हिंदू सणवार, जयंती, इंग्रजी दिनदर्शिके ऐवजी पंचागानुसार साजरे झाले पाहिजेत, या माझ्या लेखाकडे वाचकांचे प्रथम लक्ष वेधल्या गेले, त्याचे कारण म्हणजे लेखापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र अत्यन्त तन्मयतेने काढणारी चित्रकार प्रतिभा रावळ पाहून.
या चित्रकार नक्की मुंबई/पुणे येथील असाव्यात, असा अनेकांचा समज झाला. ज्यांच्याकडे माझा मोबाईल क्रमांक होता, त्यांनी मला थेट विचारणा केली. त्यावेळी मी त्यांना, त्या प्रतिभा भुपाळ रावळ असून मूळ अमरावती येथील असल्याचे सांगितले. चित्रकार प्रतिभा रावळ यांच्या जीवन संघर्षावर एक चित्रपट नक्कीच होऊ शकतो, असंच त्यांचं नाट्यमय जीवन आहे.
प्रतिभा यांचं माहेर अमरावती. आताच्या प्रतिभा भुपाळ रावळ, त्या पूर्वीच्या प्रतिभा अरुण हजारे आणि त्याही पूर्वीच्या प्रतिभा कमलाकर तिवाटणे यांचा जन्म खूप सधन, श्रीमंत घरात झाला. त्यांचे आजोबा दत्तात्रय तिवाटणे, वडील कमलाकर , काका प्रभाकर यांचा अल्युमिनियम भांडी बनवण्याचा “प्रगती मेटल इंडस्ट्रीज” हा कारखाना होता. त्या इमारतीचं नावही होतं प्रगती बिल्डिंग! अमरावती- बडनेरा रस्त्यावर बांधलेली ती बहुधा पहिली इमारत असावी.
खरं म्हणजे, घरी श्रीमंती असूनही केवळ त्यावेळच्या रितिभातीनुसार त्यांचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी वाजत गाजत पुणे येथील चहाचे व्यापारी अरुणकुमार हजारे यांच्याशी झाला. पती अरुणकुमार, सासरची सर्व मंडळी खूप हौशी होती. पण घरातील मोठी सून म्हणून प्रतिभाकडून खूप अपेक्षा असायच्या.
संसाराचा काही अनुभव नसलेली, शिक्षणाची आस असलेली, प्रतिभा कोवळ्या वयात संसाराची जबाबदारी पडुनही हसतमुखाने सर्वांचं करायची. संसारवेलीवर एक कळी उमलली. सर्व कसं छान चाललं होतं. पण बघता बघता, प्रतिभाच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. पुढे पुढे, परिस्थिती बिकटच होत गेली. मात्र प्रचंड कसोटीच्या काळातही प्रतिभा यांनी आपल्यातील कला जिवंत ठेवली. अशा परिस्थितीशी टक्कर टक्कर देता देताच पती अरुणकुमार यांचा दुःखद अंत झाला.
पुढे प्रतिभा परिस्थितीशी एकटीने झुंजत राहिली. कला, चित्रकला यातील कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना केवळ अंगभूत प्रतिभा, मनस्विनी असलेल्या प्रतिभा यांच्या हातातील चित्रकला, कापडकला, अन्य कला प्रकार बहरतच गेले. नव्हे, या कलासक्तीनेच बहुधा त्यांना सावरत ठेवले, जगण्याचे, लढण्याचे बळ दिले.
प्रतिभाने काही वर्षे ब्युटी पार्लरचा व्यवसाय केला. त्याच बरोबर त्या ब्युटी पार्लरचे अनेक वर्षे प्रशिक्षण देत होत्या.
पुणे येथील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचे पहिले चित्र प्रदर्शन झाले. पुढे त्यांच्या कडे कामाचा ओघ निर्माण झाला. दरम्यान स्वतः रसिक असलेले भुपाळ रावळ त्यांच्या जीवनात आले. उपजत कला, भुपाळ रावळ यांचं प्रोत्साहन यामुळे आज प्रतिभा भुपाळ रावळ यांनी वेगळी उंची गाठली आहे.
प्रतिभा रावळ यांच्या कलाक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मानवसेवा विकास फौंडेशन, दि पॉवर ऑफ मीडिया फौंडेशन या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने त्यांना गेल्यावर्षी, शिवजयंती दिनी, म्हणजेच १९ फेब्रुवारी २०२० रोजी पुणे येथील नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या भव्य सभागृहात “महाराष्ट्र शिवरत्न राष्ट्रीय पुरस्कार २०२०” सन्मान पूर्वक देऊन गौरविण्यात आले.
भूमाता ब्रिगेडच्या लढवय्या तृप्ती देसाई, चित्रपट निर्माती अनुजा देशपांडे, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त धनंजय धोपावकर, संयोजक डॉ. नंदकुमार पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते शिवरत्न पुरस्कार प्रतिभा रावळ याना प्रदान करण्यात आला. कार्यक्रम स्थळी प्रतिभा रावळ यांची शिवचित्रे रसिकांच लक्ष वेधून घेत होती. आयोजकांनी न राहवून त्यातील शिवरायांचे एक देखणे चित्र निवडून त्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. प्रतिभा रावळ यांच्या कलेला मिळालेली ही मोठी दाद होय.
प्रतिभा रावळ यांना दिवसेंदिवस विविध, विशेषतः पाळलेल्या श्वानांच्या पेंटिंगची कामं मिळत आहेत. प्रतिभा रावळ यांची कला बहरतच आहे, ती अधिकाधिक बहरत जावो यासाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800
खूपच प्रतिभासंपन्न प्रतिभाताईचं जीवनकार्य
प्रतिभा रावळ अश्या लढवय्या चित्रकाराची ओळख, भुजबळ सरांच्या लेखातून, आज वाचनात आली. खूप धन्यवाद!
प्रतिभा राऊळ यांचा लेख उत्तम!
प्रतिभा सराफ