नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्या 2022-23 ह्या वर्षीच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून डॉ. अभय बंग, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अनुराग लव्हेकर, आप्पासाहेब खोत, मंगला असोलेकर देशपांडे आणि स्टॅन्ली गोन्सालविस यांचा ह्या पुरस्कारांच्या मानकर्यांमध्ये समावेश आहे.
(1) एका ज्येष्ठ लेखकाला दरवर्षी मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाच्या साधना सन्मानासाठी गडचिरोली येथील लेखक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांची निवड करण्यात आली आहे. रु. 11,000 रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
(2) सर्वोत्कृष्ट पुस्तकाकरिता देण्यात येणार्या प्रसाद बन वाङ्मय पुरस्कारासाठी नांदेड येथील डॉ. अनुराग लव्हेकर यांच्या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ’वसुंधरेचे शोधयात्री’ ह्या संशोधनपर पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. रु.11,000 रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
(3) प्रसाद बन ग्रंथगौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आप्पासाहेब खोत यांच्या ललित पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या ’काळीज विकल्याची गोष्ट’ ह्या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रु. 5000 रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
(4) प्रसाद बन राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कारासाठी स्टॅन्ली गोन्सालविस यांच्या दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ’अंकलचा कुत्रा आणि इतर कथा’ ह्या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. रु. 5000 रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
(5) दुसरा ग्रंथगौरव पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील साहित्यिकाला देण्यात येतो. सौ. मंगला असोलेकर देशपांडे यांनी लिहिलेल्या आणि अभंग प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ’नयनरम्य नॉर्वे’ ह्या प्रवासवर्णनपर पुस्तकाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रु. 5000 रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
(6) राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कारासाठी पुणे येथील ’आंतरभारती’ ह्या दिवाळी अंकाची निवड करण्यात आली आहे. लक्ष्मीकांत देशमुख हे ह्या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत. रु. 5000 रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन आणि वाङ्मय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत यांनी नांदेड येथे नुकतीच ह्या पुरस्कारांची घोषणा केली.
प्रतिष्ठानच्या वाङ्मय पुरस्कारांचे हे 23 वे वर्ष आहे. शनिवार, दि. 23 मार्च रोजी नांदेड येथे आयोजित एका विशेष समारंभात ह्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात आले आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800