“स्वराज्य, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच !” ब्रिटिशांच्या समोर घोषवाक्य देणारे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, म्हणजे स्वतंत्र भारताचे जनक होय. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या प्राणांची आहुती देणारे आदर्शवादी समाज सुधारक, राष्ट्रीय क्रांतीवीर नेते, यांची या दिवशी आठवण करावयाचा हा दिवस होय.
ब्रिटिशांनी आपल्या देशावर जवळजवळ दीडशे वर्षे राज्य केले. ब्रिटिश राजवटीचा शेवट व भारताच्या स्वतंत्र दिवसाची सुरुवात म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस होय. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याची घोषणा दिली होती.
दरवर्षी या दिवशी भारताचा तिरंगा, देशप्रेमी भावनेने शहरात व खेडोपाड्यात फडकवला जातो. देशभरातील बाजार तिरंग्याच्या विविध कलांनी भरलेला दिसतो. ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशाचा तिरंगा फडकला की, राष्ट्रगीताने प्रत्येक लहान-थोरांच्या तनात स्फूर्ती येते. देशाच्या अभिमानाने मान उंचावते. क्रांतिवीरांवरील भाषणे ऐकून, स्वातंत्र्याची महती नसानसात भिनू लागते. आपोआपच सर्वांच्या मुखातून “भारत माता की जय !” “वंदे, मातरम !” राष्ट्रगीत घोषणा गर्जना करू लागतात.
तिरंग्याचा वरचा पट्टा केशरी रंगाने, सुखाचे प्रतीक दर्शवतो. मधला पट्टा पांढऱ्या रंगाचा, शांतीचे प्रतीक असते. तर खालचा पट्टा हिरव्या रंगाचा, कृषिप्रधान म्हणजेच समृद्धीचे प्रतीक असते. मध्ये २४ धारांचे निळ्या रंगाचे, अशोक चक्र जीवन गतीचे प्रतिक आहे. तिरंग्याच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर ३:२ असते.
तिरंग्याचे अनेक नियम कटाक्षाने पाळले जातात. तिरंगा जमिनीवर पडू देऊ नये. तिरंगा आपल्या देशाचा मान आहे.
१५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन व आज आपल्या स्वातंत्र्यदिनाचे ७५ वे वर्ष आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीत जगणारा, प्रत्येक भारतीय नागरिक आज स्वतंत्रपणे भारत देशाच्या लोकशाहीत सुखात जगत आहे. स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. त्याकाळी शिक्षणाला वंचित राहिलेला, माझा भारतीय नागरीक आज तंत्र शिक्षित झाला आहे. पोटभर अन्नासाठी ब्रिटिशांची चाकरी करणारा माझा भारतीय बंधू स्वतःचा व्यवसाय स्वेच्छेने चालवत आहे. पारतंत्र्यातले जीवन संपवून आज, स्वातंत्र्याच्या तिरंग्यासोबत मोकळेपणाने वावरत आहे. विविध जाती-धर्मांना एकत्रित घेऊन, स्वतंत्र राष्ट्रात नांदत आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त, गरीब बालक सुद्धा अभिमानाने राष्ट्रगीत गुणगुणून, ध्वजाला वंदन करतो. जणू या दिवशी आपले रक्त, नसानसांत सळसळून वाहू लागलेले असते.
खेड्यापाड्यातला शेतकरी, ब्रिटिशांना कर देवून ! स्व:ताच्या हक्काच्या जमिनीत राबणारा, आज तोच शेतकरी स्व: कष्टाने राबून, शेती करत आहे. म्हणूनच तर भारताला शेती प्रधान देश मानला जातो.
कोकणाला लाभलेले स्वर्गरुपी निसर्ग, भारतात आहे. पर्यटन स्थळे, देवस्थळे, शिवकालीन किल्ले, अफाट समुद्र, हिमालयासारखे उंच उंच डोंगर, उगम पावलेल्या नद्या हे सारे वैभव म्हणजेच, आपल्या भारताची संपत्ती आहे. स्वातंत्र्य मिळाल्याने ही सर्व सृष्टी, आपल्यासाठी ठरलेले एक वरदान आहे.
पूर्वी आल्याड-पल्याड गावे गाठण्यासाठी, होड्यांचा वापर करावा लागत असे. त्या ऐवजी आज नद्यांच्या पात्रांमध्ये मोठमोठाले पूल बांधले गेले आहेत. शिक्षणासाठी, मुलांना पायपीट करून तालुक्यांच्या ठिकाणी जावे लागत असे. पण आज प्रत्येक गावाने शाळा व एसटींची मुबलक योजना, स्वतंत्र देशात उपलब्ध झाल्या आहेत. विविधतेने नटलेला माझा देश स्वातंत्र्योत्तर १५ ऑगस्ट, या दिवशी राष्ट्रीय सणाच्या जल्लोषाने भारावलेला असतो.
आमच्या परिसरात, अंगणवाडीच्या छोट्या छोट्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहताना मन अचंबित होते. अगदी तीन-चार वर्षांच्या मुलांमध्ये निर्माण झालेला तो स्वातंत्र्याचा जोश पाहून, राष्ट्राच्या स्वातंत्र्यवीरांची आठवण करून देतो. उत्स्फूर्तपणे सजलेला तो परिसर, स्वच्छ पांढऱ्या परिवेशात, खरोखरच, शांतीचे प्रसन्न वातावरण तयार करून जातो.
माझ्या वडीलांकडून ऐकलेले काही किस्से, वडीलांचा जन्म १९१८ मध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला होता. लहानाचे मोठे होत असताना त्यांनी अनुभवलेले, पारतंत्र्यातील पडसाद आम्हाला ते ऐकवत असत. अठरा वर्षाचे होताच ते, तारु (मोठे जहाज) वर खलाशी म्हणून कामाला लागले होते. स्वातंत्र्या पूर्वी ही जहाजे अनेक वस्तूची, धातूंची आयात-निर्यात करत असत. जेव्हा ते वर्षाने गावी येत, तेव्हा चाकण (खाण्याचा गोड कडक व गोल आकाराचा) पदार्थ घेवून येत असत. हे जहाज कराची व दमण पर्यंतचा प्रवास करत असे.
जेव्हा आपल्या क्रांतिवीरांनी दमण वर हल्ला बोल केला तेव्हा, जहाजावरील सहकाऱ्यांसोबत माझ्या बाबांनी मुंबई गाठली होती. ते सांगत, त्या प्रवासात काही गरोदर स्त्रियांची जहाजावर प्रसूती झाली होती. त्या काळातील मोडी लिपीतील अध्ययन बाबांना अवगत होते. ब्रिटिश कालीन विक्टोरीया टर्मिनस, भव्य दिव्य इमारत, गोऱ्या साहेबांच्या देखरेखीखाली पाहिली होती. ह्याच रेल्वे स्थानकातून बॉम्बे ते कोल्हापूर प्रवास घाबरत करावा लागत असे. व्ही. टी. कडून म्हातारपापडी पर्यंतचा प्रवास टांग्यातून (घोडागाडी) करावा लागत असे. पोलिस भरती म्हणा, अग्निशमन दलात भरती असो किंवा बी पी टी तील भरती असो, ब्रिटिश लोक येथील पुरुषांना गोणीत भरून नोकरीवर डांबत असत.
सन १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्याची घोषणा ऐकताच बीपीटी सारख्या अनेक कार्यालयातून भोंग्याचे ध्वनी पसरून पूर्ण भारत देश दुमदुमला होता.
माझे वडील म्हणत, देशाच्या स्वातंत्र्यामुळे म्हणजे चळवळीतील क्रांतिवीरांमुळे भारताच्या तरुणाला, व प्रत्येक नागरिकाला मिळालेला हा, मन मोकळा श्वास आहे. स्वातंत्र्यामुळे मुंबईत झालेले, प्रात्यक्षिक चित्र, रोषणाई संगे उजळून निघाले होते.
माझ्या भारत देशातील सुपुत्रांना, सफल आयुष्यासाठी मिळालेला स्वातंत्र्याचा मौल्यवान ठेवा आहे.
आपण सारे, तिरंगी ध्वजास वंदन करून, राष्ट्रगीताचा घोष करू,
वंदे मातरम !
वंदे मातरम !
वंदे मातरम !
भारत माता की जय !

– लेखन : सौ.वर्षा महेंद्र भाबल
– संपादन : अलका भुजबळ 9869484800