आई, तुझे रूप पाहता लोचनी
हे मन आनंदोर्मिनी येई भरुनि
पवित्र, मंगलतेज पसरे जीवनी
आम्ही पामरे, तू प्रेमळ जननी।
तू माता, प्रसन्न चित्त तेजस्विनी
आदिमाया तू, संरक्षक गे जननी
तव रुपात दिसे दुर्गा माता भवानी
अपुल्या लेकरांची काळजी घेऊनि
साक्षात्कार हा तुझा या जीवनी
जाणवे कठोर भयावह त्या क्षणी
संकटांना तू लाविसी क्षणेपळवुनि
सदैव राहीशी पाठीशी संरक्षणी।
अष्टभुजात अष्टायुधे तेजप्रखरिणी
सात्विक, मांगल्यभाव मुखदर्शनी
भक्तांवरी वात्सल्य स्रोत वाहिनी
तवनामाचा जप, करे धैर्यधारिणी।
सुवर्ण कांती रूप तुझे वसे नयनी
स्वर्णरत्नांकित मुकुट शिरोधारिणी
कंठकटिपर्यंत स्वर्णहिरे आभुषणी
कर्णभुषणे, वाकी, कंकणे, पैंजणी
कमरमेखला तेज पुंज, हिरकणी
स्वर्णवेलींनी सजे केशकलापिनी
भाळी कुंकुमतिलक,चंद्र चांदणी
नासिकाग्रे मौक्तिकस्वर्ण नथनी।
सात्विक तेज विलसतसे वदनी
बैसशी व्याघ्रावरी, शौर्यवीरांगनी मायाममतेची तूसोज्वळ प्रवाहिनी
संकटकाळी कडाडशी सौदामिनी।

– रचना : स्वप्नगंधा सतीश आंबेतकर