Friday, November 22, 2024
Homeसाहित्यपुस्तक माझे मित्र

पुस्तक माझे मित्र

२३ एप्रिल हा  जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने साहित्यप्रेमी श्री विलास कुडके यांनी लिहिलेला विशेष लेख….

‘भेट म्हणून पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक द्या’ असे आज म्हटले जाते. भिलार येथे पुस्तकांचे गाव उभे राहिले आहे. एका पाश्चात्य शौकिनाने पुस्तकांचेच घर बांधले आहे. म्हणजे भिंतींमध्ये पुस्तकेच पुस्तके. पावसाच्या पहिल्या थेंबाने मातीला गंध यावा तशा कोऱ्या पुस्तकांचा मोहवून टाकणारा गंध आवडणार नाही असा माणूस विरळा आहे. पूर्वी न शिकलेली माणसंही ‘किती बुकं शिकलास?’ असे विचारुन विद्वत्ता पडताळायचे. तर सिनेमांमध्ये नायक नायिका धक्का लागून खाली पडलेली पुस्तके उचलून देता देता आणि पुस्तकांची देवाणघेवाण करीत करीत एकमेकांच्या प्रेमात पडायची. पुस्तकात लपवलेला फोटो चोरुन काढून पहायचे. पुस्तकात मिळालेला गुलाब जपून ठेवायचे. शाळेतील पोरं पिंपळाची पाने पुस्तकात ठेवून ती जाळीदार करायचे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.

आयुष्य म्हणजे एक पुस्तक आहे आणि एकेक पान पलटत जायचे आहे असे कितीतरी जनांना वाटत असते. एका शायरने फार सुंदर म्हटले आहे। ‘समय मिलनेपर मुझे पढना जरुर हकीकत ऐ जिंदगी की मुकम्मल किताब हूँ मै’. अलिकडे वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनासाठी स्टाॅलवर मोफत वाचनासाठी उपलब्ध करुन दिलेली पुस्तके वाचनप्रेमींनी अक्षरशः दसऱ्याचे सोने लुटावे तशी लुटून काखोटीला मारुन नेली आणि दुपारपर्यंत केवळ रिकामे स्टाॅल राहिले. तर असे हे पुस्तकप्रेम.

तसं पाहिलं तर पुस्तकांचे वेड सगळ्यांनाच नसते. फार थोडी शहाणी माणसे पुस्तकात रमतांना दिसतात. बरीचशी शहाणी माणसं दिवाणखान्यात शोभून दिसतील अशी महागडी पुस्तके नुस्ती गोळा करीत असतात. पुस्तके वाचणे, जमा करणे ही पुस्तकांसाठी बेचैन होणाऱ्या माणसांसाठी चैनीची गोष्ट असते. अशा या पुस्तकांचा मला लळा लागला तो आई बुधवारच्या बाजरासोबत सांड्यावरच्या सप्तशृंगी देवीपुढील पेपर स्टाॅलवरुन हमखास विकत आणणाऱ्या ‘चांदोबा’ मासिकामुळे. आई स्वयपाक घरात उतरत्या छपराखालील भिंतीतील गजांच्या खिडकीजवळ चांदोबा वाचायची. तेव्हा मला त्यातील अक्षरे अजिबात कळायची नाहीत. पण त्यातील रंगीबिरंगी चित्रांनी मी अगदी हरखून आई भोवती पिंगा घालत रहायचो. पाहू पाहू म्हणून आईला वाचता वाचता थांबवत रहायचो. आई मला नगरसूल ला  आजीकडे घेऊन जायची तेव्हा तेथील छोट्या मातीच्या घरामध्ये कोनाड्यात दत्तुमामाचे ‘मराठी वाचनमाला’ पुस्तक मला खूप आवडायचे. मुखपृष्ठावर एक शाळा, मैदान, झाडाखाली एक मुलगा व एक मुलगी अभ्यास करीत आहे असे सुंदर चित्र माझ्या अगदी स्मरणात आहे. त्यातील चित्रे कृष्णधवल होती तरी ती पाहता पाहता मी जणू काही ती खरीच आहे अशा कल्पनेत रंगून जायचो. ‘चिंगीचा पराक्रम’ या धड्यात चिंगी रेल्वे डब्यात बुरखाधारीचा बुरखा वर करुन पहात मिशीवाल्या चोराला पकडून देते असे चित्र होते. ‘वीर बापू गायधनी’ धड्यात आग लागलेल्या वाड्याचे चित्र होते. ‘आजीचे घड्याळ’ कवितेत आजी सावली पाहून वेळेचा अंदाज घेत आहे असे चित्र होते. डोंबाऱ्याचे चित्र होते. नंतर एका मुद्रणालयाच्या अंधाऱ्या खोलीत भरणाऱ्या बालवाडीत मी जायला लागलो तेव्हा अंकलिपी (अंकल्पी) त्यातील ‘बाराखडी धडे गोष्टी’ यातील कृष्णधवल चित्रे मला खूप खूप आवडायची. भाऊबीजेला भावाला ओवळणारी बहिण. तुळशी वृंदावनासमोर हात जोडून प्रार्थना करणारी मुलगी. बुड बुड घागरी मधील पाण्यातील मडक्यावर लटलटत उभी मांजर कितीतरी चित्रे.

