प्रतोद म्हणजे आसूड, कोरडा ! राजकीय क्षेत्रातील प्रतोद म्हणजे पक्षातील लोकांना सूचना देणारा किंवा व्हिप जारी करणारा ! व्हिप जारी करतानाचे शब्द म्हणजे एक प्रकारचा आदेशच असतो, न मानल्यास शिक्षेची धास्ती ! पत्रकार क्षेत्रातही आसूड असतोच असतो, ज्याची सर्वांनाच प्रचंड भीती असते, आदरयुक्त दरारा असतो. पत्रकारांचा आसूड म्हणजे त्याची लेखणी ! ही लेखणी कुणावर कोरडे ओढेल ते सांगता येत नाही.
साठ वर्षांपूर्वी एका ध्येयवेड्या माणसाने नांदेड येथे एक साप्ताहिक काढायचा निर्णय घेतला. त्यावेळी खरोखरच पत्रकार म्हणजे सर्वत्र दरारा असलेला असा, पत्रकाराची चाबूकरुपी लेखणी कुणाला जेरीस आणेल याची धास्तीच असे. पत्रकार आसपास दिसला तरीही अनेकांना घाम फुटत असे. अशा काळात आदरणीय ग. ना. अंबेकर यांनी साप्ताहिक सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या साप्ताहिकासाठी नावही साजेसे निवडले ते म्हणजे “प्रतोद”! पहिला अंक प्रकाशित झाला तोही चौदा जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर ! पत्रकारितेच्या क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचा ध्यास घेऊन हे साप्ताहिक सुरु करण्यात आले. चाबूक, आसूड, कोरडा यांच्या कार्याशी साधर्म्य असणारे हे शीर्षक ! हे शीर्षक कसे निवडण्यात आले किंवा प्रतोद सुरु करण्याचा निर्णय कसा झाला ते गुरुवर्य प्रा. राम शेवाळकर यांच्या शब्दात…
‘वाङ्ममयीन चळवळीशी संबंधित प्रत्येक उपक्रमास अंबेकर तन मन-धनाने सहाय्य करीत असत. अंबेकर यांना स्वतःला नाटकाची प्रचंड आवड होती. त्यांच्या आवडीमुळेच नांदेडला अनेक नामवंत कलाकारांची हजेरी लागत असे. विशेष म्हणजे येणाऱ्या कलाकारांचा मुक्काम अंबेकरांच्या घरीच असे. त्यांचे आदरातिथ्य, पाहुणचार करण्यात अंबेकरांना धन्यता वाटे. ग.ना. अंबेकरांनी त्या काळात स्थापन केलेले गोदावरी मुद्रणालय आजही सुस्थितीत चालू आहे. या प्रेसमध्ये अंबेकरांसोबत मी (राम शेवाळकर) आणि त्यांचे मित्रमंडळ फावल्या वेळेमध्ये बसत असत. या बैठकांमध्ये प्रामुख्याने वाङ्ममयीन चर्चाच अधिक व्हावयाच्या. संपन्न झालेल्या कार्यक्रमांची उजळणी आणि भविष्यात होऊ घातलेल्या कार्यक्रमांचे नियोजन -आखणी होत असे. चर्चेदरम्यान गरमागरम कॉफीचा आस्वादही घेतल्या जाई. याच गप्पांमध्ये साप्ताहिक प्रतोद’ आणि ‘वार्षिक दीपकळी’ यांचा जन्म झाला. यांपैकी प्रतोद आजही चालू आहे…’
अंबेकर यांच्याविषयी शेवाळकर पुढे म्हणतात, ‘नांदेडच्या सांस्कृतिक विश्वाला पडलेले आणि प्रत्यक्षात उतरलेले स्वप्न म्हणजे ग.ना. अंबेकर ! नांदेडच्या साहित्यिक विश्वाला अंबेकर नावाचे व्यसन जडले होते, अशा प्रचंड प्रमाणात अंबेकरांनी वाङ्ममयीन कार्यक्रमांना वाहून घेतले होते. अंबेकरांच्या ‘प्रियदर्शन’ मध्ये अनेक व्यक्तींचा अक्षरश: राबता असायचा. त्यामुळे त्या वास्तुचे घरमालक अंबेकर हेच जणू तिथे किरायेदार होते. मला भावलेली अंबेकरांची एक गोष्ट म्हणजे अंबेकरांजवळ असलेली प्रचंड नियमितता ! रात्री ठरलेल्या वेळी ते झोपणार म्हणजे झोपणारच. वाङ्मयीन कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती हा त्यांच्या नियमिततेसाठी ठरणारा अपवादात्मक छेद ! रात्री कितीही उशिरा झोपले तरीही अंबेकर पाचच्या ठोक्याला उठणारच !’
प्रा. राम शेवाळकर यांच्या या ओळींवरुन आपल्या लक्षात येईल की, आदरणीय ग. ना. अंबेकर यांची नांदेडच्या साहित्य विश्वाशी नाळ कशी जोडल्या गेली होती ते !
मी साधारणतः १९९९-२००० या सुमारास साहित्य विश्वात आलो. माझे मावस काका महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध कवी आदरणीय राजा मुकुंद यांनी मला सुचवले की, तू प्रतोदसाठी लिहित जा. तिथून मी सा. प्रतोदशी जोडल्या गेलो ते आज पुणे येथे स्थायिक झाल्यानंतरही ते ऋणानुबंध सुरु आहेत. विशेषतः दरवर्षी माझा लेख, कथा ही प्रतोद अंकात निश्चितच असते. दरवर्षी दिवाळी अंकाची तयारी सुरु झाली की, साहित्य पाठविण्यासाठीचे प्रतोदचे पत्र आणि आजकाल दूरध्वनी, ईमेल हमखास येतो. सुरुवातीच्या काळात प्रतोदचा दिवाळी अंक हातात पडला आणि अनुक्रमणिकेत मान्यवर लेखकांसोबत आपले नाव दिसताच खूप आनंद होत असे. सुरुवातीच्या काळात गुरुवर्य राम शेवाळकर यांच्यासोबत माझे नाव पाहून अनेकदा डोळे पाणावलेले आजही आठवतात.
साठ वर्षांचा काळ थोडा नाही. या काळात अनेक बदल, स्थित्यंतरं झाली. विशेष म्हणजे मागील काही काळापासून डिजिटल क्रांती झाली असली तरीही आजही प्रतोद तेवढ्याच मानाने, डौलाने उभा आहे. बदल होताच त्याच्याशी जुळवून घेणे म्हणावे तितके सोपे नसते परंतु अंबेकर परिवाराने ही किमया यशस्वीपणे साधली आहे. नव्या- जुन्या लेखकांच्या सहकार्याने स्वतःचे स्थान टिकवून आहे, ही सन्मानाची, गौरवाची बाब आहे.
सा. प्रतोद आणि अंबेकर कुटुंबीयांसाठी काही आनंदाचे, प्रोत्साहित करणारे क्षण निश्चितच आले आहेत. श्री. कृष्णा शेवडीकर, संपादक दै. श्रमिक एकजूट, नांदेड यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाचे मुंबईतील व्यापारी राजदूत ओर्स्काय यांनी प्रतोद कार्यालयाला दिलेली भेट ही जशी गौरवास्पद आहे, तशीच सा. प्रतोदचे उत्कृष्ट कार्य अधोरेखित करणारी आहे.

साप्ताहिक प्रतोद हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे ही बाब नक्कीच आनंददायी, समाधानाची आहे. त्यानिमित्ताने अंबेकर परिवार, प्रतोद समूहातील सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! आगामी काळात सा. प्रतोदची भरभराट होवो, त्यांच्या मनात साहित्य क्षेत्राच्या विकासासाठी ज्या ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात येवोत या शुभेच्छांसह… धन्यवाद !

– लेखन : नागेश सू. शेवाळकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800