विनोद पंचभाई लिखित भारतीय अव्वल खेळाडूंच्या खेळपटाचा आणि काही अंशी जिवनपटाचा वेध घेणारे “हेच खरे जगज्जेते” हे पुस्तक जानेवारी २०२२ मध्ये चपराक प्रकाशनाने वाचकांच्या भेटीस आणले आहे.
जिगरबाज मीराबाई चानू, झुंजार पी व्ही सिंधू, डॅशिंग लवलिना बोर्गोहेन, धडाकेबाज रविकुमार दहिया आशी उत्तम शब्दफुले खेळाडूंना अर्पण करत लेखकाने त्यांच्या खेळपटाचा सराव ते पदक असा रोमहर्षक प्रवासाचा अचूक वेध शब्दांचे चपखल दान देत सरळ साध्या सोप्या लेखन शैलीतून वाचकांसमोर आणला आहे.
हे पुस्तक खेळ प्रेमींच्या घराघरात असायलाच हवे त्या सोबत पालक असणाऱ्या प्रत्येकाकडे हे असायला हवे असे अनेकदा वाचत असताना वाटत राहते.
मीराबाई चानू हीचा प्रतिकूल परिस्थितीतील संघर्षमय प्रवास, लहान वयातली तिची समज तसंच स्पर्धेच्या ठिकाणी तांदूळ सोबत नेऊन शिजवून ग्रहण करणे असो किंवा मातीचा टिळा लावून दर्शन घेणं असो यातून तिची राष्ट्रभक्ती दिसून येते.
सत्यार्थ प्रकाश तिच्या हाती देऊन राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे गुरू आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष समोर बोलण्याचा आत्मविश्वास आणि धाडसीपणा !
लेखकाने टिपलेले प्रसंग आणि त्यातील बारकावे खूप काही शिकवून जातात.
आई – वडिलांकडे पाहत मुलं अनेक अनेक गोष्टी शिकतात, त्यांच्याकडून प्रेरणा घेतात आणि यशस्वी होतात हे पी व्ही सिंधू वाचताना पुनः प्रत्ययास येते.
काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला सांगा की मी काहीही करू शकतो/शकते हा सिंधूने दिलेला मंत्र फक्त खेळाडूंसाठी नाही तर आयुष्यात संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी आहे.
परिस्थिती बिकट असली, सारी दुनिया विरोधात गेली तरी जवळच्या माणसांनी आपलसं करणं महत्वाचं ठरतं. लवलीना बॉर्गोहेन हीच्या सोबत असलेला भावनिक आधार यशाची पायरी चढणे सुकर आणि संघर्षाला बळ देतो.
मोबाईल आणि सिनेमा या विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत आणि जवळपास सात वर्षे बजरंग पूनिया यांच्याकडे मोबाईल नव्हता तसंच आताही गुरू सोबत असताना दहा दहा तास ते मोबाईल पासून दूर असतात ही गोष्ट आजच्या आणि उद्याच्या येऊ घातलेल्या पिढीपुढे संयम आणि निष्ठेचे उदाहरण ठेवते.
पायथ्याशी उभं राहून डोळ्यात पर्वत शिखरं साठवणाऱ्यांना तो सर करताना धाप लागते याची यत्किंचितही जाणीव नसते त्याचप्रमाणे खेळाडूंचा काही तासांचा खेळ आणि लढत पाहताना खेळाडूंच्या आयुष्यातील संघर्ष आणि सरावातील बारकावे पाहणाऱ्यांच्या लक्षात येत नसतात.
पंचभाई यांनी जगज्जेते मधून तो अचूकपणे टिपून वाचकांच्या समोर आणला आहे.

सातत्य, संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात, धैर्य, देशप्रेम, आत्मविश्वास, अपयशातूनही घेतलेली उभारी आणि यश-अपयशासाठी असलेली खिलाडू वृत्ती म्हणजे जगज्जेते !
पुस्तक केवळ खेळ प्रेमींसाठीच नाही तर आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ पाहणाऱ्यासाठी प्रेरक आहे. कारण यशाचा मार्ग हा संघर्ष आणि अथक परिश्रमाच्या प्रांतातून जात असतो !
म्हणून “जगज्जेते” इतर अनेक भाषेत अनुवादीत करण्यासाठी लेखकाला प्रोत्साहन आणि अनेक शुभेच्छा !

– लेखन : सायली कस्तुरे. पुणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
हेच खरे जगज्जेते उत्तम
व्वा… खूप सुंदर आढावा घेतलाय.
मनापासून धन्यवाद!