इयत्ता पहिलीत गेलो तेव्हा मला आठवते एका पावसाळी सायंकाळी मोठ्या दांडीच्या बंद ओल्या छत्रीला दारामागे ठेवून वडीलांनी ‘मराठी वाचनमाला’ पुस्तक माझ्यासाठी आणून, ‘बघ, तुझ्यासाठी काय आणले?’ म्हणून माझ्यापुढे ठेवले तेव्हा मला किती आनंद झाला होता!  नगरसूलला पाहिले अगदी तसेच पुस्तक पाहून मी अगदी हरखून गेलो. आईने मग स्वयंपाक घरातील चुलीजवळ ओट्यावर बसून एकेक धडा वाचून दाखवला. आई चौथी पास होती. मला तेव्हा कुठे वाचता येत होते? पण त्यातील चित्रांनी माझे मन आकर्षित करुन घेतले होते.
तिसरीला असतांना मोठीच गंमत झाली. लाटेवाड्यातील पहिलीच्या मुलांच्या हातात बाल भारतीची रंगीत चित्रे असलेली पुस्तके आलेली होती आणि ती सगळीकडे दाखवत मुले उड्या मारत होती. तुझ्या पुस्तकात काळी चित्र अशीही चिडवत होती. पुढे बालभारतीच्या पुस्तकांनी मला त्यातील लेखक कवींची आणखी पुस्तके वाचण्यास उद्युक्त केले. मेजर साळवींच्या धड्यामुळे मी त्यांचे ‘स्वाधीन की दैवाधीन’ हे पुस्तक मिळवून वाचले आणि हरखून गेलो. मंगेश पाडगांवकर, सुरेश भट यांचे कितीतरी गजलसंग्रह मिळवून वाचले.

तेव्हा आम्ही रहायचो ते घर पहिल्या मजल्यावर होते. स्वयंपाक घराला लागून मधली अंधारी खोली होती. त्या खोलीत दाराजवळ उंचावरील कोनाड्यात वडीलांची पुस्तके असायची. अनेकदा डब्यावर डबे चढवून त्यावर मी चढून कोनाड्यापर्यंत हात न्यायचा प्रयत्न करायचो, पण काही केल्या हात पोहचायचा नाही. त्या कोनाड्यात त्या काळातील कितीतरी पुस्तके होती. नाशिक डिरेक्टरी, परशुरामाच्या लावण्या, स्टुडंट इंग्लिश. त्याच दरम्यान कळाले की वाड्यातील मुले मारुती मंदिराजवळील टपरीवरुन पाच पैशात गोष्टींची पुस्तके आणून वाचतात. तेव्हा मी पण आईकडे पाच पाच पैशांचा हट्ट करुन एकेक गोष्टींची छोटी छोटी पुस्तके आणून वाचायला लागलो. आणि मग गोष्टी वाचण्याचा छंदच लागला. कितीतरी गोष्टी होत्या. बुटका जादूगार, शापित राजकन्या, हिम गौरी आणि सात बुटके, सिंदबादच्या सफरी, कितीतरी. जादू, पऱ्या, राक्षस असं सगळं ते अद्भुत विश्व होते.

