तानसा खोऱ्यातील जनता, लोकप्रतिनिधी, विदयार्थी यांच्यासाठी शाश्वत गावविकास प्रकल्पातंर्गत प्रसाद चिकित्सा संस्थेतर्फे नियमित प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी हजारो प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी होत असतात.
संस्थेचे या क्षेत्रातील योगदान व प्राविण्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा परिषदेने नुकत्याच पार पडलेल्या ४ दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रतिनिधीत्व करण्यासाठी प्रसाद चिकित्सा संस्थेची निवड केली होती.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. ‘लिंगसमभाव पोषक पंचायत’ हा प्रशिक्षणाचा मुख्य विषय होता.
युनोची शाश्वत विकासाची जी सतरा लक्ष ठरवलेली आहेत व ज्यांना २०३० पर्यंत साध्य करावयाचे आहे त्यामध्ये लिंगसमभाव हे महत्वाचे उद्दिष्ट आहे.
प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातुन विविध क्षेत्रातील प्रशिक्षक, नामवंत विषयतज्ञ, लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन यशदाचे उपमहासंचालक
डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी शाश्वत विकासाची सतरा ध्येये स्पष्ट करुन तर सांगितलीच पण त्याचबरोबर गावातील प्रत्येक घटकाला विशेषतः स्त्रीया, मागासवर्ग, पिडीत जनसमुदाय यांना विकासाच्या प्रवाहात कसे आणता येईल या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेमध्ये बँक, कायदा, युनिसेफ या क्षेत्रातील मंडळींनी सादरीकरण केले व चर्चा घडवून आणल्या.
सहभागींना गावविकास या संकल्पनेची प्रत्यक्ष ओळख व्हावी यासाठी पुणे शहरालगत असलेल्या कदमवाक या ग्रामपंचायतीचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान सहभागींनी सरपंच आणि ग्रामविकासाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली व गावविकासाचे मॉडेल समजून घेतले.
प्रशिक्षणाच्या शेवटी सहभागींना सादरीकरण करण्याची संधी मिळाली. संस्थेच्या वतीने श्री. रावसाहेब मोटे यांनी ‘महिलांसाठी पुर्ण व उत्पादक रोजगार’ या विषयावर संगणकीय सादरीकरण केले. या कार्यशाळेचा समारोप सत्र संचालक यांच्या हस्ते सहभागींना प्रशस्तीपत्रे देऊन करण्यात आला.
लवकरच तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळांचे आयोजन करुन त्यांच्यापर्यंत हा विषय घेउन जाण्याचे नियोजन प्रसाद चिकित्सामार्फत केले जाणार आहे.

– लेखन : मिलिंद नरगुंद.
कार्यकारी व्यवस्थापक, प्रसाद चिकित्सा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800