रायगड जिल्ह्यातील पेण हे शाडूच्या गणेशमुर्तीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर माहीत नाही असा, जगातील एकही गणेश भक्त नसावा.
आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवलेल्या पेण शहर आणि तालुक्यात गणपतीच्या मुर्तीचे आजमितीस एक हजाराहून अधिक कारखाने आहेत. तब्बल एक लाखाहून अधिक व्यक्ती या व्यवसायात या ना त्या स्वरूपात जोडल्या गेल्या आहेत. इतकी मोठी रोजगार क्षमता या व्यवसायानं निर्माण केली आहे.
महाराष्ट्रातल्या गावागावात आणि घराघरात गणपतीच्या आगमनाची लगबग सुरु होते तेव्हा पेण शहरातून गणपती बाप्पा रवाना झालेले असतात.
वर्षभर इथले लोक हाच व्यवसाय करतात. वर्षभरातले ११ महिने मूर्तीकाम आणि शेवटच्या महिन्यात विक्री असे या व्यवसायाचे स्वरुप आहे. थोडक्यात अकरा महिने आर्थिक, श्रम गुंतवणूक आणि शेवटच्या महिन्यात उलाढाल असे गेली अनेक वर्ष सुरु आहे.
पेणमध्ये गणेशमूर्ती तयार करण्याच काम कसे सुरू झालं ? या विषयी असं सांगतात की, पूर्वी धर्मशास्त्रानुसार अंगणातील मातीची मूर्ती घडवून घरगुती गणेशाची स्थापना केली जायची.
लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिल्यानंतर मूर्ती कामाच्या या व्यवसायाला चांगले दिवस आले.
कोकणातून मुंबईत आणि काही प्रमाणात पुण्यात स्थिरावलेल्या भक्तांसाठी पेणच्या मुर्ती उपलब्ध असत. तसे महाराष्ट्रात अन्यही गणेश मुर्तीकार होते आणि आहेत परंतु पेण प्रसिद्ध होण्यास हे एक कारण आहे की पेण हे मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांपासून सारख्या अंतरावर आहे. त्यामुळे इथे हा व्यवसाय खऱ्या अर्थाने १९२० नंतर रुजला. घरगुती व्यवसायाला कारखानदारी स्वरूप आले. मग मजूरी, कारागिरी, इतर संलग्न काम जसे रंगकाम, वाहतूक इ. साठी कामगारांची गरज भासू लागली. त्यातून स्थानिकाना जवळपास वर्षभर रोजगार मिळू लागला.
गणपतीची एक मुर्ती ही तब्बल २५ कारागिरांच्या हातातून जाते. १९८० नंतर शिकलेल्या कारागिरांनी स्वतः चे कारखाने सुरु केले. आज त्यातले अनेक प्रसिद्ध झाले आहेत.
आपण ज्याला शाडू माती म्हणून ओळखतो, ही शाडू माती पेणच्या परिसरात उपलब्ध नाही. ती येते थेट गुजरात मधल्या भावनगर मधून. सध्या बदलत्या काळानुसार या व्यवसायात अनेक बदल झाले आहेत .१९८० नंतर शाडू मातीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मुर्ती तयार होऊ लागल्या कारण तुलनेने प्लास्टर ऑफ पेरिसच्या मुर्ती या टिकावू असतात. त्यामुळे मुर्ती दूरवर पाठवणे शक्य होऊ लागले आहे. नंतर मोठ्या शहरात कच्च्या मुर्ती नेऊन तेथे त्याच्यावर अखेरचा हात फिरवून त्या विकण्याची वेगळी बाजारपेठ तयार झाली. त्यामुळे पेण तालुक्यात कच्च्या मुर्ती तयार करणारे कारखानेही उभे राहिले. हमरापूर, जोहे या ठिकाणी असे कारखाने आहेत. मूळ मूर्ती जी मातीत बनवली जाते अशी मूर्ति तयार करणारे मात्र प्रत्यक्षात खूपच कमी लोक आहेत. याच
मूर्तीवरून नंतर त्याचा मोल्ड तयार करून मुर्ती तयार केल्या जातात. त्यासाठी जुजबी कौशल्य आवश्यक असते.
गणेश मूर्ती कलेत मूर्तीचे डोळे रंगवणे हे मोठे कसब आहे. ते काम सरावलेले कलाकारच करतात .बाकी कामे मात्र कुणीही थोड्याश्या प्रशिक्षणानंतर करू शकतो.
पेणच्या गणेश मुर्तीचा व्यवसाय आता विदेशातही जावून पोहोचलाय. विदेशात स्थिरावलेली मराठी कुटूंबे आवर्जून पेणला मागणी नोंदवून मुर्ती नेतात.
बदलत्या काळात अनेक नवी आव्हाने या व्यवसायासमोर उभी राहतायेत. शाडू मातीच्या वापराला मर्यादा आहेत. तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापराला आक्षेप आहे. अशाही परिस्थितीत व्यवसाय विस्तारत असून हा व्यवसाय करणारी मंडळी एकंदरीत सुखी आहेत.
आज गणेश मूर्ती कलेमुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात पेण ची आणि पर्यायाने महाराष्ट्राचीही ओळख निर्माण झाली आहे. पेणचे गणपती हा एक स्वतंत्र ब्रँड झालाय, हे मात्र खरे.

– लेखन : हिरामण भोईर. पेण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
पेणच्या गणेशमूर्ती जगप्रसिद्ध आहेत. या लेखातून छान माहिती मिळाली. फोटोतील मूर्ती केवळ अप्रतिम!