योगेश्वर श्रीकृष्णाची सखि रुक्मिणी…. रुक्मिणी माता विदर्भ कन्या… तिला श्रीकृष्णानं ज्या गावातून पळवलं ते गाव कौंडिण्यपूर…. ज्या भूयारी मार्गातून रुक्मिणीसह श्रीकृष्णानं पलायन केले, ते भुयार, ती जागा आणि तो सगऴा इतिहास अनुभवणं रोमांचकारी आहे… हे रोमांचं अनुभवणं मोठाच आनंदाचा ठेवा आहे….
विदर्भात नागपूर पासून 85 किलोमीटर अंतरावर अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर अमरावती जिल्ह्यात तिवसा नावाचा तालुका आहे. या तालुक्यात कौंडीण्यपूर हे एक गाव. या गावाची ओळख खूप मोठी आहे. हे गाव म्हणजे श्रीकृष्णपत्नी रुख्मिणी मातेचं माहेर.
रुख्मिणी हरणासह रुख्मिणी स्वयंवरावर आपण अनेक कथा ऐकतो…. अनेक कीर्तनकार रुक्मिणी स्वयंवरावर आख्यान लावतात… आपल्या कीर्तनातून यावर प्रबोधन करतात…. हा स्वयंवर प्रसंग कीर्तनकार अतिशय रंगवून सांगत असतात….
विदर्भ हा अत्यंत प्राचीन… या भागातच दंडकारण्य होते. याच दंडकारण्याची ही कुंडिनपूर नावाची राजधानी, तेच हे आताचे कौंडीण्यपूर….कौंडीण्य ऋषिंनी वसवलेले… याठिकाणी एक नदी वाहते तिचे खरे नाव वरदायिनी… कालांतराने ती वर्धा नदी संबोधली जाऊ लागली….
श्रीकृष्णाची सासुरवाडी, म्हणुन कौंडिण्यपुरला ओळखले जाते. या गावात पुरातत्व खात्याने अनेक ठिकाणी उत्खनन केले… अनेक पुरातन वस्तू सापडल्या…. परिसरात सर्वत्र पांढऱ्या टेकड्या दिसतात…. कधीकाळी या टेकड्यांना लोक भस्माच्या टेकड्या असं म्हणत…. या पांढऱ्या टेकड्यांमुळे या परिसरात 1962 ते 1964 या काळात जागतिक दर्जाचे विस्तृत उत्खनन पुरातत्व विभागाकडून केले गेले. त्यातूनच जगात कौंडीण्यपूरचे स्थान अद्वितीय ठरले…
आपण या गावात येताच आजही हे गाव तितकेसे सुधारलेले दिसत नाही. रस्त्याच्या कडेला कच्च्या चिवडा विकणारी, खेळण्यांची, चहाची दुकानं दुतर्फा दिसतात…. नदी किनारी हा परिसर वसलेला आहे. अतिशय छोट्या रस्त्याने सरळ गेल्यावर एका टेकडीवर देवालय दिसू लागते…. या कौंडिण्यपूरच्या राजधानीत भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी देवीचे हरण केले…. तेही तिच्या कुलस्वामिनी अंबादेवीच्या मंदिराच्या भुयारातून….. हे भुयार आजही पाहायला मिळते..
रुक्मिणी स्वयंवराकरिता कौंडिण्यपूरला अनेक देशांमधून राजे उपस्थित होते. त्यात शिशुपाल, जरासंघ, भगदत्त, शाल्य अशा अनेक राजांचा समावेश होता. तर एक गवळी म्हणून साधेपणाने श्रीकृष्ण आले होते. राजा भीष्मकाला मात्र रुक्मिणीचे लग्न शिशुपालासोबत व्हावे, असे वाटत होते. त्यामुळे शिशुपालाचे स्वागत खूप आदराने झाले होते. लग्नापूर्वी रुक्मिणीला देवदर्शन करायची इच्छा झाली. तिचे कुलदैवत असणाऱ्या अंबा देवीच्या दर्शनाला जाण्याची तिला परवानगी देण्यात आली.
याचवेळी वातावरण तापले… लग्नप्रसंगी समरप्रसंग होणार की काय, अशी चिन्ह दिसू लागली… देवीच्या देवळात ही रुक्मिणी बरोबर तिचा भाऊ आणि सैन्य येऊ लागले, तसे तिच्या सख्या आडव्या आल्या आणि सासरी जाताना आम्हाला तिची ओटी भरायची आहे, इथे पुरुषांचे काही काम नाही असे सांगून त्यांनी रुख्मिणी भोवती गर्दी केली… मंदिराच्या एका खिडकीतून श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळवून नेले….
हे भुयार जिथे संपते ( ही जागा अमरावतीच्या अंबा मंदिरात आहे….आणि भुयार सुरु होते ती जागा कौंडिण्यपुरातील शिवमंदिरात आहे….हे शिवमंदिर अजुनही आहे… येथे आता विट्ठल रखुमाईचे मंदिर बांधण्यात आले आहे.)… अमरावतीतील अंबा मंदिरात श्रीकृष्णाने आपले रथ तयार ठेवले होतेच…. रुक्मिणीचे हरण झाल्याचे वृत्त समजताच सर्व जमलेल्या राजांनी श्रीकृष्णाचा पाठलाग केला…. घनघोर युद्ध झाले, पण श्रीकृष्णाच्या पाठीमागे उभ्या असणाऱ्या बलरामाच्या सैन्याने सर्व राजांना पळवून लावले…
या परिसरात अनेक मंदिरे आजही पाहायला मिळतात. कौंडिण्यपूर हे ठिकाण विदर्भनंदन राज्याची राजधानी होती… रामाची आजी अज राजाची पत्नी इंदुमती (दशरथ राजाची आई), अगस्तीची पत्नी लोपामुद्रा,भगीरथ माता सुकेशिनी या सर्वांचे माहेरही कौंडिण्यपूरच होते. नल दमयंती चा विवाह येथेच झालेला उल्लेख आहे. आजही येथून रुक्मिणीमातेची पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते. 900 किलोमीटरचा प्रवास करून ही पालखी नेली जाते. भक्तिमय वातावरणात टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी नेली जाते… महाराष्ट्र सरकारकडून या पालखीला पोलीस संरक्षण दिले जाते… तर पालखीत असणाऱ्या लोकांसाठी रुग्णवाहिका ही दिलेली असते…. पालखी मार्गावर ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले जाते….. 1594 साली या वारीची सुरुवात संत सदाराम महाराजांनी केली होती…. या ठिकाणी असणाऱ्या अंबा मातेच्या मंदिरातील अंबा मातेची मूर्ती अतिशय मोहक असून तिच्याकडे बघत राहावेसे वाटते…. तिथेच एक खिडकी ही पाहायला मिळते…. रुख्मिणी हरण खिडकी असे तिला नाव दिले आहे…..
कौंडिण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पहिले अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते… त्यांनी त्यावेळी 3750 रुपये वर्गणी गोळा करून उभी केलेली धर्मशाळा आजही पाहायला मिळते….. जागतिक पटलावर नाव असलेल्या कौंडिण्यपूरचा मात्र व्हायला हवा तसा विकास करण्यात आलेला नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. तरीपण भाविक आजही या ठिकाणी गर्दी करतात आणि दर्शन घेतात. आपण ही कधी या परिसराला भेट द्यायला मिळाली तर नक्की द्या..
— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800