भोईरवाड्यात मी खेळायला जायचो तेव्हा वृंदा मावशीच्या हातात सुमती पायगावकरांनी मराठीत १६ भागात संपादित केलेल्या हंस अंडरसनच्या परिकथा माझ्या पाहण्यात आल्या होत्या. श्रीराम विद्यालयात पाचवी सहावीला असताना गोष्टी सांगायच्या स्पर्धेत मला आठवते बक्षिस म्हणून पुस्तकच मिळाले होते. सरदार चौकात वाचनालय आहे. तिथे मी सुरुवातीला वृत्तपत्रे वाचण्याच्या निमित्ताने जाऊ लागलो. तेथील घाऱ्या डोळ्यांच्या व शरीराने किडकिडीत असलेल्या ग्रंथपालाने एक दिवस मला बोलावून ‘तुला वाचण्याची आवड आहे का?’ म्हणून विचारले. मी मान डोलावली. तेव्हा त्याने तेथील कपाटातून एकेक पुस्तक घेऊन तिथल्या तिथे वाचायची परवानगी दिली. ते ग्रंथपाल माझ्या नेहमी स्मरणात राहतील. कारण त्यांनीच पुस्तकांचा खजिना माझ्यासाठी उघडून दिला. मला किती वाचू अन किती नाही असे झाले. मी त्या ग्रंथालयाचा सदस्य झालो. वर्गणी माफक होती. मी एकेक पुस्तक घरी घेऊन यायचो. त्यामध्ये अनुवादित विज्ञान कथा, स्वामी विवेकानंद यांचे खंड असायचे. वाचून त्याचे टिपण मी वहीत घ्यायचो. नगरसूलला ‘विज्ञान परिचय’ हे पुस्तक त्याच दरम्यान माझ्या पाहण्यात आलेले होते त्यामुळे विज्ञान शास्त्रज्ञ शोधकथा यावर माझा भर असायचा. एकदा  ‘कंपलिट शेक्सपिअर’ या पुस्तकाने इतकी मोहिनी घातली की त्याच्या बदल्यात मी ग्रंथालयास माझ्या जवळील  ‘१०८ उपनिषिदे’ हे पुस्तक देऊन ते मिळवले. नियमात तसे नव्हते तरी माझे पुस्तक प्रेम पाहून ग्रंथपालाने मला आनंदाने तो ग्रंथ दिला.

हळूहळू माझ्या वाचनाच्या भौगोलिक कक्षा रुंदावल्या. सरदार चौकातील वाचनालय मला लहान वाटू लागले, म्हणून की काय मी गोदावरी पलिकडे सार्वजनिक वाचनालयाचा सदस्य झालो. तिथे तर विषयवार पुस्तकांचे इतके भांडार होते की मोठा खजिनाच हाती यावा तसे मला झाले. माझे वाचनाचे प्रेम पाहून मला थेट आत कपाटांच्या रांगांमध्ये जाऊन पुस्तक शोधून आणण्याची परवानगी मिळाली. मग काय ज्या कपाटांकडे फारसे कोणी फिरकत नसायचे त्या त्या कपाटातील पुस्तकांवरील धूळ झटकून मी एकेक पुस्तक निवडून वाचू लागलो. साहित्याचे मोठे दालनच माझ्यासाठी खुले झाले. माझ्या वाचनालयाच्या फेऱ्या वाढल्या. चुकला फकीर मशिदीत तसा मी वाचनालयात सापडू लागलो. मधल्या आळीत एक वाचनालय होते. तेथेही मी जाऊ लागलो. एके दिवशी हेमलता टाॅकीजला सिनेमा पहायला गेलो तेव्हा तेथे जवळच ग्रंथालयाचा शोध लागला. तिथेही मी सदस्य झालो. एकदा ‘रसचिंतामणी’ नावाचा जुना ग्रंथ मी तेथून घरी आणला. रोग आणि त्यावरील आयुर्वेदिक औषधावरील श्लोकबद्ध ग्रंथ मी अक्षरशः एका वहीत उतरवून घेतला. अशाप्रकारे सार्वजनिक वाचनालयातून आणलेल्या ‘फेअरी टेल्स’ मी वहीत सुंदर कोरीव अक्षरात उतरवून घेतल्या होत्या. तर रसचिंतामणी उतरवता उतरवता ग्रंथपाल माझा पत्ता शोधत शोधत घरी आला. तेव्हा मी लाटे वाड्यात रहायचो. तो काकुळतीला येऊन म्हणाला ‘ग्रंथालयाबाहेर देता येत नाही असा ग्रंथ मी तुम्हाला चुकून दिला तो ताबडतोब द्या नाहीतर माझी नोकरी जाईल.’  त्याची ती अवस्था पाहून मी तो ग्रंथ लगेच परत केला.

दहावीला असताना मराठीच्या लवेकर बाईंनी एकदा वि. स. खांडेकर अत्यवस्थ असल्याचे डोळ्यात पाणी आणून सांगितले. त्याच्या आदल्या वर्षीच त्यांच्या ययाती कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. मी लगेच वाचनालयातून वि. स. खांडेकरांची एकेक पुस्तके आणून वाचली. श्रीकांत सिनकरांच्या पोलिसी चातुर्य कथा, द. मा. मिरासदार यांच्या विनोदी कथा, शेरलॉक होम्सच्या गुप्तहेर कथा, सोळा खंडातील अरेबियन नाईट्स, स्वामी, झुंज, शहेनशाह, श्रीमान योगी अशा कितीतरी पुस्तकांनी माझ्यावर भुरळ घातली. बहुधा मी रहात असलेल्या वाड्यात, गल्लीत हातात नेहमी पुस्तक असलेला केवळ मीच असावा. एकाच खोलीत काॅट चूल होती. काॅटला लागूनच आईच्या काळातील पितळी भांड्यांची रॅक मी पुस्तकांसाठी ठोकून ठेवली होती. त्या काळात रघुवीर जादूगार प्रसिद्ध होते. त्यांच्या जादूची पुस्तके सुद्धा मी हौशीने घेतली. त्यांच्या ‘प्रवासी जादूगार’ पुस्तकाने तर मला आणखी प्रवास वर्णन वाचायला प्रेरित केले.
दहावीनंतर अकरावी विज्ञानला काही महिने महाविद्यालयात गेलो नंतर शिक्षण सोडून मेनरोडला रेडिमेड कपड्यांच्या दुकानात कामाला लागलो. तेव्हा पगार अगदी तुटपुंजा होता. असे असले तरी कुठे पुस्तक प्रदर्शन असले की मी पाच रुपयांपर्यंतची पुस्तके घ्यायचोच घ्यायचो. ग्रेस यांच्या ‘सायंकालीन कविता’, ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कविता’, नारायण सुर्वे यांचा ‘जाहिरनामा’ असे तेव्हा प्रकाशित काव्यसंग्रह मी घेतले होते. अशाच प्रदर्शनात एकदा मला ‘विश्वकोश’ दिसले. एकेका खंडाची किंमत शंभर रुपये होती. दरमहा एक याप्रमाणे मी पैसे साठवून ९ खंड घरी आणले. माझ्या घरातील पुस्तकांची रॅक हळूहळू पुस्तकांनी भरु लागलेली होती.

गावाकडची मंडळी घरी आली की मी तेव्हा कुठले ना कुठले पुस्तक वाचत बसलेला असायचो. तेव्हा ती मंडळी माझ्याकडे अशी काही पहायची की जणू काही पुस्तक वाचून काही उपयोग नाही. पुस्तकांचा नाद म्हणजे वेड्या माणसांचे काम असेच ती त्यांच्या पाहण्यातून सुचवायची. पुस्तकांचे वेड काही कामाचे नाही असा व्यवहारिक सल्लाही मग मिळायचा. एवढ्याने माझे पुस्तक प्रेम काही कमी झाले नाही. मेनरोडवरुन कामावरुन परतण्याचा माझा मार्ग रामसेतूवरुन असायचा. भांडी बाजारात माझा मित्र विजय सातपुते रहायचा. तोही माझ्या सारखाच पुस्तक प्रेमी. रशियन पुस्तकांच्या प्रदर्शनात मी आणि त्याने डोटोवस्की, अलेक्झांडर पुश्किन लिओ टाॅलस्टाय यांची कितीतरी पुस्तके ‘अॅना करीना’ पुनरुत्थान गुलाबी आयाळीचा घोडा’ इत्यादी अगदी स्वस्तात म्हणजे १०-१२ रुपयात म्हणून घेतली होती. भांडी बाजारातच एक दुकान होते. तिथे रस्त्यावर नेहमी जुनी पुस्तके मांडून ठेवलेली असायची. तिथे मी नेहमी घुटमळायचो. जुन्या पुस्तकांवरील मूळ किंमत खोडून वाढीव किंमतीत ती विकत असे. रामसेतूवरुन नारोशंकराच्या मंदिराजवळ आले की तिथे एक ‘प्रेमनगर पुस्तकालय’ होते. तिथे हिंदी धार्मिक तंत्र मंत्राची पुस्तके असायची. अध्यात्मिक पुस्तके वाचण्याचा छंद त्यामुळेच लागला.

एकदा असाच मेनरोडवरुन घरी जात होतो तेव्हा ज्योती स्टोअर्स च्या शोकेसमध्ये ‘पु. ल. एक साठवण’ पुस्तकाची प्रकाशनपूर्व सवलतीची आकर्षक जाहिरात पाहिली आणि मग पैसे साठवून मुदतीत भरुन नोंदणी केली. पु.ल वाचताना पी जी वुडहाऊसची गोडी लागली. शनीचौकात एका पुस्तकाच्या दुकानात मला पी. जी. वुडहाऊस आणखी भेटला. माझे लग्न झाले तरी पुस्तकप्रेम काही कमी झाले नाही. पंचवटीतून उपनगरला रहायला गेलो. तिथेही छोट्याशा खोलीत त्याच रॅकमध्ये पुस्तकांचा संसार मांडलेला होता.

एक आईने वीस रुपयात घेतलेले लाकडी कपाट होते. रॅक फुल झाल्याने लाकडी कपाटातही पुस्तकांनी अधिक्रमण केलेले होते. कपाटाच्या जाळीतून बघणाऱ्याला अंदाज येत होता की आत पुस्तकेच पुस्तके आहेत. ग्रीम ब्रदर्स फेअरी टेल्सचे हिरवे बाईंडगचे पुस्तक जाळीतून डोकवायचे. एक मेव्हणी पुस्तकप्रेमी. घरी आली की हक्काने जिजाजी जिजाजी करीत एकेक पुस्तक घेऊन जायची. ती माझी वाचून झालेली असायची त्यामुळे परत नाही आली तरी मला त्याचे काही वाटायचे नाही. एक मेव्हणाही असाच पुस्तकप्रेमी. त्याने पु. ल. साठवण नेले. रॅकमध्ये अशाप्रकारे कमी झालेल्या पुस्तकांची जागा नवीन पुस्तके घेई. एकदा शासकीय रुग्णालयाजवळ रस्त्यावर पुस्तके मांडलेली होती. त्यात पॅपिलान , शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथा सहा भाग, सिडने शेल्डान याच्या कादंबर्‍या पहायला मिळाल्या. ही पुस्तके मी एकेक करुन घेतली.

संसारात राहून पुस्तकप्रेम जपणे तसे परवडण्यासारखे नसते. पुस्तके ही काही संसारोपयोगी गोष्ट नाही. तुटपुंज्या उत्पन्नात ही हौस भागवणे अवघड असते. पण एखादे पुस्तक संग्रहात असलेच पाहिजे असे जेव्हा वाटे तेव्हाच मी पुस्तक घेई. काही वेळा आधी विचारले तर महागड्या किमतीमुळे पुस्तक घ्यायला घरुन रुकार मिळेलच अशी खात्री नसायची. नंतर नंतर पुस्तकांच्याही किंमती वाढत गेल्या. अगदी आवडलेच तर पुस्तक घ्यायचे असे मी ठरवले.वसंत कानेटकरांची अश्रुंची झाली फुले, वेड्याचे घर उन्हात अशी काही नाटके, हेनरीक इब्सेनची नाटके, कुसुमाग्रजांचे प्रवासी पक्षी, छंदोमयी इ. कविता संग्रह, श्रीपाद कृष्ण कोल्हाटकरांचे सुदाम्याचे पोहे, पर्सी बी शेले यांचा कवितासंग्रह, समग्र गडकरी, समग्र बालकवी, रवींद्रनाथांचे वाङमय, अॅन्टॅन चेखेव मोपासा यांच्या कथा अशी कितीतरी पुस्तके माझ्या संग्रहात जमली. आपल्या काळातील बालभारतीची पुस्तक मी शोध घेऊन महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयातून मिळवली. त्या आधीच्या मराठी वाचनमालेचे दुसरे पुस्तक सासुबाईंनी त्यांच्या शाळेतून मिळवून दिलेले होते. तर याच मालिकेतील अक्षरशः वाळवीग्रस्त एक पुस्तक सुट्टीच्या दिवशी कसारा येथील श्री लोखंडे यांच्याकडून मिळवले होते. नवयुग वाचनमाला अशीच मी प्रकाशकाशी पत्रव्यवहार करुन मागवली होती.

मुंबईला शासकीय सेवेत लागल्यावर मला नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयात जाता येईना. हळूहळू ते माझ्यासाठी दुरापास्तच झाले. मग मी मंत्रालय केंद्रिय ग्रंथालयात जावू लागलो. जवळच सचिवालय जिमखान्यातील ग्रंथालयाचा सदस्य झालो. कामानिमित्त गोव्याला गेलो तेव्हा तेथील कार्यालयात मला मेजर साळवींचे ‘स्वाधीन की दैवाधीन’ हे पुस्तक मिळाले. नवी दिल्लीला कामानिमित्त गेलो तेव्हा जवळच साहित्य अकादमीतून रवींद्रनाथ टागोर यांचे वाङमय घेऊन आलो. माझ्या एका वाढदिवसाला मी पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तक द्या म्हटले तर सहकाऱ्यांनी ग्रेसचा कवितासंग्रह भेट म्हणून दिला.

मध्यंतरी रिडर्स डायजेस्ट कडून आकर्षक गाडी जिंका म्हणून जाहिरात आली. त्यात अनेक इंग्रजी पुस्तके घरात आली. गाडी काही आली नाही. धार्मिक पोथ्या पुस्तकांचीही भर पडत गेली. एक लोखंडी कपाट भरुन पुस्तके झाली आहेत. जागेअभावी बरीचशी पुस्तके लाफ्टवर रॅकवरच आहेत. संग्रहातील पुस्तके जपणे हे मोठे आवश्यक काम असते. बरीचशी पुस्तके बाजारात बाहेर मिळत नाही अशी दुर्मीळ झालेली आहेत. या पुस्तकांसाठी काचेची दरवाजे असलेली मांडणी करुन घ्यावे असे माझे किती दिवसांचे स्वप्न आहे. ते कधी पूर्ण होईल कुणास ठाऊक.

आजही मला कुठे पुस्तक प्रदर्शन दिसले की माझे पावले तिकडे वळतातच. चर्नीरोडला सुंदराबाई हाॅलमध्ये अशी प्रदर्शने मधून मधून भरतच असतात. तेथे मध्यंतरी अजब पुस्तकालयाने कोणतेही पुस्तक ५० रुपयात म्हणून प्रदर्शन भरवले होते. तेथून मी कितीतरी पुस्तके खरेदी केली होती. बरीचशी पुस्तके दुर्मीळ होतात तेव्हा आपल्याला माहित होतात.  ‘मीनाकुमारी की शायरी’ हे असेच एक पुस्तक. कुठेच मिळेना. ते मला मंत्रालयात उपसचिव श्री सुरेश कळसकर यांनी वाचायला दिले. आॅनलाईन दुर्मीळ पुस्तके शोधली तर खूप मिळतात. अगदी अठराव्या एकोणिसाव्या विसाव्या शतकातील पुस्तके डाऊनलोड करता येतात. जुन्या पुस्तकांचे डिजिटलायझेशन करुन त्यांचे जतन करण्याचे आजकाल सर्वत्र प्रयत्न सुरु आहेत. मुद्रित पुस्तकांच्या तुलनेत ई बुक्स स्वस्तात उपलब्ध होत आहेत. पुस्तकांचे जगत अफाट आहेत. वाचलेल्या पुस्तकांच्या तुलनेत न वाचलेली पुस्तकेच अधिक आहेत आणि दिवसेंदिवस त्यात नव्याने भर पडतच आहे.

कोणे एकेकाळी मी माझा या चारोळी संग्रहातील चारोळ्या मी वहीत उतरवली होती. वि. स. खांडेकर यांच्या पुस्तकातील सुंदर वाक्ये उतरवली होती. अलीकडेच मी आॅनलाईन जाॅन एलिया यांचे दोन गझलसंग्रह, श्री विकास शुक्ला यांनी मराठीत अनुवादीत केलेल्या मोपासा यांच्या कथा, वि. स. खांडेकर यांचे ‘सहा भाषणे’ आणि ना सी फडके यांचे गुजगोष्टी मागविले. आता नाशिकमध्ये पुन्हा नव्याने सदस्य होऊन ‘मास्तरांची सावली’ हे पहिले पुस्तक वाचावयास आणले आहे. पुस्तकांचे प्रेमच असे आहे की ते जराही कमी होत नाही. वाढतच राहते. फक्त हे प्रेम स्वतः पुस्तके मिळवून करावे. आपल्या संग्रहातील पुस्तक कोणी मागितले तर पुस्तक प्रेमी कोणालाही काळजाचा तुकडा मागितल्या सारखेच वाटेल यात काही शंका नाही.
– लेखन :- विलास आनंदा कुडके.
– संपादक :- देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. दाद देणारे दुर्मीळ असतात. आपण गुणग्राहकतेने माझ्या लेखाला उत्स्फूर्त दाद देऊन येथे स्थान दिले याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. ही दादच खरी ऊर्जा असते कुठल्याही लेखकासाठी. मनापासून धन्यवाद सर्वांचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments