तानसा खोऱ्यात पावसाळ्यात सरासरी २००० मिमी हून अधिक पाउस पडतो. परंतु जल पातळीत वाढ होण्याऐवजी पाणी वाहून जाते. यामुळेच पावसाळ्यात खूप पाउस पडूनही उन्हाळ्यात प्यायलाही पाणी नाही, अशी अवस्था होते. याच कारणाने शेतात फक्त खरीपाचे पिक घेतले जाते. इतर दोनही मोसमात शेताच्या उत्पादकतेचा फायदा शेतकरी घेऊ शकत नाही. येथे योग्य जल संधारणाचे प्रयत्न होणे ही काळाची गरज झाली आहे.
याचे महत्व ओळखत गुरुदेव सिद्धपीठ प्रेरित प्रसाद चिकित्सा, गणेशपुरी, कृषी विभाग वाडा, ग्रामपंचायत नांदणी आणि बचत गटातील महिलांच्या श्रमदानातून पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गायगोठा गावात नुकताच वनराई बंधारा उभारण्यात आला.
प्रसाद चिकित्साने महिला बचत गटांमध्ये जल संधारणाची गरज आणि त्यावरील योग्य उपायांबाबत जागृती निर्माण केली. कृषी विभाग वाडा यांच्या मार्गदर्शनाने व ग्रामपंचायत नांदणी यांच्या सहकार्याने वाडा तालुक्यातील गायगोठा गावातील ओढ्यावर बचत गटातील महिलांनी श्रमदानातून वनराई बंधारा उभारला.
या बंधाऱ्यामुळे पाणी अडण्यासह जमिनीत मुरेलही. यामुळे जलपातळीत वाढ होऊन परिसरातील जल स्त्रोतांच्या पाण्यात वाढ होईल. परिसरातील शेतकऱ्यांना भाजीपाला पिकविण्यासाठी अधिकचे दोन ते तीन महिने पाणी उपलब्ध होईल.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांना श्रीमती शिल्पा निखाडे, तालुका कृषी अधिकारी, वाडा यांनी नैसर्गिक शेती बाबत मार्गदर्शन करून जीवामृत बाबत माहिती देत ते बनविण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.
यावेळी श्री. अरुण गोंड, माजी सभापती, पंचायत समिती वाडा, श्री. इंगळे मंडळ कृषी अधिकारी, श्रीमती मेघा खांडेकर, सरपंच, ग्रामपंचायत नांदणी, श्रीमती पूनम मोकाशी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत नांदणी, श्री. संजय घरत ,कृषी पर्यवेक्षक, श्री. राहुल चव्हाण, कृषी सहाय्यक, प्रसाद चिकित्साचे अधिकारी व कर्मचारी तसेच गायगोठा गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800