Sunday, July 13, 2025
Homeयशकथाप्राणदाता डॉ संतोष मोहिरे

प्राणदाता डॉ संतोष मोहिरे

अतिशय उच्चशिक्षित, समाजसेवी, नामवंत डॉक्टर ज्यांनी आयुष्य भर रुग्णाची सेवा करण्यात स्वतःला वाहून घेतले, जणू हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट आहे असे डॉ संतोष मोहिरे ह्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक हे आहे.

३० डिसेंबर १९५५ रोजी जन्म झालेल्या डॉ संतोष मोहिरे यांचे आजोबा कै. गणेश रावजी मोहिरे हे नामवंत व्यापारी व शेतकरी होते. या बरोबरच ते पंचक्रोशीतील नामवंत वैद्य होते. ते लोकांवर विना मोबदला वैद्यकीय उपचार करत. तोच वारसा डॉ संतोष मोहिरे ह्यांनी पुढे चालविला आहे. वडील गांधीवादी विचारांचे कै. यशवंतराव चव्हाणांचे कार्यकर्ते, काँग्रेस संस्कृतीत वाढलेले, स्पष्टवक्ते पण मनाने प्रेमळ अशा वडिलांचे ते सुपुत्र आहेत व त्यांना मोहिरे कुटुंबाचा सार्थ अभिमान ही आहे.

डॉ संतोष मोहिरे यांचे प्राथमिक, माध्यमिक,
उच्च माध्यमिक शिक्षण हे कराड येथे झाले. नंतर आर्यांग्ल वैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथून त्यांनी बी ए एम एस ही पदवी प्राप्त केली.

१९८१ मध्ये डॉक्टर झाल्यापासून साक्षात धन्वंतरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असे व्यक्तिमत्व  कै.डाॕ.द.शि.एरम यांच्या शारदा क्लिनिकमध्ये
डॉ संतोष मोहिरे रुजू झाले.

प्रदीर्घ वैद्यकीय अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यावर मोठया शहराकडे धाव न घेता डॉ मोहिरे यांनी त्यांचे मूळ गांव रेठरे बुद्रुक येथे कृष्णा ऊद्योग समुहाचे शिल्पकार व कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कै.जयवंतरावजी भोसले यांच्याहस्ते व कै.द.शि.एरम यांच्या अध्यक्षतेखाली सरस्वती मेमोरिअल क्लिनिकचे उद्घाटन करुन रुग्ण सेवेला प्रारंभ केला. आजपर्यंत लाखो रुग्णांची त्यांनी सेवा केली आहे व करीत आहेत .

रुग्ण सेवा करित असतानाच, डॉ संतोष मोहिरे
लायन्स क्लब आॕफ कराडचे सदस्य झाले. त्यायोगे सामाजिक सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली. २२ वर्षांच्या काळात ते क्लबचे सेक्रेटरी, अध्यक्ष झाले. या क्लबच्या माध्यमातून समाजसेवा करित असताना कोणताही मोठा कार्यक्रम असू दे, त्याचे नियोजन करण्याची कला त्यांनी अवगत केली. या क्लबचे सेक्रेटरी असताना संपूर्ण डिस्ट्रिक्ट म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि संपूर्ण कोकण यामधील ६४ क्लब मधून त्यांना बेस्ट सेक्रेटरी पुरस्काराने गौरविले गेले.

डॉ मोहिरे यांनी या क्लबच्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दित असंख्य आरोग्य शिबिरे घेतली. ६४ कर्ण बधिरांना ऐकू येण्याची मशिने ज्यांची किंमत ४ ते ५ लाख होईल, ती मोफत वाटली. एड्स जन जागृतीची मोहीम राबवली. त्यावेळी हातांच्या बोटावर मोजण्या एवढे रुग्ण असताना त्याचा प्रसार लाखों लोकांना होईल याचे गांभीर्य ओळखून जन जागृती शिबीरे घेतली.

आंतरराष्ट्रीय लॉयन्स क्लबने दिलेल्या प्रोग्रॕम प्रमाणे त्यांनी क्लबचे ट्रस्ट मध्ये रुपांतर केले. नुसता ट्रस्टच स्थापन करुन ते थांबले नाहीत तर त्यांनी लायन्स आय हाॕस्पिटलच्या उभारणीत सेक्रेटरी होऊन सिंहाचा वाटा उचलला. या हाॕस्पिटलच्या माध्यमातून आपल्या रेठरे या गावातील जवळ जवळ ४ हजार लोकांना मोफत मोतिबिंदू मुक्त केले. हाॕस्पिटलला लागणारे फेको मशिन ज्याची किंमत ६ लाख रुपये होती, ते कृष्णा कारखान्यामार्फत देणगी दाखल मिळवून दिले.

आजची युवा पिढी क्षणिक आकर्षणाला बळी पडत आहे, व्यसनाधीन होत आहे यासाठी त्यातून ती मुक्त होण्यासाठी डाँ मोहिरे सतत प्रबोधन व प्रयत्न करीत आहेत.

समाजातील गरिब लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी, श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
आज या पतसंस्थेच्या १५० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या संस्थेच्या चेअरमन पदाच्या ११ वर्षांच्या कारकिर्दित त्यांच्या रेठरे या गांवात खाजगी सावकारांचा जो सुळसुळाट होता त्याचा त्यांनी बंदोबस्त केला व गांव सावकार मुक्त केले.

लायन्स हाॕस्पिटल चालवताना आर्थिक चणचण भासू नये म्हणून धनवृध्दि नागरी सहकारी पतसंथेची स्थापना केली.

ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे आपण देणे लागतो या प्रामाणिक भावनेतून त्यांनी श्री कालिकादेवी ट्रस्ट, कासार गल्ली कराडच्या तीन वर्षांच्या कारकिर्दित समाज बांधवांच्या वर्गणीतून १५ ते १६ लाख रुपये खर्च करुन श्री कालिकादेवी मंदीराचा जीर्णोध्दार करून अतिशय सुंदर असे मंदिर बांधले.

समाजासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे पाल्यांसाठी अनुरुप असे वधू वर संशोधन. यासाठी २०१२ साली त्यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श वधुवर मेळावा घेण्यात आला होता.

गेली वर्ष दिड वर्ष आपण कोरोना या महामारींशी सामना करत आहोत. या महामारीपासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी त्यांनी अतिशय प्रयत्न केले. कोरोना बाधितांना बरे होण्यासाठी मोफत औषधोपचार दिले. ऑनलाइन मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांना “कोविड योध्दा” म्हणून गौरविण्यात आले आहे. डॉक्टरांमध्ये देव पाहणाऱ्या आपल्या संस्कृतिचे ते एक उत्तम उदाहरण आहेत.

सध्या मध्यवर्ती मंडळाच्या कार्यक्षेत्राचा विचार करता सेवा कार्य करण्यास मर्यादा येत असल्याने पश्चिम महाराष्ट्र कासार विकास समिती स्थापन करण्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले. याची पोच पावती म्हणजे त्यांची या समितीच्या कोअर कमिटीत नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ संतोष मोहिरे यांचा प्रापंचिक विचार करता, त्यांची मुलगी सायली १२ वीला बोर्डात १३ वी आली होती. ती सध्या डाॕ.सायली मांगुळकर, त्वचारोग तज्ञ म्हणून मालेगांव येथे नावाजलेली आहे.
मुलगा चि.अमेय हा इलेक्ट्रिक इंजिनिअर असून त्याने हिंजवडी, पुणे येथे फीडर पीलर या इलेक्ट्रिक पॕनेलचे स्वतः उत्पादन सुरु केले आहे.
मुलगा उद्योजक व्हावा, हे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात साकार केले आहे.

त्यांची पुतणी एम फार्म, एम टेक असून ती सध्या हरित तंत्र या विषयात पी एचडी करीत आहे. तर पुतण्याने बी ई इलेक्ट्रिक करून एम टेक केले आहे.

मुलांनी उच्च शिक्षित व्हावे हे स्वप्न उराशी बाळगून आपल्या घरातील मुला मुलींना त्यांनी उच्च शिक्षित केले व समाजापुढे आदर्श निर्माण केला. त्यांची सुनसुद्धा उच्चशिक्षित असून पुणे येथे डिजिटल मार्केटिंग करत आहे.

व्यापारातील चढ उतार कायम असतात म्हणून जीवनाला स्थैर्य असावे यासाठी युवकांनी उच्चशिक्षित व्हावे असा त्यांचा सार्थ आग्रह आहे. तसेच केवळ आपली नोकरी, व्यापार, व्यवसाय इतकेच न पाहता सामाजिक कार्यात युवकांनी पुढाकार घ्यावा असा त्यांचा आग्रह असतो.

डॉ संतोष मोहिरे यांनी रुग्णसेवा आणि सामाजिक सेवा करीत असतानाच चित्रकलेची आणि वाचनाची देखील आवड जोपासली आहे. त्याचबरोबर त्यांचा दांडगा मित्र परिवारही त्यांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाने जपला आहे. पर्यटनाची देखील त्यांना आवड आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे ते मानतात. जीवनाची वाटचाल करताना पत्नी सौ सुरेखा यांची अखंड साथ मिळाल्याने हे शक्य झाले असे ते आवर्जून सांगतात.

डॉ संतोष मोहिरे यांनी अशा रितीने जीवनाची वाटचाल करताना युवकांपुढे आपला व आपल्या घराण्याचा आदर्श ठेवला. असा युवकांचा आदर्श, समाजाचा अभिमान असलेल्या व्यक्तिमत्वाला त्रिवार वंदन. त्यांच्या भावी सामाजिक कार्यासाठी अनेक शुभेच्छा.

रश्मी हेडे

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. आज आमचे वडिल श्री जयसिंग किसन लोकरे आणि आमचा परीवार आहे तो डाॕक्टरांच्या कृपेमुळे त्यांनी प्रयत्न केल्यामूळे आज आमचे वडिल स्वतःच्या पायावर चालू शकले डाॕक्टर तूमचे उपकार आयुष्यभर
    विसरू शकनार नाहि

  2. आदरणीय डॉक्टर
    संतोष मोहिरे साहेब,

    आपण सामाजीक बांधीलकीचे भान ठेऊन डोंगराएवढे ऊंच कार्य केले पण पाऊले मात्र कायम जमीनीवर ठेवली व निराधार लोकाना कायम आधार दिला.
    आपल्या कार्याला आमचा सलाम व मानाचा मुजरा.

    धन्यवाद
    श्री. संदिप रांगोळे पुणे.
    संपर्क व वॅटस्प क्रंमाक :
    9890210805

  3. खुपच छान समाजकार्य डाँक्टरसाहेब
    आमचेकडून तुमच्या कार्याला सलाम.
    व शुभेच्छा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments