साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार मिळालेले प्रणव सखदेव यांची आपले दिल्ली प्रतिनिधी कमल अशोक यांनी घेतलेली विशेष मुलाखत…..
प्रथम, आपले अभिनंदन. मानाचा असा साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार आपल्या “काळे करडे स्ट्रोक” या कादंबरीसाठी आपणास मिळाला आहे. कथा, कादंबरीकार, कवी आणि सोबत अनुवादक म्हणुनही आपली ओळख आहे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की, मराठी भाषेचा विद्यार्थी ते यशस्वी लेखक असा आपला प्रवास कसा झाला ?
मी लहानपणी कविता करत असे. यमक जुळवून त ला त जोडलेली ही कविता असे. त्यानंतर मी दहावीत असताना शिकवणी वर्ग होता, तिथे पंढरीनाथ सर होते. त्यांनी माझ्यात वाचनाची आवड निर्माण केली. माझ्या घरी पुस्तक, साहित्य अस फार काही वातावरण नव्हते. मला लहानपणी क्रिकेट खेळण्याची आवड होती. एक ठळक घटना म्हणजे दहावीत असताना आम्ही मुलं मुलं मिळून एक दिवाळी अंक काढला. त्यात मी लिहिले होते.
कल्याण मध्ये असणार्या सार्वजनिक वाचनालयात राजीव जोशी यांनी वेगवेगळी पुस्तकं वाचायला दिली. त्यात पाडगावकर, मर्ढेकर यांची कविता भेटली. पुढे वसंत बापट यांच्या कविता वाचनात आल्या. तेव्हा समजले की आपण जे लिहितोय ते फारच बाळबोध लिहीत आहोत.
शाळेनंतर महाविद्यालयीन जीवनाचा विस्तार झाला. वेगळे जीवन सुरू झाले. रुईया महाविद्यालयात माझे इंग्रजी वाचन सुरू झाले.
फिल्म सोसायटी, मराठी वाङ्मय मंडळाचे कार्यक्रम यातुन मी घडत गेलो.
आपल्याला जे वाटत होते त्यापेक्षा आणखीन मोठे जग आहे आणि वाचून त्याचा शोध घेतला पाहिजे हे समजले.
त्याच काळात नामदेव ढसाळ यांच्या कविता, विलास सारंग, अरुण कोल्हटकर यांचे लिखाण वाचनात आले.
लेखन ही गांभीर्याने करायची गोष्ट आहे, ती हौस म्हणून करायची नाही ही जाणीव झाली.
माझे कथा लेखन 2013 साली सुरु झाले. त्याआधी मी छोटे मोठे तुकडे लिहायला लागलो होतो. तेव्हाच अनुवाद करायला लागलो होतो. त्यामुळे एका जागी बसुन लिहायला लागलो. त्याचा फायदा झाला मला झाला. दीर्घ लिहिण्यासाठी वेळ खूप लागतो. कवितेला लागतो त्यापेक्षा खूप वेळ त्यात लागतो. ती मिळविण्यासाठी अनुवाद मला मदत करणारा ठरला. मला आवडते म्हणुन आणि सराव व्हावा यासाठी, बसुन लिहायची सवय व्हावी म्हणून त्यातून माझी बैठक पक्की झाली. त्यामुळेच मी माझे स्वतःचे लिखाण करायला लागलो.
दैनिकात उपसंपादक, पुढे पुस्तक संपादक, एक कविता संग्रह याचा आपल्यावर, आपल्या लिखाणावर काय परिणाम झाला ?
मी पत्रकारितेचे रितसर शिक्षण घेतले होते. त्यानंतर मला लोकसत्ता वर्तमानपत्रात कामाची संधी आली. काम काय तर कॉपी लिहिणे. ती बातमी सरळ कॉम्प्युटर वर लिहिणे हे मला माहित नव्हते.
उपसंपादक आणि बातमीदार म्हणुन मी एक कनिष्ट मध्यमवर्ग जवळून पाहिला होता. पण बातमीदारी करताना माझी जाणीव मोठी झाली. हे जग मोठे आहे. हे विश्व पाहिले पाहिजे. हा विचार मी केला. तो याच काळात.
महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात सामान्य साध्या
तळागाळातील लोकांचे प्रश्न काय आहेत ? त्याबरोबरच पेज थ्री वर्गाचे प्रश्न काय आहेत ?
त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न मी केला.
खूप वेगवेगळ्या लोकांच्या भेटी झाल्या.
पेज थ्री लोकांचे इंटरव्यू घेण्याची संधी मला मिळाली.
नेमकेपणाचं तंत्र मला त्याच काळात समजले. कारण प्रत्येक कथानकात कथा अचूक पकडून ठेवणे आवश्यक असते .
मर्यादित प्लॉटमध्ये खूप सार्या गोष्टी आपण सांगू शकतो, हे या काळात समजले.
प्रसंगानुरूप मर्यादित जागेत वाचकाला कमी शब्दात ओढून घ्यायचे असते, ती सर्व समज येत गेली.
एक लेखक म्हणुन अनुवादक, पुस्तक संपादक या दोन्ही कामांचा मला उपयोग झाला. एक म्हणजे लेखनासाठी बैठक पक्की होणे आणि दुसरे म्हणजे
इतके अनुभव ज्यासाठी एक आयुष्य पुरणार नाही इतके अनुभव संपादनात गेले.
मर्यादित आयुष्यात वेगळे अनुभव या कामातून आले.
लेखनप्रकार, लेखन तंत्र याची कल्पना आली. एक लेखक म्हणून तुम्ही घेतलेला अनुभव, वाचन, कुठलेही काम वाया जात नाही तो कळत नकळत खूप काही देवून जातो हे समजले.
एक लेखक म्हणुन आपली शैली कशी विकसित झाली ? आपल्या शैलीचा शोध तुम्हाला कसा लागला ?
माझा दृष्टीकोन घडण्यासाठी माझ्या शिक्षणाचा मोठा वाटा आहे. माझ्या महाविद्यालयीन जीवनात मला प्रथम जग किती मोठे आहे याची जाणीव झाली. माझ्या प्राध्यापक लीना केदारे, मीना गोखले यांनी कधीही स्पून फीडिंग केले नाही. विचार करण्याची वृत्ती माझ्यात वाढीस लागली. त्यांच्या शिक्षणाने, अनुभवांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.
इंग्लिश वाचन, मराठी वाचन हे विलक्षण आहे. जे लोकांना दिसत नाही ते लेखक मांडतो. एखादा लेखक किती वेगवेगळ्या प्रकारे जगाकडे बघतो जे आपल्याला दिसत नाही ते त्या लेखकाला दिसते आणि तो ते शब्दात मांडतो.
कुठल्या प्रकारे व्यक्त झाले पाहिजे याचा मी शोध घेतो. यातून इंग्रजी शब्दांचा वाढलेला वापर, 2000 नंतरची पिढी, जी दिसते, त्यांचे प्रश्न मी मांडले. त्यातूनच माझी शैली शोधली.
आपले मराठी, इंग्रजी मधील आवडते लेखक कोणते ?
आवडते लेखक बरेच आहेत. जयंत पवार, सतीश तांबे,
नेमाडे, चित्रे, कोल्हटकर, कृष्णात खोत, किरण गुरव यांच्या कथा मला आवडतात.
रंगनाथ पठारे, राजन गवस यांच्या समीक्षा मला आवडतात.
सैबेरीयन लेखक, स्पॅनिश लेखक ही मी वाचतो.
इटालो कॅल्विनो, रॉबेर्तो बोलान्यो, डेव्हिड अलबहारी, जुलिया कोर्ताझर, गार्बियल गार्सिया मारखेज, मारिया योत्सा, ज्युझे सारमागो यांचे लिखाण आवडते. यातील अनेक भाषांतरीत लेखक मी इंग्रजीत वाचतो. वाचक म्हणुन मला एक ध्यानात आले. इंग्लिश भाषा मोठी का झाली तर ती लवचिक आहे. सगळे ज्ञान आपल्या भाषेत आणले. त्यामुळे भाषा मोठी झाली.
आजच्या काळाचा हा वेगवान बदल आपल्या लेखनात कसा काय उतरतो ? आपला काय अनुभव ?
आपण जे काही बघत आहोत, जे काही अनुभव आहेत, आपण जे बदल अनुभवत आहोत ते मांडायचा प्रयत्न मी केला. ते माझ्या कथेत आले पाहिजे असे
वाटले. जगलो ते मी लिहिले. तसेच अनुभवांना कल्पकतेची जोड देऊन मी लिहीत राहिलो. आजकाल जाणवणारी एक गोष्ट म्हणजे अनुभव ही गोष्टच जवळपास संपुष्टात आलेली आहे.
बाजारपेठ तुम्हाला कुठलातरी अनुभव घ्यायला लावते. तुम्ही तो घेता का ? हा आता प्रश्न निर्माण झाला आहे.
बाजारपेठ तुम्हाला चॉकलेटी रंग दाखवते. जेव्हा तुम्हाला चॉकलेट आइस्क्रीम खायचे असते जेणेकरून तुम्ही ते खावं. समग्र अनुभव हा कमी होत आहे.
तुम्हाला खरच अस वाटते का की तुम्हाला सांगितले आहे आता चॉकलेट आईस्क्रीम खा, अनुभवात तुम्ही काहीतरी ऍड करता. काहीतरी वजा करता. अनुभवाच्या पलीकडे जाऊन समग्र दर्शन तुम्ही घेवू शकत नाही. हेच धागेदोरे, गुंते याचा शोध मी लेखनात घेत गेलो. काहीतरी वेगळे हाताला लागु शकते, हे समजले.
कविता, कथा, कादंबरी या फॉर्म चा ‘स्व’ कसा गवसला ?
स्वतःला एखाद्या गोष्टीचे आकलन होण्यासाठी जे करणे गरजेचे आहे, ज्याला आपण अनुभवजन्य ज्ञान म्हणतो ते आपल्याला शोधता आले तर आपण आपला स्व शोधू शकतो. ‘स्व’ शोधू का नाही माहित नाही पण आपल्याला काहीही हाती लागु शकत नाही ही सध्याच्या काळात अवघड गोष्ट झालेली आहे. अनेक बाबतीत नेमके काय आहे आणि कसं आहे ? नेमकी खरी परिस्थिती कशी आहे ? सत्य काय आहे आणि खोटे काय आहे ? हे सुद्धा आता कळेनासं झालेले आहे इतकी सरमिसळ एकमेकात झालेली आहे. त्यामुळे असं वाटते जर आपण असे काही करू शकलो, स्वतःच्या आकलनावरती जास्तीतजास्त भर, नुसता अनुभव नाही, अनुभव पलीकडे आणखी मोठे काही बघायला लागलो तर या शोधातून आपले आपल्याला स्वतःचे सापडू शकते असं करायच माझा प्रयत्न असतो. यात मी यशस्वी झालोय अस मी कधीच म्हणणार नाही पण किमान माझा तसा प्रयत्न तरी असतो. लिखाणातून असेल. एरवी जगण्यात पण अशा प्रकारचा शोध घेवून, आपल्यापुरते जग मर्यादित न राहता पुढचा विचारही करू या.
जयंत पवार, आसाराम लोमटे, मेघना पेठे या समकालीन लेखकांपेक्षा तुमचे वेगळेपण येण्यासाठी तुम्ही काय करता ?
मी तुम्हाला सांगितले, त्याप्रमाणे मला जे काही दिसले, मी जे काही अनुभवले, जसं की आभासी जग हा त्यातला भाग होता ते मी जास्तीतजास्त प्रतिबिंबीत करण्याचा प्रयत्न केला. माझ्या अनुभवाच्या पलीकडे जाण्याचा, बघायचा कायम प्रयत्न केला. पण यामुळे मी यांच्या पेक्षा वेगळा पडलो. का मला माहीत नाही. हा अभ्यासाचा, समीक्षक यांचा प्रश्न आहे. पण माझे प्रत्येक लेखन यात काही गोष्टी सापडतात. प्रत्येक लेखक अशा काही गोष्टी करत असतो त्याला त्याच असे काही सापडते. त्यामुळे त्यांचे लिखाण हे वेगळे ठरते. मी या वेगळेपणाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो.
