यूपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या भारतीय वनसेवा परीक्षेमध्ये लातूरची कन्या प्रतिक्षा काळे हिने भारतातून दुसऱ्या तर महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले आहे.
सध्या मेळघाट परतवाडा अमरावती विभाग येथे सहाय्यक संरक्षक एएफसी या पदावर वर्ग एक अधिकारी म्हणून कार्यरत असलेली प्रतिक्षा काळे हिचा सत्कार शिवाई प्रतिष्ठान, लातूर यांच्यावतीने काळे हॉस्पिटल येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात करण्यात आला.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना प्रतिक्षाने सांगितले की, “कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट केल्याशिवाय यश संपादन करता येत नाही. पालकांनीही मुलांना केवळ डॉक्टर व इंजिनिअर होण्याचा अट्टाहास करू नये. विविध क्षेत्रातल्या अनेक वाटा करिअर निवडण्यासाठी शोधाव्या. आपण कितीही यश मिळवले तरी आई वडील व आपले मूळ संस्कार विसरू नये. ऑफिसच्या ठिकाणी ऑफिस व घराच्या ठिकाणी घर याला महत्त्व द्यावे. तरच आपण काय शिकलो याचं फलित होईल.” याप्रसंगी सर्व शिवाईनी विचारलेल्या प्रश्नाची तिने आपुलकीने उत्तरेही दिली.
उषा भोसले अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, “प्रतिक्षाने लातूरचा व महाराष्ट्राचा अभिमान वाढवला आहे. पुढील वाटचाल करताना देशातच नव्हे तर जगाच्या नकाशावर आपले नाव नक्कीच कोरेल,” अशा शुभेच्छा दिल्या.
शिवाई प्रतिष्ठान अध्यक्ष उषा भोसले, उपाध्यक्ष संगीता देशमुख, सचिव डाॅ. जयश्री धुमाळ व कोषाध्यक्ष डॉ. माधुरी कदम यांनी तिचा सत्कार केला. तसेच तिची आई प्रतिभा काळे यांचा सत्कार डॉ. सुरेखा काळे यांनी केला. डॉ. सुरेखा काळे यांनी तिची ओळख करून दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. माधुरी कदम यांनी केले. या कार्यक्रमाला डॉक्टर सुरेखा निलंगेकर, प्रतिभा काळे वर्षा, भराटे व सर्व शिवाई सदस्य उपस्थीत होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800