गुन्हा दाखल करण्याऐवजी तो दाखल करणे टाळण्याकडेच बहुतांश पोलिसांचा कल असतो. कारण पोलिसांच्या मूल्यमापनाचा तोच एक मापदंड समजला जातो. पोलिसांची कार्यक्षमता आणि कौशल्ये मोजण्याचे सध्या तरी तेच एक परिमाण आहे. ज्या पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमी, त्या पोलिस ठाण्याचा क्राईम रेट कमी म्हणून तेथील अधिकारी अधिक कार्यक्षम, अधिक हुषार व कर्तव्यदक्ष समजला जातो. त्यासाठी त्यांना रिवॉर्डसही दिले जातात.
परंतु, क्राईम रेट आधारे मूल्यमापणाचे हे मापदंड खरोखर योग्य आहेत का ? त्यामुळे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिद वाक्यापासून पोलिस दूर तर जात नाहीत ना, हे नव्याने तपासण्याची गरज आहे.
सर्वसाधारणपणे चोरी, घरफोडी, दरोडा, वाटमारी अशा गुन्ह्यांचा शोध (डिटेक्शन) हा कठीण तपास समजला जातो. अशा अनडिटेक्टेड गुन्ह्यांचे प्रमाण वाढले की, तेथील अधिकाऱ्यांच्या व संपूर्ण टिमच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. क्राईम मिटिंगमध्येही याच विषयावर अधिक चर्चा होते. परिणामी, असे गुन्हे दाखल करण्याचे टाळण्याची मानसिकता निर्माण होते. अशा मानसिकतेमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या आपल्या मूळ जबाबदारीपासूनच हे खाते आता दूर जात आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या मानसिकतेमुळेच सर्वसामान्य नागरिकाचे न्याय्य हक्कच डावलले जात आहेत, हे तरी पोलिस खात्यातील धुरिणांनी विचारात घेतले पाहिजे.
या संदर्भात उदाहरण द्यायचे झाल्यास पुणे शहरात गेल्या काही काळात पोलिस खात्याशी संबंधित अशा ज्या दोन घटना जवळून मला अनुभवण्याची संधी मिळाली, त्यांचा उल्लेख करता येईल. यातील एक घटना आश्चर्यजनक, सुखद व आश्वासक अशी तर दुसरी पोलिस खात्याची प्रतिमा मलिन करणारी आहे, असे म्हणावे लागेल.
गेल्या आठवड्यात वारजे- माळवाडी परिसरात भाजी खरेदी करताना गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने माझा महागडा मोबाईल चोरून नेला. साहजिकच या प्रकरणी तक्रार नोंदविण्यासाठी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात जाणे क्रमप्राप्त होते. वास्तविक या प्रकरणी लगेचच गुन्हा दाखल होईल, अशी अपेक्षाच नव्हती. पोलिस खात्याशी संबंधित पूर्वानुभवांनुसार येथेही टाळाटाळ व टोलवाटोलवीला सामोरे जावे लागेल, हे गृहित धरूनच पोलिस ठाण्यात पाऊल ठेवले. ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर खटके सरांची भेटही अगदी विनासायास झाली. दैनंदिन कामाच्या गडबडीत असलेल्या खटके सरांनी वेळ काढून घडलेल्या प्रकाराची माहिती शांतपणे ऐकून घेतली. इतकेच करून ते थांबले नाहीत, तर एका सहकाऱ्याला बोलावून या प्रकरणी तत्काळ चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिेले. त्यानुसार त्यांचे सहकारी पोलीस नाईक सागर जगताप यांनी लगेच माझी फिर्यादही नोंदवून घेतली. चोरीचा हा प्रकार न उलगडणाऱ्या वा उलगडण्यास कठीण अशा गुन्हे प्रकारातील असूनही तो दाखल करण्याच्या त्यांच्या या आदेशाने खरोखरच आश्चर्याचा धक्का बसला व त्यांच्या या कृतीने एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची भेट झाल्याचेही समाधान मिळाले. असे अधिकारीच पोलिस खात्याची प्रतिमा उंचावून सर्वसामान्यांचा खरा आधार ठरू शकतात, असेही वाटले.
खटके यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची दखल शहराच्या गुन्हे विभागानेही घेतली. तेथील अधिकारी श्रीमती कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोबाईल चोरीच्या घटनेचा स्वतंत्रपणे तपास सुरु केला.
तीन- चार महिन्यांपूर्वी कोथरुड परिसरात उच्चभ्रूंच्या वस्तीत असलेल्या एका पोलीस ठाण्यात अनुभवास आलेला प्रकार मात्र फारसा चांगला नव्हता. पोलिस सर्वसामान्यांसाठी की गुंडासाठी, असाच प्रश्न त्यामुळे निर्माण झाला. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची नो पार्किंगमधील गाडी उचलून नेण्याचे धाडस दाखविणाऱ्या किरण बेदी आणि मीरा बोरवणकर सारख्या तडफदार व कर्तव्यकठोर अधिकाऱ्यांमुळे पोलिस खात्यातील महिला अधिकाऱ्यांविषयीच्या अपेक्षा उंचावल्या असताना एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या पोलिस ठाण्यातच अशी घटना अनुभवायला यावी, हे केवळ दुर्दैवच म्हणावे लागेल.
मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मोबाईलवर नाल्यात कचरा टाकणाऱ्या एका तरुणाचे चित्रिकरण केले. परिणामी या तरुणाने चिडून त्या ज्येष्ठावरच हल्ला केला. हात फ्रॅक्चर होईपर्यंत त्याला मारहाण केली. इतकेच नव्हे तर मोबाईल हिसकावून तो तोडण्याचा प्रयत्न केला. सकाळी साडेसात वाजता घडलेला हा प्रकार त्या ज्येष्ठाने व त्याच्या शेजाऱ्यांनी पोलिस चौकीत जाऊन नोंदविला. या नागरिकाला न्याय मिळावा यासाठी स्थानिक नगरसेवक, तसेच पालिकेतील सत्तारुढ पक्षाचा शहर पातळीवरील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानेही पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना फोन केले. त्याचवेळी मारहाण करणाऱ्या तरुणाच्या वतीनेही वराह पालन करणाऱ्या काही व्यावसायिकांनी निरीक्षकाशी गाठी भेटी सुरु केल्या, आणि मग सुरु झाले गुन्हा दडपण्यासाठीचे नाट्य.
ससून रुग्णालायमध्ये चार तास घालवून मिळविलेले सर्टिफिकेट, मारहाण झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळावा म्हणून पोलिस ठाण्याच्या परिसरात तासंतास थांबून राहिलेले रहिवासी आणि सत्तारुढ पक्षाच्या शहर पातळीवरील वरिष्ठ पदाधिकाऱ्याने न्यायासाठी केलेली रदबदली हे सारे व्यावसायिकांच्या वजनापुढे फिके पडले. गुन्हा दाखल करणे कसे अयोग्य ठरेल, हेच फिर्यादीवर बिंबवून आपली काही तक्रार नाही, असे पत्र त्याच्याकडून घेण्यात आले. आणि सकाळी सात वाजता सुरु झालेल्या या गुन्ह्याचा प्रवास रात्री 9 वाजता फिर्यादीकडून लिहून घेण्यात आलेल्या कबुली जबाबाने संपला.
पोलिस कार्यक्षमतेच्या रुढ मापदंडामुळे गुन्हे दडपणाऱ्या अधिकाऱ्याला रिवॉर्ड व कदाचित राष्ट्रपतींच्या पदकानेही गौरविले जाईल. तर आपल्या परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांची प्रामाणिकपणे नोंद घेणारे खटके यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी वरिष्ठांच्या रोषाचेच बळी ठरतील. त्यामुळे पोलिस खात्यातील धुरिणांनी खरोखरच आपले मापदंड पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे.
आपल्याला काय वाटते ?

– लेखन : सुनील कडूसकर.
जेष्ठ पत्रकार, पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800