Thursday, November 21, 2024
HomeUncategorizedप्रतिभेचा अविष्कार : प्रतिभाताई पाटील

प्रतिभेचा अविष्कार : प्रतिभाताई पाटील

आकाशवाणी जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होती त्या काळात अनेकांना आपल्या जादुई आवाजामुळे, स्पष्ट उच्चार कौशल्यामुळे आकाशवाणीत काम करण्याची संधी मिळाली. त्यात प्रतिभा पाटील – बिरजे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याकाळात आकाशवाणी अथवा दूरदर्शन यासारख्या दृकश्राव्य माध्यमात ज्यांना काम करण्याची संधी अथवा नोकरी करण्याची संधी मिळाली ते भाग्यवानच म्हटले पाहिजेत. कारण समाजप्रबोधन, मनोरंजन, शेती, अर्थकारण, राजकारण, साहित्य या व अशासारख्या विषयांचे आकाशवाणीवरून होणार्‍या प्रसारणामुळे लोकांच्या ज्ञानात भरच घातली जात असे. हे विविध प्रकारचे कार्यक्रम जे लोक सादर करीत असत ते प्रतिभावंत होते. ज्यांच्या नावातच प्रतिभा आहे, त्या प्रतिभाताई पाटील – बिरजे यांनी आपल्या जादुई आवाजामुळे त्याकाळात श्रोत्यांना भूरळ पाडली.

शालेय जीवनात वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांची अत्यंत आत्मविश्वासाने मुलाखत घेतली होती.त्या मुलाखतीची वाहवा झाली होती. तेथूनच त्यांचा जीवनप्रवास सुरु झाला.

विविध राज्यातून आलेल्या शेकडो हिंदी उमेदवारांमधून प्रतिभाताईंची हिंदी निवेदिका म्हणून झालेली निवड झाली. ही निवड समाजासाठी त्याचबरोबर मराठी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट होती. १९८७ मध्ये त्या मुंबई आकाशवाणीत हिंदी निवेदिका म्हणून रुजू झाल्या. त्यांना १९८६ पासूनच नैमितिक करारावर मराठी व हिंदी निवेदिकेबरोबर आकाशवाणीच्या सर्व विभागात निमंत्रित केले जात असे. मूळ मराठी भाषिक पण सर्वोत्तम हिंदी व मराठी भाषेवरील प्रभुत्व, उर्दू भाषेतील शब्दांचे अभ्यासपूर्ण अचूक उच्चार, सहजसुंदर एखाद्या कार्यक्रमाचे कौशल्यपूर्ण सादरीकरण,संगीताची उपजत जाण, लेखन कौशल्य अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे प्रतिभाताईंचे व्यक्तीमत्व उजळून निघाले होते. त्यांच्या सादरीकरणामुळे त्यांनी सादर केलेले मुंबई ‘अ’ संवादिता केंद्राचे ‘सुबह सवेरे’, पहिल्या एफ.एम केंद्राचे प्रसारण करण्याचा मानही १९९२ मध्ये प्रतिभाताईंना मिळाला. त्यांच्या एफ एम गोल्ड आणि रेन्बो केंद्राच्या सुरुवातीच्या काळातले ‘मनभावन’, ‘यादो के झरोखोेसे’ असे अनेक कार्यक्रम त्यांनी लोकप्रिय केले. आकाशवाणीच्या आंबटगोड, कामगार सभेतल्या ‘ सहज सुचलं म्हणून’, ‘आपलं पत्र पोहचलं’, माझं आवार माझं शिवारमधल्या ‘अवती भवती’ या कार्यक्रमात त्या असायच्या तेव्हा श्रोत्यांच्या आनंदाला पारावार नसायचा.

अशा या प्रतिभाताई पाटील यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९५९ रोजी सुसंस्कृत, कलाप्रेमी व सर्जनशील कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण विलेपार्ले येथील महिला संघात झाले. त्यांनी साठे महाविद्यालयातून बी. ए. ची पदवी व पुढे मुंबई विद्यापीठातून हिंदी भाषेतून एम.ए. ची पदवी उत्तम गुणांनी संपादन केली. पत्रकारितेचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. इतकेच नाही तर त्यांनी रशियन भाषेतून पदविका प्राप्त करुन रशियन भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. आकाशवाणी आयोजित दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या हिंदी पखवाडा(सप्ताह) स्पर्धेत त्या अनेक पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. कवयित्री असलेल्या प्रतिभाताईंनी प्रसंगानुरूप आशयघन कविता लिहिल्या. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी सामाजिक समस्यांवर अनेक कथा लिहिल्या व त्याचे सादरीकरणही आकाशवाणीवरून केले. त्यांच्या भगिनी कवयित्री सुरेखा पाटील यांच्या ‘तरंग’ काव्यसंग्रहाचे त्यांनी हिंदी भाषेत समवृत्त रुपांतर केले. जो काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

आकाशवाणीतून आपले भविष्य घडवू पाहणार्‍या युवावर्गला प्रतिभाताई बहुमोल मार्गदर्शन करीत. त्यातील लोकप्रिय नाव ‘बुलेट ट्रेन’ , महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून सर्वांना खळखळून हसवणार्‍या व समाज प्रबोधन करणार्‍या विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार सादरीकरणात भाग घेत. त्यामुळे त्यांचे नाते इतके घट्ट झाले की, विशाखा सुभेदार आकाशवाणी केंद्रात आल्या की, प्रथम प्रतिभा मॅडम कुठे आहेत अशी चौकशी करीत. विशाखा सुभेदार यांना मिळत असलेले यश पाहून प्रतिभाताईंना त्याचे कौतूक वाटे. व्यक्तीची पारख त्याच्या गुणांवरून होते. म्हणतात ना ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ हे त्यांच्या बाबतीत खरे ठरले.

नारीजगत या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशाताई भोसले यांची प्रतिभाताईंनी घेतलेली मुलाखत श्रोत्यांच्या पसंतीस उतरली. श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव अनेकवेळा ही मुलाखत प्रसारीत करण्यात आली. याचे कारण आशा भोसले यांना प्रतिभाताईंनी चाकोरीबद्ध प्रश्न विचारले नव्हते.

गाण्याबरोबर खाणे बनविण्यासाठी उपयुक्त सूचना आशाताईंनी दिल्या होत्या. त्यातून आशाताईंच्या व्यक्तीमत्वाचा वेगळा पैलू श्रोत्यांसमोर आला. विशेष म्हणजे ही मुलाखत विविध भारतीवर सुध्दा प्रसारीत करण्यात आली होती. दिवंगत सनदी अधिकारी नीला सत्यनारायण, सुप्रसिद्ध गझलसम्राट अनुप जलोटा, खाद्यजगतातील यशस्विनी तरला दलाल, इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा विक्रम करणारी जलतरणपटू आरती प्रधान, वेटलिफ्टर मधुमती कटके यांच्या तसेच लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांची त्यांनी आकाशवाणीवर मुलाखत घेतली होती. त्याचप्रमाणे माजी मंत्री सुरेश प्रभू आणि अग्निशमन दलाचे अधिकारी दुर्गादास कुलकर्णी यांच्याही त्यांनी दूरदर्शनवर घेतलेल्या मुलाखती उल्लेखनीय ठरल्या. मुंबईतील दोन अंध भगिनी आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकून डोळसपणे आपला अभिप्राय कळवत असत. प्रतिभाताई यांनी या दोघी भगिनींना आकाशवाणीवर आमंत्रित करून त्यांच्याही मुलाखती घेतल्या. क्रिकेट समालोचक सुरेश सरय्या यांच्या षष्ठब्दीपूर्ती सोहळ्यात पत्रकार संघात प्रतिभाताईंनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती. तसेच खेळाडूंच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही प्रतिभाताईंनी केले होते.

इतकेच नाही तर देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष असताना प्रतिभाताईंनी त्यांच्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. तेंव्हा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील खूप प्रभावित झाल्या आणि म्हणाल्या की, माझ्या यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तूच करायचे, असे त्या प्रतिभाताईंना म्हणाल्या. प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी जेव्हा आकाशवाणीत जात असत तेव्हा ते आवर्जून प्रतिभाताईंची आठवण काढत. प्रतिभाताईचा आवाज तर सुमधूर होताच आणि त्यांना सौंदर्यही लाभल्यामुळे प्रतिभाताईंनी दूरदर्शनवर यावे, असे अमीन सयानींना वाटे. आकाशवाणीतील एका भेटीत सयानी प्रतिभाताईंना म्हणाले की, महोदया, ‘आप यहाँ क्या कर रही है! आपको दूरदर्शनपर आना चाहिए ‘! यावरुन त्यांच्या कार्याची महती येते. आकाशवाणी का यह दिल्ली केंद्र है, अशी जी उदघोषणा केली जात होती, हा आवाजही प्रतिभाताईंचाच होता. एखाद्या व्यक्तीमत्वाबद्दल किती सांगावे आणि किती कौतुक करावे, असा प्रश्न पडतो. प्रतिभाताईना हे तंतोतंत लागू पडते. त्यांचा प्रगतीचा आलेख सारखा चढता होता. त्या एक एक पाऊल पुढे जात असताना त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

अशा या हिंदी कवयित्री, अजातशत्रू, मृदू स्वभाव आणि त्यांच्यातील आवाजाच्या जादूमुळे श्रोत्यांच्या मनात कायमचे घर करणाऱ्या प्रतिभाताईंचे ६ एप्रिल २०१७ रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी दुःखद निधन झाले. एक चांगली कलावंत, सुरेल आवाजाच्या निवेदिका आकाशवाणीच्या आकाशातल्या तारका प्रतिभा पाटील – बिरजे आपल्यातून आज काळाच्या पडद्याआड गेल्याने केवळ श्रोत्यांचीच नव्हे, तर समाजाचीही फार मोठी हानी झाली आहे. ४ नोव्हेंबर , त्यांचा जन्मदिवस आहे. या दिनी त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या असंख्य श्रोत्यांनाही स्वस्थ बसू देत नाही, हेच खरे! त्यांच्या स्मृतींना अभिवादन !

– ऋचा रायकर,
मुंबई.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments