Wednesday, February 5, 2025
Homeकलापेणचे गणपती

पेणचे गणपती

गणेशमूर्तीसाठी जगभर प्रसिद्ध असलेले पेण, म्हणजे रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

पेण पनवेल पासून 34 तर अलिबागपासून 30 कि.मी. अंतरावर आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्याची प्रामुख्याने गणेशोत्सवात मागणी केली जाते, असा पेण येथे तयार झालेला आपला गणपती बाप्पा अगदी संपूर्ण वर्षभर गणेश मूर्ती, तसेच देवीच्या मूर्ती निर्मीती प्रक्रियेत असलेला पेण, परिसरातील हा महत्त्वाचा उद्योग व्यवसाय आहे. गणेशोत्सवाच्या काळात 5 कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेची आर्थिक उलाढाल येथे होते.

पेणच्या गणेशमूर्तीचे आगळेवेगळे असे वैशिष्ट्य आहे. गणेशमूर्तीतील सुरेख रंग, सुबकता, नाजूक कलाकुसर, पाहताना असे वाटते की, जणू काही प्रत्यक्ष श्रीगणेशाने येथील कलाकारांना स्वतःची मूर्ती बनविण्याची कला मुक्तहस्ताने देऊन या भागाचे महत्व वाढविले आहे.

केरळचा काव्या, गुजरातचे पी.ओ.पी. आणि महाराष्ट्राची कलाकुसर असे एकत्र मिश्रण होऊन पेण परिसरातील गणपती बाप्पांची मूर्ती जगाचा प्रवास करायला सिद्ध होते. ऑस्ट्रेलिया, दुबई, कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, स्विझरलँड, फिजी आणि भारतात सर्वत्र या मूर्ती जातात.

पेण, हमरापूर, शिकी आणि आसपासचा परिसरात घरोघरी गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामी सर्व मंडळी गुंतलेली असते. अगदी गणपतीचे गाव म्हटले तरी चालेल. अशा हजारो मूर्ती येथे तयार होतात आणि आपले आगळेवेगळे वैशिष्ट्य जपतात.

पेणच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती सुरेख असण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे येथील कारागीर मंडळी नाजूक कलाकुसर, रंगरंगोटी आणि डोळे काम अत्यंत सुबकतेने करतात, त्यास आखणी असे म्हणतात. या कामासाठी पेणच्या कारागीरांना तोड नाही. त्यांच्याकडे आखणीची ही कला पिढीजात आलेली आहे. तर काही ठिकाणी नवोदितांनाही ती शिकविण्यात आली. अगदी महिला कारागीरही हे कलाकुसरीचे काम सहजतेने येथे करतात.

एखादा नवीन कारागीर आला की, त्याला पहिल्या वर्षी ही कला शिकविण्यात येते व त्या आधारे तो पुढे हे काम सहजतेने करतो. या सर्वावर संबंधित गणेश शाळेच्या प्रमुखाचे लक्ष असतेच. कोठेही याबाबत तडजोड केली जात नाही. म्हणूनच पेण परिसरातील आसपासच्या गणेश मुर्ती या सुबकच असतात असे ठामपणे येथील कारागीर मंडळी म्हणतात.

अगदी 4 इंच ते 12 फुट उंचीच्या मूर्ती पेण परिसरातील कारखान्यात तयार होतात. यापेक्षाही अधिक उंच मूर्तीही तयार केल्या जाऊ शकतात, पण वाहतुकीचा प्रश्न मोठा असल्याने ते टाळले जाते.

येथील कारखान्यात काही मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या तर काही शाडूच्या तर पर्यावरणाला पूरक अशा कागदापासूनच्याही मूर्ती तयार केल्या जातात.

शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी जुने जाणते कारागीर मिळत नाही. शिवाय शाडुची दोन फुट उंच मूर्ती तयार करण्यास जर, एक हजार रुपये खर्च येत असेल तर पी ओ. पी. मध्ये ती सहाशे रुपयात होऊ शकते. शिवाय एका दिवसात एक कारागीर शाडुच्या तीनच मूर्ती बनवू शकतो मात्र तो पी.ओ. पी. च्या दहा मूर्ती बनवतो. शाडूची मूर्ती जास्तीत जास्त दोन ते तीन फुट उंच होऊ शकते, तर पी.ओ.पी. ची 12 ते 15 फुट होते. शिवाय विसर्जनानंतर शाडुची एक दिवसात,तर पी. ओ. पी. ची मुर्ती 10 दिवसात विरघळते. ही महत्त्वाची अडचण आहेच.

नाजूक कलाकुसरी सोबतच, या मूर्तीवर हिरे-मोती सजवून देण्याची विशेष मागणी गणेश मंडळ व गणेश भक्तांकडून होत असल्याने, मूर्तीला त्याप्रकारे सजवण्यात येत आहे. त्यामुळे मूर्तीसाठी वेगळे दागिने घ्यायची आता गरज नाही.

जागेचा प्रश्न, लोडशेडिंग, पाऊस, पाणी, कारागिरांची कमतरता अशा विविध अडचणी जरी असल्या तरी प्रत्यक्ष विघ्नहर्त्याचीच निर्मिती याठिकाणी होत असल्यामुळे त्याही अडचणींवर मात करून पिढ्यान पिढ्या हा व्यवसाय करणाऱ्या कारखानदारांनी व मूर्तीकार कारागिरांनी, पेणचे वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे. या खेरीज या कारागीरांना बारमाही काम असल्याने कुटुंबाच्या रोजीरोटीलाही मदत होते.

गणपती झाले की गौरी, नवरात्र, दिवाळी आणि दिवाळीचे मावळे अशी वर्षभर कामाची रेलचेल येथे असते. येथील प्रत्येक कारखान्यात जवळपास पंधरा ते वीस हजार मावळे तयार होऊन ते दिवाळीचा किल्ला लढवायला सिद्ध होतात. अशा प्रकारे येथे जुन्या जाणत्या कारागीराच्या मार्गदर्शनात नवीन कारागौर अहोरात्र काम करतात.

एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही कला सहजतेने हस्तांतरीत होते व त्यायोगे एका अभिजात कलेचा वारसा पुढे जोपासल्या जातो आणि नव्या कारागिरांची पिढी, पुढे येते हे महत्त्वाचे….

हिरामण भोईर

– लेखन : हिरामण भोईर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी