मी महाभारतावरील विविध साहित्यिकांचे म्रुत्युंजय, युगांत, व्यासपर्व, महाभारत: एक सुडाचा प्रवास इत्यादी पुस्तके वेळोवळी वाचली. पण त्यात कौरवांचा १६ वा पुत्र विकर्णाबद्द्ल फारसे वाचलेलं नव्हत. काहींसा हा उपेक्षितच राहिला.
महाभारतातील कर्ण, दुर्योधन, अर्जुन, कुंती, द्रोपदी, अश्वत्थामा, युध्दिष्ठीर, भीष्म या सर्वांवर अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. पण विकर्णावर फारसे कुणीही लिहिलेलं आढळून आले नाही. परंतु अचानक माझ्या हातात “सत्यरथी विकर्ण” संबंधीची श्री उदय जोशी यांची सुमारे ५०० पानांची कादंबरी हातात आली आणि मी उत्सुकतेने दोन दिवसात वाचून काढली अन् अक्षरशः भारावून गेलो.महाभारत हा एक सुडाचा प्रवास आहे. तसाच तो वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रव्रुतींचा देखील प्रवास आहे. ध्रुतराष्ट्राच्या पुत्रमोहाचा, गांधारीचा स्वतःवर लादलेलेल्या अंधत्वाचा, कुंतीच्या विवशतेचा, भीष्म, द्रोण, क्रुपाचार्यांच्या अंधनिष्ठांचा, विदुराच्या असाहाह्य नीतिचा, युध्दिष्ठीरापासून, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रोपदीपर्यंत पांडवाचा आगळा वेगळा स्वभावाचा, दुर्योधनाचा क्रोधाचा, कर्णाचा मित्र कर्तव्याचा, शकुनीचा कुरुवंशीयांवर सूड उगवण्याचा, आणि विकर्णाच्या सत्याच्या व धर्माच्या मार्गावर चालण्याचा प्रवास आहे.
कौरवरूपी भांगेच्या बनात विकर्णरुपी उगवलेल्या तुळशीच्या रोपाची ही उत्तम कादंबरी ! पदोपदी सत्याची व धर्माची बाजू विकर्णाने कशाप्रकारे घेतली याचा परामर्ष या कांदबरीत प्रामुख्याने आणला गेला आहे.
लेखक उदय जोशी यांनी त्यांना विकर्ण जसा जाणवला, भासला तसा चित्रीत केलेला दिसतो. त्याचे कुठल्याही प्रकारे उदात्तीकरण न करता महाभारतातील प्रत्येक प्रसंगात तो कसा वागला यावरच कादंबरीत भर दिला आहे. त्यामुळे कादंबरी उत्कट भावपूर्ण झाली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
श्री उदय जोशींची ओघवती भाषाशैली या कादंबरीच्या प्रत्येक पानात दिसते. महाभारतातील सर्व महनीय व्यक्तीमत्वात विकर्ण हा कौरव दुर्लक्षित राहिला. तो
कॉन्टिनेन्टल प्रकाशनने याच वर्षी प्रकाशित केलेल्या या कादंबरीने प्रकाशात आणण्याचा कौतुकास्पद प्रयत्न झाला आहे.

– परीक्षण : सुधाकर तोरणे
निव्रुत माहिती संचालक, नाशिक.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800