वंदुनिया भारतमातेला राष्ट्रध्वजाला, संविधानाला,
लेवूनी शाहिरी साजाला,
प्रबोधनाचा डफ घुमला,
पोवाडा मतदार दिनाला ।। हा जी जी जी
विश्ववंदनीय लोकशाही, भारताची पाही,
अशी दुजी नाही,
मतदार आत्मा लोकशाहीचा,
मतदार चेहरा भविष्याचा,
मतदार राजा भारताचा ।। हा जी जी जी
एकोणीसशे पन्नास सालाला, जानेवारीला,
पंचवीस तारखेला,
निवडणूक आयोग स्थापन झाला,
लोकशाही राज्य स्थापण्याला,
राष्ट्रीय मतदार दिवस गणला ।। हा जी जी जी
भारत देश युवांचा, दिव्य ऊर्जेचा, नव विचारांचा,
युवांनो तुम्ही देश हाकणार,
विश्वाला नवा मार्ग दावणार,
मतदार तुम्ही कधी होणार ? ।। हा जी जी जी
चाल –
अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर,
लोकशाहीला करण्या कणखर,
मतदार नोंदणी करावी तत्पर,
मतदानाचा हक्क निरंतर,
देश कार्याला मिळेल अवसर,
निवडणूक लढण्यास अग्रेसर,
जाल यशाच्या नवशिखरावर ।।
चाल –
लोकशाही बळकट करण्या आवाहन युवांना ss
राष्ट्र उभारण्यासाठी तुम्ही मतदार व्हाना ।।
मतदानाचा हक्क बजावणे कर्तव्य पहिले ss
एक एक मतदार जोडू सरकार स्थापु आपुले ।।
सुसंस्कृत सुजाण सुशिक्षित प्रतिनिधी निवडू ss
नेतृत्वाची, देशकार्याची संधी नका दवडू ।।
चाल –
शासनाचे तुम्हा आवाहन,
संविधाना आपल्या स्मरून,
तुम्ही द्यावे एक वचन,
मतदार नोंदणी करून,
मतदान केंद्रावर जाऊन,
स्वखुषीने करा मतदान,
लोकशाही बळकट करण्याचा विशेष हा दिन ।। जी जी जी
चाल –
आत्मनिर्भर भारत देश, प्रयत्नांना यश, खुले आकाश,
स्वतःचा स्वतःचा उद्धार करा (उद्धरेदात्मनात्मानम् ..)
युवकांचे स्वप्न येईल आकारा,
एकात्मतेचा देऊ नारा ।। हा जी जी जी
शाहीर मावळेंचे चिंतन, ध्यानी घेऊन, करा वर्तन,
शाहिरीतून विचार घ्यावा,
संगीतासवे कार्य दिवा,
कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळवा,
हक्काने आजच नाव नोंदवा,
भारताच्या लोकशाहीचा ठेवा ।। हा जी जी जी

– रचना : आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे, पुणे.