साधारण तीन ते चार वर्षांपूर्वी सुरु झालेला ‘अलक’ अर्थात ‘अति लघुकथा’ हा साहित्य प्रकार आता चांगलाच प्रचलित झालाय. खूप कमी शब्दांत योग्य शब्दांचा वापर करून नेमका आशय सांगायचा असल्याने अलक लिहिणं अतिशय आव्हानात्मक असते. कादंबरीवरून कथेवर, कथेवरून लघुकथेवर येऊन आपले म्हणणे समोरच्याला सांगणे किंवा व्यक्त होणे म्हणजेच अलक !
‘रेडियो पुणेरी आवाज १०७.८’ या वाहिनीवरून प्रत्येक सप्ताहात अलकचे प्रसारण होत असते. घराघरात पोहचलेल्या या अलकला साहित्य क्षेत्रात मानाने स्थान देण्याकरीता महिलादिनाचे औचित्य साधून ‘रेणुका आर्टस्’ समूहातर्फे ८ मार्च रोजी साहित्य क्षेत्रात प्रथमच अखिल भारतीय ऑनलाईन ‘अलक संमेलन’ घेण्यात आले. या संमेलनाला देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला.
लेखक व होरा मुद्रिक शास्त्र पंडित श्री. मयुरेश देशपांडे हे या राष्ट्रस्तरीय संमेलनाचे प्रमुख अतिथी होते तर लेखक, हौशी कलाकार व रेडियो पुणेरी आवाज १०७.८ वर आपल्या ओघवत्या भाषाशैलीने ‘अलक’ला महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर पोहचवणारे सेंट जोसेफ या कॉलेजचे मराठीचे प्राध्यापक श्री.जगदीश संसारे यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.
मान्यवरांनी ऑनलाईन दीप प्रज्वलन केल्यानंतर अरुणा जाजू यांनी गायलेल्या सरस्वती वंदनाने संमेलनाची सुरवात झाली. या संमेलनाला दिल्ली, छत्तीसगढ, हैदराबाद, बंगलोर,पुणे, मुंबई, जळगाव, नेरुळ, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांतून आणि अॉस्ट्रेलियातूनही अनेक कवयित्री व लेखिकांनी हजेरी लावली.
आनला बापट, मनीषा वैंगणकर, अरुणा जाजू, मनीषा पाटील, मुग्धा करंदीकर, कविता कुलकर्णी -दातार, सारिका कुलकर्णी, डॉ.शीतल मालुसरे, शिल्पा टोपे, राही लिमये, परवीन कौसर, राखी जोशी, मीना खोंड तसेच अपर्णा देशपांडे या महिलांनी त्यांच्या अलक सादर केल्या. महिलांशी निगडित विषयांव्यतिरिक्त इतर अनेक विषय यात प्रभावीपणे मांडले गेले त्याचप्रमाणे अलक संमेलनाची नव संकल्पना आवडल्याचे त्यांनी मनोगतात सांगितले.
‘एक आटपाट नगर होतं पण आता तिथले पाट आटले आहेत.” अलकचे हे सुंदर उदाहरण देताना श्री.संसारे म्हणाले की, वाचकांच्या मनाला जाऊन भिडते ते उत्तम लेखन असते. अलक लेखनात व्याकरणावर जास्त भर दिला जातो. अलक कशी सादर करावी यावरही त्यांनी काही दाखले देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्री. मयुरेश पंडित यांनी वृत्तपत्रातील मुख्य वृत्त म्हणजे अलकच आहे असे सांगून भविष्यात या साहित्य प्रकाराला नक्कीच चांगलं व्यासपीठ मिळेल असा विश्वास जाहीर केला. पुढे अलकचे वैचारिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, विनोदी अशा पातळ्यांवर अलकची वाटचाल होऊ शकते, असेही ते म्हणाले.
अलकचे राज्यस्तरीय संमेलन आयोजित केल्याबद्दल दोन्ही मान्यवरांनी आनंद व्यक्त केला.
प्रथम अलक संमेलन आयोजित केल्याबद्दल जामनगर, गुजराथस्थित रेणुका आर्टसच्या संस्थापिका, लेखिका, कवयित्री आसावरी इंगळे यांचे आभार मानताना कविता कुलकर्णी दातार यांनी भविष्यात असेच कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल सुचवले. तर हे केवळ संमेलन न राहता देशभरातील कानाकोपऱ्यात असलेल्या सहवेदना, सह अनुभूती आणि सह जाणिवा जपणाऱ्या मनांची एक कार्यशाळाच झाली, असे मत संमेलनात सहभागी सारिका कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.
कार्यक्रमास उपस्थित अलक सम्राट सुभाष उमरीकर, प्रसिद्ध लेखिका वर्षा किडे कुळकर्णी, शुचि बोरकर, श्वेता देशपांडे, अपूर्व नाईक व अनेकांनी अलक संमेलनाच्या संकल्पनेचे स्वागत करून या संमेलनामुळे नवीन अलककारांना लिखाणास ऊर्जा मिळेल, असे विचार व्यक्त केले.
‘रेणुका आर्टस्’ ने नेहमीच नवनवीन उपक्रम आयोजित करून लेखक, कवींना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. यापूर्वी सोशल मीडियावर साहित्य व कलेशी संलग्न अनेक स्पर्धा राबवल्यात, सलग चार वर्ष सोशल मीडियातील प्रथम ऑनलाईन खुले साहित्य संमेलन घेतले, फेसबुकवर गझल कार्यशाळा आयोजित केली, ‘फेसबुक बेटावरून’ हा छापील प्रकाशित दिवाळी अंक प्रकाशित केला तसेच मागील वर्षांपासून ‘स्पर्श’ हा आगळावेगळा दृक्श्राव्य दिवाळी अंक प्रकाशित केलाय. या संकल्पनेलादेखील देशविदेशातून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं अंकाच्या संपादिका आसावरी इंगळे यांनी सांगितलं.
– टीम एन एस टी. ☎️9869484800