“विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच इतर कला, क्रीडा क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले पाहिजे. त्याची सुरुवात महाविद्यालयातील ‘नवरंग’ सारख्या महोत्सवातून होते. ‘नवरंग’ सारखे महोत्सव विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला गगनभरारी घेण्यासाठी नवे पंख देतात. अशी गरुडभरारी घेताना शिस्तीचे अनुशासन फार महत्वाचे ठरते.” असे मत प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांनी व्यक्त केले. विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयात ‘नवरंग’ महोत्सवाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर नवरंग प्रमुख उपप्राचार्या छाया कोरे, डॉ. प्रियंवदा टोकेकर, प्रा.सुभाष शिंदे, डॉ.महेश पाटील, प्रा.नारायण बारसे, प्रा.नितीन पागी, डॉ. मृण्मयी थत्ते,डॉ. नीलम शेख,प्रा.अंजली पुरंदरे, प्रा.तुषार हेडाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक पुढे म्हणाल्या, “आजच्या युगात अभ्यासासोबत इतर कला – क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी स्वतःला व्यस्त ठेवले पाहिजे. शारीरिक तंदुरुस्तीसोबत मानसिक आरोग्यही जपले पाहिजे. ‘नवरंग’ सारखे महोत्सव विद्यार्थ्यांमध्ये अंतर्बाह्य बदल घडविण्यास मदत करतात. हेच या महोत्सवाचे यश आहे.”

यावेळी नवरंग महोत्सव ‘संस्कृती ते समृद्धीपर्यंत’ या संकल्पनेवर आधारलेला आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व नवरंग प्रमुख छाया कोरे यांनी विद्यार्थ्यांना ‘आयुष्यात नवरंगांचे महत्त्व’ समजावून सांगितले आणि कल्पकतेचा व कलात्मकतेचा ध्यास घेण्याचा आग्रह देखील धरला.

दरम्यान उद्घाटन समारंभात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपली कला सर्वांसमोर सादर केली. यात प्रामुख्याने संगीत, नृत्य व गायनाने वातावरण अधिक प्रफुल्लित केले. उद्घाटनानंतर रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा व क्रीडा मेळावा पार पडला. यामध्ये एकूण २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800