नेदरलँड्स मधील “नेदरलँड्स योगासन स्पोर्ट्स असोसिएशन”च्या अध्यक्षा तथा आपल्या न्यूज स्टोरी टुडे च्या सुरुवाती पासूनच्या लेखिका ॲड. प्रणिता देशपांडे यांनी नुकतीच मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
ॲड. देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना नेदरलँड्समध्ये योगासनाला एक खेळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी नेदरलँड्स योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांबद्दल माहिती देताना सांगितले की, हे असोसिएशन भारतातील योगाच्या सांस्कृतिक मुळांना जागतिक क्रीडा मान्यता देत, आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाचा प्रचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
या चर्चेत, द हेग येथील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयामध्ये आंतरराष्ट्रीय न्याय आणि मानवाधिकारांसाठी केलेल्या त्यांच्या योगदानावरही चर्चा झाली.
योगासनासोबतच, ॲड. देशपांडे यांनी नेदरलँड्समध्ये स्थापन केलेल्या ‘अंश ओव्हरसीज बी.व्ही.’ या आयात-निर्यात कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या त्यांच्या उद्योजकीय प्रवासावरही प्रकाश टाकला. ही कंपनी युरोपमध्ये भारतीय कृषी उत्पादनांना ओळख मिळवून देण्याकरिता समर्पित आहे.
प्रणिता देशपांडे यांनी २०१७ त्या नेदरलैंड्समध्ये स्थलांतरित झाल्यापासूनचा त्यांचा वैयक्तिक प्रवास, डच समाजात त्यांचे यशस्वी एकीकरण आणि डच भाषेतील त्यांचे प्राविण्य याबद्दलही सांगितले.
व्यक्तिगत पातळीवर बोलताना, ॲड. देशपांडे यांनी आपले आजोबा, कै. वासुदेवराव मानभेकर, जे आरएसएसचे माजी विदर्भ प्रमुख होते, यांची आठवण काढताना सांगितले की, त्यांचा परिवार त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि कौटुंबिक मूल्ये
जपण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
यावेळी ॲड. देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना आपली तीन पुस्तके आणि १७ व्या शतकातील प्रसिद्ध डच पेंटिंग ‘गर्ल विथ अ पर्ल इयरिंग’ची प्रतिकृती भेट दिली, जी नेदरलँड्स सोबतच्या त्यांच्या दृढ संबंधांचे प्रतीक आहे. तसेच नेदरलँड्स योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने एक विशेष स्मृतिचिन्हही भेट दिले.
यावेळी त्यांच्या सोबत पती, अद्वैत आणि मुलगा अंश होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
