उद्या, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन आहे.या निमित्ताने वाचू या काही कविता.
आपला प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
१. उज्ज्वल देशा
आसेतु हिमालय उभा पाठिशी
खळाळणाऱ्या वाहती सरिता
वनराजी अन् खनिज संपन्नता
भारताचे नंदनवन की हो ……….
जवान सज्ज सीमेवर
हाती शस्त्र अस्त्र घेऊनी
तळहाती शीर देश रक्षिण्या
जागता पहारा रात्रंदिनी ……….
उज्ज्वल देशा महान देशा
साजरा करी प्रजासत्ताक दिन
मुक्त जगण्या अर्पिले संविधान
उजळल्या दिशा दिव्यत्वाने……….
अध्यात्माची थोर परंपरा
संत महात्म्यांचे ज्ञानामृत
प्रगती पथावर राहण्या जागवू संवेदना
हीच करु या प्रार्थना…………
एक दिलाने राहू, एक होऊ
चेतवू या देशभक्ती
अर्पुनी देशास तनमन
एकतेचे घडवू दर्शन ……….
— रचना : डॉ.प्रभा वाडकर. लातूर.
२. योजनांचा पसारा
प्रजासत्ताक दिवसाचा
चला करू साजरा सोहळा
दाखवू पाहतील नेते
आवळा देत हा कोहळा
किती पाने पलटली पण
सरे ना रड विकासाची
लुटारू शुभ्र सफेदी
बघा ठेवे कुठे डोळा
पसारा योजनाचा तो
किती पाण्यात रुतलेला
आरोपा कोण मर्यादा
कसा तो सोडला मोळा
गुन्हेगारास संरक्षण
शोषण आम जनतेचे
बिकावू यंत्रणा याचा
कसा घेणार धांडोळा
किती दिवस विकावे मी
असे फुकटात आयुष्या
गोड यातनांतला चाले
रोज जिवन मरण सोहळा
कुठे नाकारतो देवा
तुझे अस्तित्व देहातीत
वदे संभाजी ॐ कारा
उघड तिसरा तुझा डोळा
— रचना : संभाजी रणसिंग.
३. प्रजासत्ताक ..
अमृतमहोत्सव वर्षा
इतिहास वाचा जरा
समजून घ्या महत्व
मगचं दिवस साजरा
भारत छोडो घोषणा
उतरे इंग्रजी नखरा
आंदोलन असे काय
कळणारं अर्थ खरा
कानठळ्या घोषणेने
जाग आली सरकारा
किंमत शहीद रक्ता
उपकार त्यांचे स्मरा
देऊन स्वातंत्र्य परत
पळला माघारा गोरा
पेटे आंदोलन ज्योत
पलटून टाकला तोरा
साम्राज्य वर्षं दिडशे
आवरेसगळा पसारा
तुटले साखळ दंड ते
मयूर फुलवी पिसारा
स्वातंत्र्यदेवता प्रसन्न
सक्षम सुद्रुढ तो वारा
“चले जाव” चा नारा
अगदी अद्भूत न्यारा
प्रजासत्ताक देश हा
जाणा संविधान जरा
मनातून सार्व भौमत्व
राष्ट्रीय सण रे साजरा
–– रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800