतातील फिरोजपूर येथील सप्लाय खात्याच्या मुख्य प्रशिक्षण केंद्रात गेले. तेथे 2 महिने प्रशिक्षण घेतले. जे युनिट युध्द आघाडीवर जाऊ शकेल तेथे मला धाडा असे त्यांनी वरिष्ठांना सांगितले.
आॅक्टोबर 1941 मध्ये आघाडीवर जाणाऱ्या सतराव्या इंडियन डिव्हिजनच्या 44 ब्रिगेडच्या ट्रान्स्पोर्ट कंपनीत त्यांची नेमणूक झाली. आगगाडीने मुंबई बंदरात व तेथून बोटीने 19 दिवस (6 जानेवारी ते 25 जानेवारी 1942) प्रवास करुन ते गुप्त पध्दतीने सिंगापूरला पोहोचले. 25 जानेवारी ते फेब्रुवारी 1942 अखेर सिंगापूर बेटावर शेकडो जपानी विमानांचे हल्ले झाले. सिंगापूर बेटावर अहोरात्र जपान्यांची बाँबफेक व तोफांची गोळाबारी चालू होती. त्या परिस्थितीत 44 ब्रिगेड बरोबर नवव्या आॅस्टेलियन डिव्हिजनच्या शिलकी युनिट्सना अन्न साहित्य पुरविणे हे श्री बापट यांचे काम होते.
15 फेब्रुवारी 1942 रोजी रात्री ब्रिटिश सेनापतीने शरणागती पत्करली. त्यामुळे 16 फेब्रुवारी 1942 ते 15 आॅगस्ट 1945 असा साडेतीन वर्षांचा
कालखंड श्री भा. गो. बापट यांनी जपान्यांचे युध्दकैदी म्हणून सिंगापूर बेट, सायगाव हॅनोई विमानतळ येथे घालवला.
युद्धकैदी काळात त्यांनी रोजची हकीकत प्रथम रोजनिशीत व नंतर वह्यांमध्ये तारीखवार लिहिली. सुदैवाने त्या सर्व वह्या युध्द समाप्तीनंतर त्यांना हिंदुस्थानात परत आणता आल्या. त्यावरुनच त्यांनी त्यांच्या युध्दकैदी जीवनाची हकिकत लिहिली. ती 6 भागात ‘नवल’ मासिकात प्रसिद्ध झाली. त्याचेच ‘मी एक युध्दकैदी’ हे पुस्तक ‘नवल’ चे संपादक आनंद अंतरकर यांनी 1985 मध्ये विश्वमोहिनी प्रकाशनामार्फत प्रकाशित केले आहे.
369 पृष्ठांचे हे पुस्तक एकदा हातात घेतले की पुढे काय पुढे काय या उत्सुकतेने हातातून खाली ठेवावेसे वाटत नाही. युध्दकैदी म्हणून वावरताना लिहिण्यास कागद नव्हते म्हणून लेखकाने जपानी शिपायाकडून सिमेंटच्या मोकळ्या झालेल्या भुरक्या कागदाच्या पिशव्या मागितल्या व त्यांच्या वह्या केल्या. फ्रेंच व अनामी वृत्तपत्रे मिळवली. बातम्या मिळवल्या. या कालखंडात ना घरची काही खबर होती ना घरच्यांना त्यांची. वाचण्यासाठी जपानी शिपाई अधिकारी यांच्याकडील इंग्रजी पुस्तके मिळवून वाचली . त्याचे उल्लेख या पुस्तकात मधून मधून येतात.
16 फेब्रुवारी 1942 हा लेखकाचा 31 वा वाढदिवस आणि तोच युध्दकैदी म्हणून सुरुवातीचा दिवस. युध्दकैदी जीवनातील थरारक आठवणी वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात. एवढ्या कठीण परिस्थितीत लेखकाचे गीता पठण, जपान मध्ये मिळेल ते खाणे, जीवघेणे प्रसंग यामुळे हे पुस्तक अगदी संस्मरणीय झाले आहे.

– लेखन : विलास आनंदा कुडके.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
युद्धस्य कथा रम्या |
भारत- पाकिस्तान यांच्या १९६५ च्या युद्धावरील “Indo-Pakistan War” हे एका ब्रिगेडियर ने लिहीलेले पुस्तक आणि त्याच विषयावरील भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांची त्यांच्या सनदी अधिकारी असलेल्या सचिवांनी प्रकाशित केलेली दैनंदिनी ही दोन्ही पुस्तके वाचनीय.
मनापासून धन्यवाद सर
🌹युद्धकैदी एक जीवन प्रवास किती खडतर असतो याचा अनुभव सर्व सामान्य लोकांना नसतो. प्रत्येक क्षणी मृत्यूच तांडव असते. कोणत्या क्षणी काय होईल हे माहित नसते.
असे साहित्य सर्वाना माहिती असावे.
खूप सुंदर लिखाण.
🌹धन्यवाद 🌹
मनापासून धन्यवाद मित्रा