आज विलास आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये फारच आनंदाचा क्षण जुळून आला होता. पेशाने डॉक्टर असलेल्या मुलाचे स्थळ, सीए झालेली मुलगी अदिती यांना, दोघांच्याही कुटुंबीयांकडून संमती मिळाली होती.
विलास आणि त्याचे कुटुंबीय सर्वसामान्य परिवारातले तर मुलगा रोहन हा जळगावातलं एक व्यवसायिक प्रस्थ असलेल्या कुटुंबातील एक. विलास मुंबईवासीय जरी असला तरी मूळचा कोकणचा आणि जुळुन आलेलं स्थळ खानदेशातलं. दोन्ही परिवारातील स्थानीय दरी व मुलाकडील व्यावसायिक प्रतिष्ठा हा योग कसा जुळून येणार ह्याची चिंता विलासला सतावत होती. परंतु रोहन च्या आईवडिलांनी अगदी सहजतेने संमती दिल्यामुळे विलासच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले.
लहानपणापासूनच गाड्यांचा वेडा असलेल्या विलासने कॉलेजमध्ये जाण्याच्या भानगडीत न पडता व घरच्यांचा विरोध डावलून आयटीआय मध्ये मोटर मेकॅनिक चा कोर्स निवडला व आपल्या आवडीचा व्यवसायाच्या वाटचालीला सुरुवात केली.
कुर्ला डेअरीतील नोकरी व पुढे तूटपुंजा पगारात कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना त्याची खरेतर तारेवरची कसरत होत होती. परंतु विलास मुळातच हरहुन्नरी, शाळेत प्रत्येक कार्यक्रमात पुढे असलेल्या विलासला अनेक कला अवगत होत्या. त्याचा पुरेपूर उपयोग त्याला त्याच्या जीवनातील वाटचाल करताना फायदेशीर ठरत होत्या. विशेष म्हणजे, कोणीही व्यक्ती त्याच्या संपर्कात आली तर त्याची मैत्री झालीच समजा, असा हा अवलिया.
नोकरी सांभाळत असताना प्रायव्हेट गाड्यांची कामं, गाण्यांचे कार्यक्रम, घराचं इंटेरियर इत्यादी अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळवून आपल्या आर्थिक समस्यांचं ताळमेळ जुळवून आणत आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केलं.
कुर्ला डेरी बंद पडल्यानंतर काही काळ मंत्रालय नंतर आरटीओ असा प्रवास सुरु झाला. परंतु या आमच्या हरहुन्नरी मित्राला तेथील वातावरण मानवले नाही आणि त्याने स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
वराकडील मंडळींना थाटामाटात लग्न पार पाडायचे होते. परंतु करोना मुळे ते जमत नव्हते. लग्नसराई आणि खर्च यांचा मेळ जुळवणे हा महत्वाचा भाग परंतु ह्या कालावधीत, व्यवस्थित आखणी करत आमच्या मित्राने आर्थिक समीकरण जुळवून आणले. निवृत्तीच्या आलेल्या पैशातून तसेच जवळ असलेल्या पुंजीतुन त्याने हळूहळू लग्नासाठी लागणारे सोने-नाणे व इतर खरेदी सुरू केली. परंतु इथे भरभरून प्रेम केलेल्या मित्रांनी त्याच्या आर्थिक विवंचनेला साथ दिली.
भरपूर मित्रपरिवार असलेल्या विलासला त्याच्या जिवलग मित्र मैत्रिणींनी लग्नाच्या बऱ्याच आधी ठरवून काही गोष्टींचा भार उचलला. त्याच्या दोन मैत्रिणींनी तर चक्क त्याच्या खात्यात तब्बल तीन लाख रुपये जमा केले. ह्या पैशातून दागिन्यांची खरेदी झाली परंतु ह्या स्वावलंबी मित्राने हप्त्या हप्त्याने ते पैसे लग्नापूर्वीच फेडून टाकले.
मैत्री कशी असावी ह्याचं सार्थ उदाहरण म्हणजे विलास. नाही नाही म्हणत असताना देखील प्रत्येकाने स्वतःहून वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक भार उचलला. कारण एकच त्याने प्रत्येकाशी जिवाभावाची मैत्री केली. आयुष्यात कुणाचेही काम किंवा मदत करताना मोबदला म्हणून पाहिले नाही. म्हणूनच त्याच्या परतफेडीची आलेली संधी कोणीही सोडण्यास तयार नव्हते.
खरेदीच्या नावाने ह्या जिवलग मित्रासाठी लाख, पन्नास हजार, पंचवीस ते दहा हजार अशा अनेक भेटवस्तूंचा नजराणा त्याला त्याच्या मित्रांकडून मिळाला आणि संपूर्ण लग्न सोहळा दिमाखदार पद्धतीत पार पडला.
ह्या भेटवस्तू खरेतर विलासने आपल्या आयुष्यात, मित्रांसाठी केलेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदतीचे मोलच होते. खरंच सर्व नात्यांपैकी मैत्री हे नातं किती महान आहे याची प्रचिती ह्या मंगलप्रसंगी उमगली.

– लेखन : सुधीर थोरवे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
अप्रतिम
वाह सुधीर