जयंत पवार असतील किंवा सानिया हे जे जेष्ठ लेखक आहेत त्यांनी हा प्रयत्न नक्कीच केला असणार. त्यामुळेच ते त्यांचा वेगळा ठसा उमटवू शकले.
मराठी प्रकाशक, प्रकाशन संस्था, वाचन विश्व सद्यस्थिती याबाबतची आपले मते काय आहेत ?
सध्या कोरोनामुळे फक्त वाचनविश्व नाहीतर प्रत्येक व्यवसायावर परिणाम झाला आहे. सगळेच उद्योगधंदे यातून जात आहेत. अनिश्चितता आहे. तो परिणाम पुस्तक विश्वावर पण होत आहे. तरीसुद्धा काही गोष्टी सकारात्मक आहेत. या काळामध्ये नाशिकला साहित्य संमेलन झाले. त्याला वाचकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.
मागच्यावेळी जेव्हा यवतमाळ येथे संमेलन झाले होते, त्या निमशहरी ठिकाणीही लोकानी चांगला प्रतिसाद दिला होता. मुंबई, पुणे सोडून रत्नागिरी, औरंगाबाद येथेही वाचक आहेत. या वाचकांपर्यंत आपण पोचले पाहिजे. जे आता घडताना दिसत नाही. बहुतांशी प्रकाशक फक्त मुंबई पुणे इथपर्यंतच मर्यादित राहतात पण या इतर शहरातील लोकाना भूक आहे. त्यांना वाचनाची आवड आहे. वाचनासाठी नवीन पुस्तकं हवी आहेत.
या सगळ्या शहरात पण आता ऑनलाईन साधनांमुळे पोचणे थोडे सुसह्य झालय. त्याचा वापर करून जे चांगले चांगले विक्रेते आहेत ते सोशल मीडिया वरून पुस्तक विकत आहेत. यातून पुस्तक पोचत आहेत. वाचकांना उपलब्ध होत आहेत हे ही मला सांगावं वाटत.
साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाल्यानंतर वाचकांकडून काय प्रतिसाद मिळाला ?
खूप चांगला प्रतिसाद मिळाला. फोन भरपूर आले. मेसेज आले. ही माझ्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती होती ती नोव्हेंबर मध्ये आली होती. त्यावर ही चांगला प्रकाशझोत पडला. जास्त वाचकांनी प्रतिसाद दिला .
मला आवर्जून सांगावेसे वाटते, ‘काळ करडे’ याला पुरस्कार मिळाला हे तर ठीक आहे पण अंतिम यादीतील त्या पाच पुस्तकांची चर्चा झाली पाहिजे. ही पुस्तकं शेवटच्या पाचात आली म्हणजे त्यात पण गुणवत्ता असणार आहे. त्या पुस्तकांची चर्चा झाली तर ते एकूणच प्रकाशन विश्व, पुस्तक विश्व याला फायदेशीर ठरेल. लोक ती पुस्तकं विकतही घेतील.
वाचनसंस्कृती वाढण्यासाठी आपण काय करत आहात ? एक लेखक म्हणुन तुम्हाला काय वाटते ?
लेखक व प्रकाशक या दोघांनीही प्रथम मुंबई पुणे या शहराच्या बाहेर पडले पाहिजे. तिथे जाऊन छोटे वाचक यांचे मेळावे आयोजित करणे, लेखक आपल्या भेटीला असे कार्यक्रम करणे आवश्यक आहे .
इंग्रजीत एखाद्या लेखकाचे पुस्तक प्रकाशित झाले की तो टूर करतो. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. तसं सुद्धा मराठीत झाले पाहिजे. मराठवाडा, कोकणात जाऊन पाच दहा कार्यक्रम केले की वाचकाला संवाद साधण्याची संधी मिळते. खूप गर्दी पाहिजे असं मी म्हणत नाहीये, पण चाळीस पन्नास लोकांचा छोटासा कार्यक्रम, वन टू वन संवादही होऊ शकतो. पुस्तकाच्या
प्रमोशनसाठी अनेक लेखक आजही बूजलेले असतात. अनेकांना ते अशक्य वाटते. पण मला वाटते तुम्ही ते लिहिलंत ना ? लिहिताना तुम्हाला लाज नाही वाटली तर जे पुस्तक लिहिले ते वाचायला सांगायला लाज का वाटावी ?
मला असं वाटते की मराठी लेखकांनी या मर्यादेच्या बाहेर जाऊन वाचकांशी डायरेक्ट कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाचकांना काय वाटतय, त्यांच्या अपेक्षा काय असतात हे वाचकासोबत संवाद साधून आपल्याला समजू शकते. त्यांच्या समस्या काय आहेत हे समजून त्यावर मार्ग काढता येतो. आज हे वाढवण्यासाठी ऑनलाइन साधनं आहेत त्यांचा जास्तीतजास्त वापर करणे, प्रकाशनाने लेखक वाचक भेटी जास्तीतजास्त घडवणे, ते सुद्धा मुंबई पुण्याच्या बाहेर जाणे, हे केले तर त्याचा प्रचार आणि प्रसार खूप होऊ शकतो. आजही अजूनही मराठी वाचणारे खूप वाचक आहेत पण मुद्दा हा आहे की आपण पोचत नाही आहोत.
मराठी मध्ये येणार्या नवीन लेखकांना काय संदेश द्याल ? एक अनुभवी लेखक म्हणुन काय सांगाल ?
मी दोन गोष्टी सांगू इच्छितो. हा जो पुरस्कार मिळाला आहे तो मी प्रोत्साहन म्हणुनच बघतो. ही एक वेगळी सुरवात आहे. अजून भरपूर काम करायचे आहे. दुसरे अजून एक म्हणजे लेखन ही संयमाने करण्याची गोष्ट आहे. इथे तुम्हाला गोष्टी आजच्या काळात हव्या तेव्हा लगेच मिळतील असे नाही.
कथा, कादंबरी साठी वेळ द्यावा लागतो. त्यातून पुढे त्याचं काहीतरी होणार असते.
आजच्या काळानुसार झटकन पटापट नाही होत. थोडा वेळ लागतो. वेळ द्यावा लागतो.
कथा, कादंबरी हा एक भाग झाला. पण याशिवाय स्क्रिप्ट रायटिंग, पटकथा लेखन, भाषांतर हे क्षेत्र एक्सप्लोर केले पाहिजे. कथा, कादंबरी लेखनातून आर्थिक गणित पूर्ण होत नाहीत हे समजून घेणे गरजेचे आहे. हे करताना ती तुमची पॅशन असते. तुम्हाला ते लिहावेसे वाटत असते. इतर ही पर्याय आहेत.
व्यावसायिक लेखन आहे. त्यात शोध घेतला, तर समतोल साधला जावू शकतो.
कथा, कादंबरीत प्रत्येक गोष्ट तुम्हाला सुचते ती तशीच मांडली पाहिजे असं नाही. चांगला सिनेमा, चांगली वेब सीरिज लिहू शकता. चांगला अनुवाद लिहू शकता गोष्ट सांगणे महत्त्वाचे. मर्यादित दृष्टिकोन न ठेवता विस्तारित दृष्टिकोन ठेवला तर यात खूप संधी आहेत.
आपले आगामी काळातील लिखाणासंदर्भात काय सांगाल ?
एक म्हणजे मी दोन गोष्टी सध्या करत आहे. एक गोष्टींची मालिका आहे. एका परिसरातील
आठवी नववीतील मुलाचे भावविश्व, भावनिक आंदोलन हा विषय आहे.
मुलांचे भाव विश्व या गोष्टींची मालिका म्हटले तर संलग्न जोडलेली किंवा वेगवेगळ्या स्वतंत्र गोष्टी कशाही वाचू शकता.
दुसरे हवामान बदल. आजच्या जगाचा एक मोठा प्रश्न, कळीचा मुद्दा आहे. यावर काही लिहिण्याचे माझ्या विचारात आहे. त्यासाठी लागणारे रिसर्च मी करत आहे.
फिक्शन किंवा नॉन फिक्शन स्वरुपात लिहिण्याच्या मी विचारात आहे. पाहू या कोणत्या स्वरुपात येतय. पण त्याचे रिसर्च काम मी सध्या करत आहे.

– लेखन : कमल अशोक. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800