नाते संबंधांचा शोध ही एक न संपणारी प्रक्रिया. हा शोध एकाच वेळी गुंतागुंतीचा आणि तितकाच रम्य, भावबंधाचे अनोखे दर्शन घडविणारा. आपल्या भोवताली वावरणारी माणसं आपण पाहतो तेव्हा त्यांच्या नात्यांमध्ये पारंपरिक अनुबंध अनुभवायला मिळतात; जसे की आई-मुलगा किंवा वडील-मुलगी यांच्यातले नैसर्गिक प्रेम. क्वचित प्रसंगी जेव्हा बाप-लेक पाना-फुलासारखे एकजीव होत जातात तेव्हा आपली पाऊले आपल्याही नकळत त्या ठिकाणी रेंगळतात.
‘रॉय आणि बॉय’ हे पुस्तक वाचताना माझे असेच झाले. कारण ही कहाणी आहे एका कलंदर, प्रतिभासंपन्न, काळाच्या पुढे चालणार्या फकीर ‘बापाची’ आणि ‘अँग्री यंग मॅन’मध्ये बदल होत गेलेल्या संवेदनशील मुलाची. म्हणजेच कवी, नाटककार, संपादक, पटकथा लेखक, रुबाईकार रॉय किणीकर आणि त्यांच्याकडून संस्कार घेत वाढलेल्या त्यांचे सुपुत्र कवी, लेखक, संपादक अनिल किणीकर यांच्यातल्या अतूट भावबंधाची.
बाप लेकाच्या नात्यातले अनेक पदर या पुस्तकातून उलगडत जातात. वडिलांच्या विक्षिप्तपणामुळे घरात वारंवार पैशाच्या चणचणीचे प्रसंग येतात. त्यातून मार्ग काढताना लहानग्या अनिल किणीकरांना आई बरोबर बाजारात जाऊन देव विकावे लागतात. शाळकरी वयात फी भरण्यासाठी मॅट्रिकची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना पाणी देण्यासारखी कामे करावी लागतात, या आठवणी वाचताना हृदयाला पीळ पडतो.
सुरूवातीला वडिलांच्या वागण्याचा अर्थ न कळल्याने वडिलांविषयीची कटुता, सल प्रामाणिकणे व्यक्त होते. पण त्याचबरोबर अनिल यांना हे ही कळत होते की कलंदर स्वभावामुळे सगळ्या घराला जे काय भोगावे लागते याची जाण आपल्या वडिलांना आहे तथापि त्यांच्यातला कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नाही, मग नवी आव्हाने आणि नवी संकटे.
पुढे आयुष्यभर ही मालिका चालूच राहिली. पण अनिल वयाने मोठे होत गेले, हळूहळू त्यांच्यातला लेखक, संपादक घडत गेला तेव्हा प्रतिकूल परिस्थितीतही वडिलांना समजून घेण्याची ओढ त्यांना वाटू लागली.
‘श्रीशब्द’ हे अनियतकालिक अनिल किणीकर काढू लागले, कविता लिहू लागले तेव्हा रॉय साहेब आणि अनिल यांच्यात साहित्यिक पातळीवर चर्चा होऊ लागल्या.
‘धरती’ या दिवाळी अंकासाठी रॉय किणीकर नव्या पिढीचे साहित्य गोळा करायची जबाबदारी मुलावर सोपवली तेव्हा तर हे पितापुत्र एकमेकांच्या अधिकच जवळ आले.
अनिल किणीकर मनोगतात म्हणतात, “शरीराने ते माझे वडील होते पण मनाने मात्र ते माझे मित्र होते.” आपल्या वडिलांच्या आठवणी, त्यांच्याबरोबर झालेले वादविवाद आणि गप्पांच्या मैफिली अनिल किणीकरांनी संवादी आणि चित्रदर्शी शैलीतून लिहिल्या आहेत. ते लिहितात, “बाबांच्या गुहेत अद्वितीय स्वप्नांचा खजिनाच होता. एखाद्या उध्वस्त, निराश प्रसंगी अगदी घरात वितंडवाद झाल्यावरही ते घराबाहेर पडले की मी ही त्यांच्यामागे जायचो, पुण्यातल्या हिराबागेजवळच्या पडक्या मशीदीत. मन थोडे शांत झाले की बाबा खांद्यावर हात ठेवून समजावून सांगत, ज्याच्याकडे स्वप्न असतात ना, तो सगळ्यात श्रीमंत. घरात जे काही चाललंय त्यात अडकून पडू नकोस, स्वप्नांचे पंख घेऊन उडण्यात एक थ्रील असतं” !
सतत नव्या नव्या स्वप्नांची, कल्पनांची हाक ऐकत जगणार्या आणि त्याकरता वाट्टेल ते सोसणार्या रॉय किणीकरांचे अद्भूत व्यक्तिमत्व अशा तर्हेने आपल्या डोळ्यापुढे उभे राहते. चित्र, शिल्प, नाट्य, संगीत, चित्रपट, संभोग कोणताही विषय असो किंवा सिगारेट, व्हिस्की घेण्याची गोष्ट असो, त्यावर रॉय साहेब आणि अनिल मोकळेपणाने बोलत आणि परस्परांच्या मताचा आदर राखत असत. विषय समजून घेताना रॉय साहेबांचे प्रगल्भ, निरागस आणि संवेदनशील मन अनिल यांना जाणवत राहायचे.
वडील शरीराने या जगातून गेल्यावरही पत्ररूपाने वडिलांशी त्यांचा संवाद सुरूच राहतो आणि त्यांचे नाते वडिलांहून अधिक त्यांच्या वेदनेशी जुळत गेले आहे हे वाचकाला उमगत जाते.
बाप लेकातले हे नाते ६०-७० च्या दशकातले. ज्या काळात वडिलांशी मान वर करून बोलण्याचेही धाडस न करणारी मुले घरात असायची त्या काळाच्या पार्श्वभूमीवर हे मोकळे-ढाकळे, मैत्रीपूर्ण, सहृदय-संवादी नाते विलक्षण वाटते तसेच ते आजच्या काळाच्या पार्श्वभूमीवरी उठून दिसते कारण आज दोन माणसांमधलाही संवाद हरवला आहे.
रॉय किणीकरांच्या ‘रात्र’ आणि ‘उत्तररात्र’ या संग्रहामधील रुबाया समजून घेण्याकरतासुद्धा या पुस्तकातल्या आठवणी, प्रसंग आपली मदत करतात.
याशिवाय पुस्तकात रॉय किणीकरांच्या हस्ताक्षरातील पत्रे हा तर ऐवजच ठरावा वाचकांसाठी.
रॉय किणीकर वडील, माणूस आणि कलावंत म्हणून कसे होते हे समजून घेत वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणार्या अनिल किणीकरांचे किती नि कसे आभार मानावेत? अमूल्य आठवणींचा ठेवा आणि अनोख्या नात्याचा शोध पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्याबद्दल ‘सुनिधी पब्लिशर्सचे’ही कौतुक करावेसे वाटते. गीतांजली जोशी यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. त्यांचे नेमके, समपर्क आणि प्रामाणिक असे संपादकीय मनोगत मनात खोलवर ठसते. वाचकांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवून वाचावे आणि श्रीमंत व्हावे असे मनापासून वाटते.

– लेखन : दीपाली दातार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
छान. पुस्तक वाचायला आवडेल.